Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 20 July, 2011

साखळी पालक महासंघाचा शिक्षण संचालिकांना घेराव

• शासनाकडूनच सरकारी शाळांची आबाळ
• सरकारी प्राथमिक शाळांची पाहणी करणार

पणजी, (प्रतिनिधी) व पाळी, (वार्ताहर) दि.१९ : सरकारी प्राथमिक शाळांतील अगणित समस्या व घसरलेला शैक्षणिक दर्जा विद्यार्थ्यांच्या गळतीला कारणीभूत आहे. सरकारने जाणीवपूर्वक ही परिस्थिती निर्माण केली आहे व अशाने सरकारी प्राथमिक शाळा बंद करण्याचाच हा घाट घालण्यात आल्याचा आरोप साखळी सरकारी प्राथमिक शाळा पालक महासंघाने केला. शिक्षण संचालिका सेल्सा पिंटो यांना घेराव घालून सुमारे शंभर पालकांनी आज शिक्षण खात्याच्या या बेजबाबदारपणाचा जाब विचारला.
साखळी मतदारसंघातील सर्व सरकारी प्राथमिक शाळांतील पालकांनी हा महासंघ स्थापन केला आहे. महासंघाचे अध्यक्ष विश्‍वंभर गांवस यांच्या अध्यक्षतेखाली आज पालकांनी शिक्षण संचालकांना घेऊन साखळी मतदारसंघातील ३४ ही सरकारी शाळांची ताबडतोब पाहणी करण्याचे निवेदन सादर केले. याप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, माजी जिल्हा पंचायत सदस्य शुभदा सावईकर, आशिष ठाकूर, दत्ताराम चिमुलकर, दामू नाईक, सुधाकर गावस आदी हजर होते. महासंघाने केलेली ही मागणी अखेर शिक्षण खात्यातर्फे मान्य करण्यात आली. प्रत्येक इयत्तेसाठी एक शिक्षक व अत्यावश्यक साधनसुविधा पुरवण्याची मागणी यावेळी खात्याकडे करण्यात आली. सरकारी प्राथमिक शाळांकडे खात्याने चालवलेल्या दुर्लक्षामुळे या शाळांत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या परिस्थितीमुळेच पालक आपल्या मुलांना सरकारी शाळेतून काढतात. पालकांना इंग्रजीतून शिक्षण हवे म्हणून सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या गळते असे भासवून सरकार दिशाभूल करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
साखळीतील सर्व सरकारी शाळांतील परिस्थितीची माहिती महासंघाने मिळवली असता या शाळांची काय दुर्दशा बनली आहे याचा उलगडाच झाल्याचे श्री. गांवस म्हणाले. साखळी सरकारी प्राथमिक शाळेत ३७ विद्यार्थी आहेत व चार इयत्तांसाठी फक्त दोन शिक्षक आहेत. त्यात फक्त एक वर्ग असून प्राथमिक गरज असलेले शौचालय नसल्याचे त्यांनी उघडकीस आणले. उर्वरित ३४ शाळांची परिस्थिती वेगळी नाही. वसंत नगर, साखळी गृह वसाहत व भंडारवाडा, आमोणा येथे भाड्याच्या जागेत शाळा चालवली जाते. या शाळांत चार इयत्तांसाठी फक्त दोन वर्ग आहेत व इतर सुविधांचेही वांदे आहेत. एक शिक्षकी शाळांतील शिक्षकांना शिक्षकेतर कामात जुंपले जाते व त्यामुळेच खुद्द सरकारकडूनच भावी पिढीच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याची नाराजी पालक महासंघाने केली. या परिस्थितीत पालकांना शिक्षण माध्यम निवडीचा अधिकार बहाल केल्यानंतर कोण पालक अशा परिस्थितीत आपल्या पाल्यांना ठेवतील, असा सवालही शिक्षण संचालकांना करण्यात आला.
शाळांची पाहणी होणार
सरकारी प्राथमिक शाळा पालक संघाच्या इच्छेनुसार साखळी मतदारसंघातील सरकारी शाळांची पाहणी करण्याचे आदेश शिक्षण संचालिका सेल्सा पिंटो यांनी साहाय्यक संचालक संतोष आमोणकर यांना दिले. यावेळी खात्यातर्फे देण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार दि. २० रोजी आमोणा येथील पिंपळवाडा, भंडारवाडा आणि खारवाडा, न्हावेली येथील गावकरवाडा, फणसवाडी आणि मायणा, २१ रोजी कुडणे येथील गावकरवाडा, फाळवाडा आणि करमली, साखळी पालिकेतील गावठण, विर्डी आणि गोकुळवाडी, २२ रोजी साखळीतील वसंत नगर, प्रताप नगर आणि खालचे हरवळे व वरचे हरवळे, २३ रोजी पाळी व कोठंबी येथील आंबेशी, आंबेगाळ, भामई, नवरवाडा, खाजन, तळे, रूमड, चिंचवाडा, २५ रोजी वेळगे येथील शाळा, सुर्ल येथील बायें, डिगणे व इतर सरकारी शाळांची पाहणी केली जाणार आहे.

No comments: