Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 19 July, 2011

भूमिपुत्रांचे अजून किती बळी हवेत?


तवडकरांचा सरकारला खडा सवाल

उटातर्फे पणजीतील आझाद मैदानावर धरणे


पणजी, दि. १८ (प्रतिनिधी)
गोव्याच्या भूमिपुत्रांची संघटना असलेली ‘उटा’ संघटनासरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून गेली सात वर्षेसंघर्ष करत आहे. मात्र सरकार भूमिपुत्रांना ‘बेवारशी’ समजून त्यांच्या मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍या भूमिपुत्रांचा कट रचून योजनाबद्ध बळी घेऊनही या सरकारचे डोळे उघडलेले नाहीत. आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारला आणखी किती भूमिपुत्रांचे बळी हवेत? असा खडा सवाल पैंगीणचे आमदार तथा उटा नेते रमेश तवडकर यांनी आज येथे आयोजित धरणे कार्यक्रमात केला.
आज दि. १८ रोजी उटातर्फे पणजी येथील आझाद मैदानावर एक दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना श्री. तवडकर म्हणाले की, गोवा सरकारला मागण्या मान्य करण्याची उटाने मुदत दिली होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे घटनेने उटाला दिलेले अधिकार मिळावेत यासाठी उटातर्फे आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनाला योजनाबद्धरित्या चिरडून टाकण्याचा सरकारनेडाव आखला व उटाच्या दोन कार्यकर्त्यांचे कारस्थान रचत बळीही घेतले. तसे पाहता सरकारकडून कर्तव्यात कसूर झाली होती. त्यामुळे सरकार प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांना ३०७ कलम लावून अटक करायला हवी होती. ती न करता उटाच्या कार्यकर्त्यांना सतावण्यात येत आहे. दोघा तरुणांच्या खुनाची चौकशी करण्यास चालढकल केली जात आहे. गोविंद गावडे व मोलू वेळीप यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. त्यांची सोडवणूक सन्मानाने करण्यासाठी उटा न्यायालयीन लढा लढत आहे. सरकारने अन्य कार्यकर्त्यांची सतावणूक सुरू केली आहे ती त्वरित थांबवावी न पेक्षा पुन्हा जनआंदोलन उभे करावे लागेल असा इशारा तवडकर यांनी यावेळी दिला.
या वेळी उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी सांगितले की, मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ५५ दिवसांपूर्वी पणजी येथे उटाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र ती आश्‍वासने पूर्ण केली नाहीत. न्यायालयीन चौकशी अजून सुरू झालेली नाही. दोघा तरुणांच्या खुन्यांना शिक्षा मिळालेली नाही. त्यामुळेच उटातर्फे आज पणजीत धरणे धरण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी उटाला दिलेली सर्व आश्‍वासने विनाविलंब पूर्ण करावीत, उटाच्या कार्यकर्त्यांची सतावणूक थांबवावी व भारतीय घटनेने दिलेले अधिकार उटाला मिळावेत या मागण्यांसाठी आजचे धरणे असून उद्या पुन्हा धरणे धरण्यात येईल अशी माहिती श्री. वेळीप यांनी दिली. आजच्या धरणे आंदोलनाला सांग्याचे आमदार वासुदेव मेंग गावकर व अन्य उटा नेते तसेच सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आज पुन्हा धरणे
आपल्या विविध मागण्या सरकारने विनाविलंब मान्य कराव्यात यासाठी आज आझाद मैदानावर दिवसभर धरणे धरलेले उटा बांधव उद्या दि.१९ रोजी पुन्हा येथेच सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत धरणे आंदोलन करणार आहेत.

No comments: