Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 26 December, 2010

..तर कॉंग्रेसच्या कलंकित मंत्र्यांनाही तातडीने हटवा

- राष्ट्रवादीचा आव्हानात्मक प्रस्ताव
- कॉंग्रेस - राष्ट्रवादी दरी रूंदावली
- बी. के. हरिप्रसाद आज येणार

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): राष्ट्रवादीचे नेते मिकी पाशेको यांच्यावर गुन्हेगारी प्रकरणे दाखल झाल्याने त्यांना मंत्रिमंडळात घेण्यास विरोध होत असेल तर अशाच पद्धतीचे गुन्हे दाखल झालेल्या कॉंग्रेस नेत्यांनाही मंत्रिमंडळातून हटवा, असा नवा प्रस्ताव आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कॉंग्रेससमोर ठेवण्याची तयारी केली आहे. मिकी पाशेको यांच्याविरोधात उभ्या ठाकलेल्या बंडखोर गटात फूट पाडण्यासाठीच ही नवी चाल राष्ट्रवादीने आखल्याने कॉंग्रेस अधिकच पेचात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मिकी पाशेको यांच्या मंत्रिमंडळ फेरनियुक्तीवरून निर्माण झालेल्या राजकीय वादावर तोडगा काढण्यासाठी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी बी. के. हरिप्रसाद हे उद्या २६ रोजी गोव्यात दाखल हात आहेत. सरकाराविरोधातच बंड करण्यासाठी पुढे सरसावलेल्या कॉंग्रेस नेत्यांना श्रेष्ठींचा नेमका काय संदेश आहे हे उद्या (रविवारी) हरिप्रसाद यांच्या आगमनानंतर स्पष्ट होणार असल्याने त्यांच्या भेटीकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना मिकी पाशेको यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मंत्रिमंडळातील विद्यमान महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा व पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांचे मंत्रिपदाचे राजीनामा घेण्याचेही त्यांनी सुचवले आहे. या आदेशाची माहिती उभय नेत्यांनी दिल्लीतील कॉंग्रेस श्रेष्ठींनाही दिली आहे. राष्ट्रवादी श्रेष्ठींच्या या आदेशाला मात्र येथील स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी तीव्र हरकत घेतली आहे. मिकी पाशेको यांची मंत्रिमंडळात वर्णी लावली तर सरकार पाडू, अशी धमकीच सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्या नेतृत्वाखालील गटाने दिली आहे.
जुझे फिलिप व नीळकंठ हळर्णकर यांचे मंत्रिपद काढून घेण्यासही या नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. कॉंग्रेस नेत्यांच्या या धमकीमुळे मिकी पाशेको यांचा शपथविधी प्रलंबित राहिला आहे.राष्ट्रवादी श्रेष्ठींच्या आदेशाला कॉंग्रेस श्रेष्ठींची संमती मिळेपर्यंत आपण काहीही बदल करणार नाही,अशी भूमिका मुख्यमंत्री कामत यांनी घेतल्याने या दोन्ही पक्षांत तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, मिकी पाशेको यांच्यावरील गुन्हेगारी प्रकरणांचे कारण पुढे करून कॉंग्रेस नेते त्यांना विरोध करीत असले तरी विविध प्रकरणांत आरोपपत्र दाखल झालेले नेते कॉंग्रेसमध्येही असल्याने राष्ट्रवादीने आपल्या बचावार्थ हाच मुद्दा पुढे रेटण्याचे ठरवले आहे. मिकींच्या समावेशास कॉंग्रेस राजी होत नसेल तर शेवटी कॉंग्रेसमधील कलंकित नेत्यांनाही मंत्रिपदावरून उतरवण्याची नवी अट राष्ट्रवादीतर्फे लादली जाणार असल्याने हा वाद मिटण्याची शक्यता दूर पण तो अधिक चिघळण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.

No comments: