Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 17 July, 2011

सेझाच्या खाणीला भगदाड!

चिखलमिश्रित पाणी घुसल्याने मुळगावात हाहाकार
- वाहून गेलेले तिघे सुदैवाने बचावले
- बागायती आणि शेतीचे मोठे नुकसान
- २० शेतकर्‍यांना ८० लाखांचा फटका

डिचोली, दि. १६ (प्रतिनिधी): कुड्डेगाळ येथील फोमेंतो कंपनीचा टेलिंग डंप कोसळून मोठी दुर्घटना घडल्याची घटना ताजी असतानाच आज मुळगाव - गावकरवाडा येथील सेझा गोवा (वेदान्त) कंपनीची खाण कोसळून चिखलमिश्रित पाण्याचे लोट गावात घुसल्याने एकच हाहाकार माजला. या पाण्याच्या लोटाने तिघे जण वाहून जात होते. सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले. मात्र, या घटनेमुळे मुळगाव क्षेत्रातील संपूर्ण बागायतींची व शेतीची हानी झाली असून येथील २० शेतकर्‍यांना सुमारे ८० लाख रुपयांचा फटका बसला आहे.
ही घटना आज सकाळी ७.१५च्या दरम्यान घडली. गावकरी आपल्या दैनंदिन व्यापाला लागत असतानाच अचानक चिखलमिश्रित पाण्याचा प्रचंड लोंढा सुसाट वेगाने गावात घुसला व बघता बघता त्याने सार्‍या गावाला वेढले. त्यामुळे शेती-बागायती, घरे तसेच देवालयातही सर्वत्र चिखलच चिखल झाला. यात गावकर्‍यांचे अपरिमित नुकसान झाले. गावकर्‍यांनी याबद्दल सरकार व खाण खात्याला दोषी धरले असून परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर खाणी बंद ठेवण्याची मागणी केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार सेझा कंपनीच्या खाणीचे या ठिकाणी दोन खंदक असून त्यात प्रचंड प्रमाणात पाणी साठले आहे. त्यात डोंगराच्या बाजूला खनिज उत्खनन सुरू असल्याने तेथील भागाला तडा जाऊन माती एका खंदकात पडली. त्याचबरोबर त्या खंदकातील पाणी दुसर्‍या खंदकात फेकले गेले. यामुळे त्या खंदकाला मोठे भगदाड पडले व सुमारे २ ते ३ मीटर उंचीच्या पाण्याचा लोंढा प्रचंड वेगाने गावात घुसला.
दैव बलवत्तर म्हणून वाचले
ही घटना घडली तेव्हा प्रातर्विधीसाठी येथील ओहोळावर गेलेला श्रीपाद राऊत हा इसम पाण्याच्या प्रवाहाबरोबर सुमारे १०० मीटरपर्यंत वाहत गेला. त्याला एका माडाचा आधार मिळाल्याने त्याला पकडून त्याने दोन तास काढले. शेवटी त्याचा भाऊ सखाराम याने आपला जीव धोक्यात घालून त्याला वाचवले. या अपघातात श्रीपाद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रुपेश परब व राजाराम परब हे दोघेजणही पाण्याने लोटाने वाहून जात होते. मात्र, अथक प्रयत्नांनी त्यांनी स्वतःचा प्राण वाचवला.
मोठी दुर्घटना टळली
दरम्यान, ही घटना घडण्यापूर्वी केवळ पाचच मिनिटे अगोदर गावातील सुमारे ७० ते ७५ मुलांना विद्यार्थ्यांना घेऊन एक बस याच रस्त्यावरून गेली होती. पाण्याचा लोंढा पाच मिनिटे अगोदर आला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.
शेती, बागायती, मंदिरे, घरे चिखलमय
पाण्याचा प्रवाह एवढा जोरदार होता की त्याच्या तडाख्याने येथील अनेक माड व पोफळीची झाडे उन्मळून पडली. तसेच, मोठमोठे दगड व सामान वाहून आले होते. गावातील महादेव व क्षेत्रपाल मंदिरांत व अनेक घरात मातीमिश्रित पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आमदार, अधिकार्‍यांकडून पाहणी
दरम्यान, या घटनेचा तलाठी व अन्य अधिकार्‍यांनी पंचनामा केला असून त्यानंतर डिचोली मामलेदार प्रमोद भट, उपजिल्हाधिकारी नारायण गाड, निरीक्षक हरीष मडकईकर, अग्निशमन दलाचे जवान अन्य अधिकारी येथे दाखल झाले. डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर, नरेश सावळ, तसेच सरपंच, पंच आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनीही याठिकाणी भेट दिली.
ग्रामस्थांकडून खाणीचे अधिकारी फैलावर
दरम्यान, या घटनेनंतर सुमारे तीन तासांनी कंपनीचे सरव्यवस्थापक कृष्णा रेड्डी व श्री. मांद्रेकर घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गावकर्‍यांनी त्यांना फैलावर घेतले. कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच ही आपत्ती कोसळल्याचा आरोप त्यांनी केला असता कंपनीच्या अधिकार्‍यांनी आपली चूक मान्य केली व यापुढे सर्वतोपरी काळजी घेण्याचे आश्‍वासन ग्रामस्थांना दिले. गावातील परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत खाणीचे काम सुरू करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. सरपंच मयेकर या प्रकरणी पंचायत कडक पावले उचलणार असल्याचे सांगितले.
घटनांची वारंवार पुनरावृत्ती
१९८१ साली खाणीमुळेच डिचोलीत महापूर आला होता. १९९१ मध्ये व्हाळशी येथे खाण कोसळून ४ जणांना मृत्यू आला होता. २००९ साली मानसबाग येथे खाण कोसळून घरात माती घुसली होती तर २०१० मध्ये लामगाव येथे खाणीला भगदाड पडल्याने मोठी हानी झाली होती. आज पुन्हा तशीच घटना घडल्याने खाण व्यवसाय म्हणजे डिचोलीवासीयांना शापच असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणवादी रमेश गावस यांनी व्यक्त केली.
--------------------------------------------------------------------
त्वरित नुकसान भरपाई द्या : भाजयुमो
खाण कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे डिचोलीत असे प्रकार वारंवार घडत आहेत. आजचा हा प्रकार संतापजनक असून संबंधित खाण कंपनीने आपद्ग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी; अन्यथा भाजयुमोतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजयुमोचे अध्यक्ष डॉ. प्रमोेद सावंत व राष्ट्रीय युवा मोर्चाचे कार्यकारिणी सदस्य भगवान हरमलकर यांनी दिला आहे. लोकांच्या जिवावर उठलेल्या या खाणी बंद करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

No comments: