Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 19 July, 2011

राज्यात पावसाचे तुफान

• साखळी, डिचोलीला पुराची भीती
• अनेक गावांत मोठी पडझड
• कोकण रेल्वे पुन्हा ठप्प


पणजी, दि. १८ ( प्रतिनिधी)
राज्यभर गेले चार दिवस पडणार्‍या मुसळधार पावसाने आपली संततधार आजही सुरूच ठेवली आहे. या जोरदार पडणार्‍या पावसामुळे राज्यातील सर्वच नदीनाले तुडुंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पडझडीमुळे करोडो रुपयांचे नुकसान झालेले आहे. सत्तरीतील अंजुणे धरण भरल्यामुळे या धरणाचे दरवाजे केव्हाही उघडले जाऊ शकतात व त्यामुळे साखळी व डिचोली येथे पूर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तिलारी धरण भरल्यामुळे या धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आले आहेत. मात्र आणखी दरवाजे उघडल्यास व ते पाणी गोव्यात येणार्‍या तिलारीच्या तीनही कालव्यातून सोडल्यास हे पाणी गोव्यात येऊन परिसरातील लोकांना धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कालव्याच्या परिसरातील लोक पावसाच्या तीव्रतेकडे लक्ष देऊन आहेत. जोरदार पावसामुळे राज्यातील जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून अनेक ठिकाणचे रस्ते पाण्यांनी भरून गेले आहेत. घरे, झाडे यांची पडझड सुरूच आहे. पावसाने आपली तीव्रता वाढवल्यामुळे व पावसाच्या पाण्यामुळे रस्तेही तुडुंब भरले आहेत त्यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अनेकांनी आपली महत्त्वाची कामे स्थगित ठेवून घरीच राहणे पसंत केले आहे.

कोकण रेल्वे
२१ पर्यंत बंद
सावंतवाडी, (प्रतिनिधी)
सतत पडणा-या मुसळधार पावसामुळे पोमेंडी येथे सुरक्षा भिंत कोसळली आहे. काही भागात रेल्वे मार्गावर पाणी आले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कोकण रेल्वेची सेवा २१ जुलैच्या दुपारपर्यत बंद करण्यात आली आहे. मुंबई-कोकण या मार्गावरची सेवा बंद असली तरी गोवा-अडवली मार्गावरची सेवा सुरू राहणार असल्याचे कोकण रेल्वेच्या प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, कोकणकन्या एक्सप्रेस ही रेल्वे वगळता कोकण रेल्वेच्या आजच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लांब पल्ल्यावरील सर्वगाड्या लोंढा-हुबळीमार्गे वळविण्यात आल्या आहेत.
कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्या पोमेंडी येथे दरड कोसळल्याने रद्द करण्यात आल्या असून रेल्वेची कोकण कन्या ही मडगाव-मुंबई ही एक्सप्रेस चार तास उशिरा धावत आहे. या गाडीतील सर्व प्रवाशांना लांज्यापर्यंत सोडण्यात येऊन तेथून रत्नागिरीपर्यंत एस. टी. बसद्वारे नेले जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
सध्या कोकण रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. अडकून पडलेल्या गाड्यांतील प्रवाशांसाठी रत्नागिरी आणि अडवली येथे पर्यायी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा कहर चालू असून जिल्ह्यात पावसाने ८३ टक्के सरासरी पार केली आहे. वैभववाडी तालुक्यात सर्वांत जास्त पाऊस १८२ मिमी झाला असून आज पडलेल्या पावसाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुमेधा पाताडे यांना त्याचा तडाखा बसला. अतिवृष्टीने त्यांच्या घराची कौले व पत्रे उडून गेल्याने त्यांचे ८,८०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्याचप्रमाणे मुंबई -गोवा हा महामार्गही पावसाने बंद झाला असून कुडाळ-ओरोस दरम्यानच्या पीठढवळ नदीला पूर येऊन पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक खंडित झाली. पुलावरील पाणी ओसरल्यानंतर दुपारी १२ च्या दरम्यान ही वाहतूक पुन्हा सुरू झाली. शासकीय कर्मचार्‍यांनाही पुराचा फटका बसल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील पावसाच्या सरासरीने आज कणकवलीत ११९ मिमी, देवगड ९४, कुडाळ ९२, दोडामार्ग ६०, सावंतवाडी ४३, मालवण ५४ तर वेंगुर्ल्यात २० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजवर सरासरी १६,३२०.५३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात एकूण १४०८.० मि.मी पाऊस
दि. १७ रोजी सकाळी ८.३० ते आज दि. १८ रोजी सकाळी ८.३० या २४ तासात पणजी वेधशाळेत जी नोंद झाली आहे त्यानुसार २४ तासात राज्यात ५९.८ मि.मी. पाऊस पडला. तर राज्यात आत्तापर्यंत पडलेला पाऊस १४०८.० मि.मी. अर्थात ५५.४३ से.मी. आहे. पावसाचा जोर पुढील दोन दिवस असाच कायम राहणार आहे, अशी माहिती पणजी वेधशाळेतून देण्यात आली आहे. राज्यातील विविध केंद्रांत गेल्या २४ तासांत नोंद झालेला पाऊस पुढीलप्रमाणे (मि.मी.मध्ये) काणकोण ५४.८, दाबोळी ७४.६, मडगाव ६९.२, मुरगाव ५३.८, पेडणे २४.८,फोंडा ८७.६, केपे ७८.०, वाळपई ७७.३, पणजी, ३४.४, म्हापसा ४४.० व सांगे १०४.२.

No comments: