Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 26 December, 2010

दयानंद नार्वेकर यांना तात्काळ अटक करा

पुत्राचा जन्मदाखला बनवेगिरीप्रकरणी
डॉ. शेखर साळकर यांची मागणी

- एकूण तीन जन्मदाखल्यांची नोंद
- क्रिकेट, शिक्षणासाठी वेगळे दाखले
- प्रकरण गुन्हा शाखेकडे सोपवा

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): कधी काळी राज्याचे कायदामंत्रिपद भूषवलेले, विद्यमान आमदार तथा गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ऍड. दयानंद नार्वेकर यांनी आपला मुलगा गणेशराज उर्फ अनीष नार्वेकर याच्या जन्मदाखल्यांबाबत केलेल्या कथित बनवेगिरीप्रकरणी १५ दिवसांत ठोस कारवाई केली जावी; अन्यथा आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावू असा इशारा डॉ. शेखर साळकर यांनी दिला आहे. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी ‘एफआयआर’ दाखल केल्यावरून ऍड. नार्वेकर यांनी ‘जीसीए’चे अध्यक्षपद सोडणेच उचित ठरेल. तसेच या संपूर्ण प्रकरणाची गुन्हा शाखेमार्फत चौकशी करून ऍड. नार्वेकर यांना तात्काळ अटक करावी व त्यांना या कृत्यांत सहकार्य केलेल्या सरकारी अधिकार्‍यांवरही कारवाई व्हावी, असेही डॉ. साळकर म्हणाले.
आज येथे बोलावलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, राजकीय नेत्यांकडूनच जर कायद्याची थट्टा होऊ लागली तर सामान्यांवर बडगा उगारण्याचा सरकारला कोणता अधिकार पोहचतो, असा सवाल डॉ. साळकर यांनी केला. ऍड. नार्वेकर व त्यांच्या पत्नी सौ. सुषमा नार्वेकर यांच्यासारख्या सुशिक्षित लोकांकडून अशा पद्धतीचे कृत्य होणे दुर्दैवी आहे. याप्रकरणी नार्वेकर दांपत्यासह पुत्र गणेशराज ऊर्फ अनीष नार्वेकर, बार्देश तालुक्याचे तत्कालीन कार्यकारी न्यायदंडाधिकारी पी. आर. बोरकर आणि म्हापसा पालिकेचे जन्म-मृत्यू नोंदणी अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान, याप्रकरणाचा मागोवा घेताना डॉ. साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशराज नार्वेकर याचा जन्म ‘चोडणकर नर्सिंग होम’ येथे २८ फेब्रुवारी १९९३ साली झाल्याची नोंद पिळर्ण पंचायतीकडून प्राप्त झालेल्या जन्मदाखल्यावरून मिळते. मुळातच या जन्मतारखेबाबत चौकशी केली असता ही नोंदणी एक महिना उशिरा झाल्याचे आढळले. एरवी या नर्सिग होममध्ये जन्मलेल्या त्याकाळातील इतर मुलांचे कागद पंचायतीकडे वेळेत पाठवण्यात आले; पण गणेशराजचा जन्मदाखला अहवाल उशिरा पाठवण्यात आला.
गणेशराज याने ‘पॉली उम्रीगर’ विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण विभागामार्फत (२००५-०६,०६-०७,०७-०८) असे तीन वर्षे प्रतिनिधित्व केले. १५ वर्षांखालील गटांत दोन वेळा खेळलेल्या खेळाडूला तिसर्‍यांदा खेळण्याची मनाई असते. पण येथे तिसर्‍या वर्षी अनीष नार्वेकर या नावाने त्याला खेळवण्याचा पराक्रम ऍड. नार्वेकर यांनी केला. हा प्रकार ‘बीसीसीआय’ च्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली व ‘जीसीए’ ला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.
दरम्यान, या स्पर्धेत खेळविण्यासाठी त्याची जन्मतारीख १ सप्टेंबर १९९३ अशी दाखवण्यात आली व त्याला म्हापसा पालिकेतर्फे दिलेला जन्मदाखला लावण्यात आला. म्हापसा पालिकेकडे माहिती हक्क कायद्याअंतर्गत मागितलेल्या कागदपत्रांनुसार गणेशराज ऊर्फ अनीष दयानंद नार्वेकर याच्या नावे तीन वेगवेगळ्या तारखांनी जन्मदाखले नोंद झाल्याचेही उघड झाले आहे. त्यात २८ फ्रेबुवारी १९९३, २६ फेब्रुवारी १९९२ व १ सप्टेंबर १९९३ अशांचा समावेश आहे. म्हापसा पालिकेत जन्मनोंदणीसाठी सुषमा नार्वेकर यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांत गणेशराज हा घरीच जन्मल्याचे सांगण्यात आले, अशी माहितीही डॉ. साळकर यांनी दिली.
या सर्व प्रकरणी विशेष गंभीर गोष्ट म्हणजे हे सर्व जन्मदाखल्यांच्या मूळ प्रती देण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता हे प्रकरण म्हापसा पोलिसांकडून काढून ते गुन्हा शाखेकडे सोपवणेच योग्य ठरेल. एखादा अधीक्षक, उपअधीक्षक किंवा निरीक्षकाच्या नेतृत्वाखाली चौकशी पथक नेमून या प्रकरणाचा तपास होणे गरजेचे आहे,असेही डॉ.साळकर म्हणाले. १५ दिवसांच्या आत ठोस कारवाई झाली नाही तर मग न्यायालयात जाण्याला पर्याय उरणार नाही, असा इशाराही यावेळी डॉ. साळकर यांनी दिला.

No comments: