Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 22 July, 2011

मद्यार्क तस्करी रोखण्यासाठी गोवा व कर्नाटक एकत्र येणार

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)
गोवा आणि कर्नाटक यांच्यात होणारी बेकायदा मद्यार्काची अवैध वाहतूक तसेच तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना आखण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सागरी व वनक्षेत्रामार्गे होणार्‍या मद्यार्क तस्करीवर विशेष नजर ठेवून या बेकायदा व्यवसायातील टोळीचा पर्दाफाश करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
कर्नाटक राज्यात बेकायदा मद्यार्क व्यवसायाविरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. कर्नाटक राज्यात गोव्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्यार्क आयात केला जातो, असा निष्कर्ष तेथील सरकारने काढून त्यासंबंधी गोवा सरकारकडे चर्चा करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकचे अबकारी मंत्री एम. पी. रेणुकाचार्य व अबकारी आयुक्त यांनी आज पर्वरी येथे मुख्यमंत्री दिगंबर कामत व अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांची भेट घेतली. गोवा सरकारने बेकायदा मद्यार्क तस्करी रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी श्री. रेणुकाचार्य यांनी केले.
दरम्यान, गोवा कर्नाटक सीमेवरील अबकारी चेकनाके दक्ष ठेवण्यात आले असले तरी मोठ्या प्रमाणात सागरी, वनक्षेत्र व रेल्वेमार्गे मद्यार्काची वाहतूक होत असल्याचे पुरावे कर्नाटक सरकारला गुप्तचर यंत्रणेमार्फत मिळाले आहेत. या प्रकरणी सुनियोजित टोळीच कार्यरत असून त्याचा पर्दाफाश करण्यासाठी दोन्ही राज्यांनी संयुक्तरीत्या कारवाई करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. गोवा सरकारकडून याबाबतीत पूर्ण सहकार्य देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री कामत यांनी दिले.

No comments: