Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 20 July, 2011

‘उटा’तर्फे शुक्रवारी पणजीत ‘जेलभरो’

आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने आदिवासी जमणार
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): इंग्रजी प्राथमिक माध्यमाला अनुदान देण्याच्या निर्णयाची कार्यवाही फक्त दीड महिन्यात होते, परंतु आपल्या घटनात्मक हक्कांसाठी गेली आठ वर्षे लढणार्‍या अनुसूचित जमातीच्या बांधवांना मात्र अद्याप न्याय मिळत नाही. या समाजाप्रति विद्यमान सरकारला अजिबात आस्था नाही व त्यामुळेच अशा असंवेदनशील सरकारचा जाहीर निषेध करतो, अशी घोषणा ‘उटा’चे निमंत्रक प्रकाश वेळीप यांनी केली. लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी लढणार्‍यांचा पोलिस व प्रशासनाकडून छळ सुरू आहे व याचा निषेध म्हणून शुक्रवार २२ रोजी ‘जेलभरो आंदोलन’ करण्याची घोषणाही त्यांनी केली.
आझाद मैदानावर आयोजित धरणे कार्यक्रमावेळी पत्रकारांना संबोधित करताना श्री. वेळीप यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी आमदार रमेश तवडकर, आमदार वासुदेव मेंग गावकर तसेच ‘उटा’चे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. २५ मे रोजी बाळ्ळी येथे आंदोलनात दोन ‘उटा’ कार्यकर्त्यांना जिवंत जाळण्याचा प्रकार घडला. या घटनेतील गुन्हेगार उजळ माथ्याने फिरत आहेत व ‘उटा’चे नेते गोविंद गावडे व मालू वेळीप यांच्यावर खोटी कलमे दाखल करून त्यांना न्यायालयीन कोठडीत खितपत ठेवण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेला ५५ दिवस उलटले तरीही अद्याप गुन्हेगारांना अटक होत नाही. न्यायालयीन चौकशी व ‘सीबीआय’ चौकशी फक्त कागदोपत्रीच अडकली आहे, अशी टीका श्री. वेळीप यांनी केली. ‘उटा’ च्या सर्व मागण्या मान्य झाल्याची खोटी माहिती पसरवून सरकार या समाज बांधवांचा बुद्धिभेद करीत असल्याचा आरोप करून फक्त कागदोपत्री मान्यता देऊन काहीही उपयोग नसून या मागण्या प्रत्यक्ष कृतीत उतरायला हव्यात, असेही ते म्हणाले. गोव्याचे भूमिपुत्र सदोदित पिडीत व दुर्लक्षीतच राहावेत, असेच सरकारला वाटते काय, असा टोलाही श्री. वेळीप यांनी हाणला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा मंत्र मानणारा हा समाज शेवटच्या श्‍वासापर्यंत आपल्या हक्कांसाठी लढेल, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा
येत्या २२ रोजी सकाळी १० वाजता राज्यातील सर्व अनुसूचित जमात बांधवांनी हजारोंच्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थिती लावून आपल्या एकजुटीचे दर्शन सरकारला घडवावे, असे आवाहन प्रकाश वेळीप यांनी केले. आदिवासी बांधवांबरोबरच या समाजाच्या पाठीमागे ठामपणे उभे असलेले हितचिंतक व समर्थक यांनीही या आंदोलनात भाग घेऊन या समाजाचा आवाज सरकार दरबारी नेण्यासाठी हातभार लावावा, असेही ते म्हणाले. महात्मा गांधी यांच्या लोकशाही तत्त्वांनुसार हे आंदोलन छेडण्यात येईल. हजारोंच्या संख्येने उपस्थित आदिवासी बांधव जेलभरो आंदोलनात सहभागी होतील, असेही त्यांनी जाहीर केले.

No comments: