Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 30 December, 2010

फोडल्या गेलेल्या तमाम मंदिरांना नुकसान भरपाई द्या

रस्त्यावर उतरण्याचा देवस्थान समित्यांचा इशारा
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): वर्षभरात गोव्यातील तब्बल ६१ मंदिरांत चोर्‍या झाल्या असून त्यांची करोडो रुपयांची मालमत्ता चोरीला गेली आहे. हा सरकारी यंत्रणेचाच परिपाक असल्यामुळे सरकारने या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून चोरी झालेल्या सर्व मंदिरांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आज देवस्थान समित्यांनी केली आहे.
आज दुपारी सचिवालयात मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांची भेट घेऊन त्यांना या विषयीचे निवेदन सादर करण्यात आले. १ जानेवारी २०११ पर्यंत यासंबंधीची ठोस माहिती घेऊन पोलिस जनतेसमोर आले नाहीत, तर या देवस्थानांचे सर्व भाविक रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. तसे झाले व १ जानेवारीनंतर कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला तर त्याला केवळ सरकार आणि पोलिसच जबाबदार असतील, असे स्पष्ट प्रतिपादन यावेळी फातोर्ड्याचे आमदार तथा साई संस्थानचे अध्यक्ष दामू नाईक यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत दक्षिण गोव्यातील प्रमुख देवस्थानांच्या समितीचे अध्यक्ष उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणी येत्या दोन दिवसांत गृहखात्याशी आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करून चोरटे अद्याप का सापडत नाहीत, याची माहिती करून घेतली जाणार असल्याचे श्री. श्रीवास्तव यांनी देवस्थान समित्यांच्या पदाधिकार्‍यांना सांगितले.
पोलिसांच्या अपयशावर यावेळी सर्व देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी जोरदार ताशेरे ओढले. राज्यातील मंदिरांत चोर्‍या होण्याचे सत्र सुरू असताना राज्याचे गृहखाते मात्र झोपी गेले आहे. या गृहखात्याला साबणाने धुऊन स्वच्छ करण्याची गरज असल्याचा टोला आमदार दामू नाईक यांनी लगावला. कुंकळ्ळी क्षेत्राची हद्द मोठी असली तरी येथील पोलिस स्थानकात केवळ २७ पोलिस आहेत. त्यामुळे या पोलिस स्थानकात पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे मत शांतादुर्गा किटलकरीण देवस्थान समितीचे उपाध्यक्ष गणेश देसाई यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी या मंदिरातील फंड पेटी फोडून सुमारे ३० लाख रुपयांचा ऐवज चोरांनी लुटून नेला. एका महिन्यात या देवीची जत्रा असून त्यासाठी सुमारे १० लाख रुपये खर्च येतो. जत्रेसाठी येणार्‍या सर्व भाविकांच्या जेवणाची सोय या ठिकाणी केली जाते. परंतु, सर्वच पैसे चोरीला गेल्याने आता जत्रा कशी साजरी करावी, असा गंभीर प्रश्‍न देवस्थानापुढे उपस्थित झाला आहे. त्यामुळे सरकारने देवस्थानाला त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी श्री. देसाई यांनी यावेळी केली.
यावेळी चंद्रेश्‍वर भूतनाथ देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश प्रभुदेसाई, जांबावलीच्या दामोदर देवस्थानचे मंजूनाथ दुकळे, काणकोणच्या मल्लिकार्जुन देवस्थान समितीचे सुरेश देसाई, फातर्प्याच्या शांतादुर्गा देवस्थानचे शिवाजी देसाई, कोठंबीच्या महादेव देवस्थानचे शशी देसाई, शेल्डेच्या सातेरी देवस्थान समितीचे संजय देसाई, काकोड्याच्या पुरुषम्हारू देवस्थानचे नितीन नाईक, शांतादुर्गा किटलकरीण देवस्थानचे गणेश देसाई व पारोड्याच्या सातेरी शांतादुर्गा देवस्थानचे नारायण पडीयार यांची उपस्थिती होती.
सनबर्न पार्टीच्या सुरक्षेसाठी गृहखाते २०० पोलिस तैनात करू शकते तर गोमंतकीयांची श्रद्धास्थाने असलेल्या मंदिरांच्या सुरक्षेसाठी ते एक होम गार्ड उपलब्ध करू शकत नाही का, असा परखड सवाल यावेळी मुख्य सचिवांना करण्यात आला. सर्व मंदिरांत ‘सीसीटीव्ही’ बसवण्याची आणि अध्यक्षांच्या नावे बंदुकीचा परवाना घेऊन ती बंदूक सुरक्षा रक्षकाला वापरायला देण्याची पोलिसांची सूचना यावेळी देवस्थान समित्यांनी एकमताने फेटाळून लावली. ‘सीसीटीव्ही’ बसवण्याएवढे पैसे कोणत्याही समितीकडे नाहीत. तसेच, दिलेल्या बंदुकीचा सुरक्षा रक्षकाकडून दुरुपयोग झाला तर त्याचे परिणाम देवस्थान समितीला नाहक भोगावे लागणार असल्याची अडचण यावेळी बोलून दाखवण्यात आली.
मडगाव भागातील एका पोलिस उपअधीक्षकाच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ते मडगाव भागातील संशयितांना ताब्यात घेण्याचे धाडस करत नाहीत, असा टोला लगावून मानवी अधिकाराला घाबरून कोणतीही कारवाई करण्यास हे अधिकारी कचरत असल्याचे यावेळी मुख्य सचिवांच्या नजरेस आणून दिले गेले. त्यामुळे या उपअधीक्षकांची बदली राखीव पोलिस दलात केली जावी, अशीही मागणी करण्यात आली.
-----------------------------------------------------------
शांतादुर्गा किटलकरीण मंदिरात चोरी होण्यापूर्वी पकडण्यात आलेल्या एका चोरट्याच्या खिशात सर्व मंदिरांची नावे पोलिसांना सापडली होती. परंतु, या बाबत कोणतीही सूचना मडगाव पोलिसांनी संबंधित मंदिरांच्या समित्यांना दिली नाही. ही माहिती आधीच मिळाली असती तर, योग्य ती काळजी घेतली गेली असती, असे एका अध्यक्षांनी सांगितले. तसेच, कारवार पोलिसांनीही मडगाव पोलिसांना बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे काही महत्त्वाची माहिती पुरवली होती. त्याचाही पाठपुरावा मडगाव पोलिसांनी केला नाही. पोलिसांच्या या गलथानपणामुळे चोरटे बिनधास्तपणे आपले मनसुबे पूर्ण करीत आहेत, अशी टीका यावेळी करण्यात आली.

No comments: