Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 23 September, 2010

उद्याच्या अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अभूतपूर्व बंदोबस्त

नवी दिल्ली, दि.२२ : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेचा फैसला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे लखनौ खंडपीठ तब्बल ६० वर्षांनंतर शुक्रवारी सुनावणार आहे. त्यामुळे देशातील बहुतेक राज्यांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.अनेक ठिकाणी निमलष्करी दले तैनात करण्यात आली असून, निकालानंतर जनतेने संयम राखावा, असे आवाहन सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी शांतता राखण्याचे आवाहन करताना, ""एक बाजूचा विजय झाला आणि एका बाजूचा पराभव झाला, अशा प्रकारचा घिसाडघाईने निष्कर्ष काढणे, योग्य ठरणार नाही,''असे म्हटले आहे.
""अयोध्येच्या बहुप्रतीक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर, सर्व राज्यांनी कायदा व सुव्यवस्थेची घडी अबाधित राखण्याच्या दिशेने चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवावा, खासकरून संवेदनशील भागांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना कराव्यात. उच्च न्यायालयाचे तीन सदस्यीय खंडपीठ अयोध्येतील वादग्रस्त जागेचा फैसला करणार आहे. एक किंवा त्यापेक्षा जास्त निर्णय न्यायालय देऊ शकते. घिसाडघाईत कोणत्याही निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यापूर्वी न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक वाचावा. या प्रकरणी दाखल असलेल्या चारही सूटवर माननीय न्यायाधीशांकडून मांडल्या जाणाऱ्या तथ्यांचे निरीक्षण करणेही आवश्यक ठरेल. अमूक एका पक्षाचा विजय झाला आणि तमूक एका बाजूचा पराभव झाला, असा निष्कर्ष न्यायालयाच्या निर्णयाचे वाचन न करता कुणीही काढू नये. असा घाईत निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही,''असे गृहमंत्री चिदंबरम् यांनी म्हटले आहे.
"उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी एक किंवा दोन्ही बाजूंनी तात्काळ विशेष पीठाकडे संपर्क साधणेे, हे एकवेळ समजण्यासारखे आहे, असेही चिदंबरम् म्हणाले.
""अयोध्या प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयावर पक्षकारांनी, सर्वसामान्य जनतेनी तसेच प्रसारमाध्यमांनी आपापली मते आपल्या स्वत:कडेच सुरक्षित ठेवावी. न्यायालयाच्या निर्णयावर घिसाडघाईत कोणतेही मतप्रदर्शन करू नये,''असे आवाहनही चिदंबरम् यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
अयोध्या प्रकरणाच्या निकालासाठी अवघे दोन दिवस उरले असताना आज सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल लांबणीवर टाकणे आणि चर्चेच्या माध्यमातून त्याच्या सोडवणुकीची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.
अशीच याचिका उच्च न्यायालयात दाखल करणारे रमेशचंद त्रिपाठी यांनी ही याचिका दाखल केली होती. निवृत्त सरकारी अधिकारी असणारे त्रिपाठी यांनी अयोध्या प्रकरण चर्चेच्या माध्यमातून सोडवावे, अशी मागणी यापूर्वीही केली होती. त्यासाठी त्यांनी पाच दिवसआधी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाकडे याचिका सादर केली होती. पण, त्यांनीही त्रिपाठी यांची याचिका फेटाळून लावली होती. एवढेच नव्हे तर त्रिपाठी यांनी सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी या याचिकेचा घाट घातल्याचे सांगत त्यांना ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका त्रिपाठी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
अयोध्या प्रकरणाची सुनावणी अन्य एका कोर्टात सुरू आहे. त्यामुळे आमच्या न्यायासनासमोर याची सुनावणी होऊ शकत नाही, असे न्या. अल्तमास कबीर आणि न्या. ए.के.पटनायक यांच्या न्यायासनाने स्पष्ट केले.
कर्नाटकात दोन दिवस सुटी
आगामी २४ सप्टेंबर रोजी अयोध्या प्रकरणाचा निकाल येणार असल्याने कर्नाटक सरकारने २४ आणि २५ रोजी दोन दिवसांची सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येदियुरप्पा यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. अयोध्या निकालामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व खबरदारी घेणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
याशिवाय राज्यात शांतता आणि सौहार्द कायम राहावे, यासाठी विविध राजकीय पक्ष तसेच जातीय संघटनांशी आपण चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसचा खासदारांना आदेश
२४ सप्टेंबरच्या अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदारांना आपआपल्या मतदारसंघातच थांबण्यास सांगितले आहे. आज एका पत्रपरिषदेत बोलताना कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंग म्हणाले की, अयोध्या प्रकरणी निकालाचा दिवस संपूर्ण देशासाठीच अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशीच्या निकालामुळे हिंदू आणि मुस्लिम संघटना काही गडबड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत सर्व आमदार आणि खासदारांनी आपआपल्या मतदारसंघातच थांबले पाहिजे. विशेषत: उत्तरप्रदेशातील लोकप्रतिनिधींनी तर मतदारसंघ सोडूच नये.
काही गडबड झाली तर शांतता आणि सुव्यवस्था तसेच जातीय सलोखा राखण्याच्या कामी या लोकप्रतिनिधींनी मदत करणे अपेक्षित आहे, असेही दिग्गीराजा म्हणाले.
२४ सप्टेंबरच्या पार्श्वभूमीवर मायावती सरकार उत्तरप्रदेशात घेत असलेल्या दक्षतेच्या उपाययोजना अतिशय स्तुत्य असल्याचेही ते म्हणाले.
उत्तरप्रदेशात सभा, संमेलनांना मज्जाव
अयोध्या प्रकरणी बहुप्रतीक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशात आगामी आठवडाभरापर्यंत सर्व प्रकारच्या सभा, संमेलनांना मज्जाव करण्यात आला आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी ओ.पी.पाठक यांनी ही माहिती पीटीआयला दिली. ते म्हणाले की, सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार आगामी आठ दिवसपर्यंत राज्यात कोणत्याही सभा, संमेलन आणि मोर्चांना बंदी राहणार आहे. अगदी शांतता मोर्चा काढण्यासही मज्जाव राहील. आठवडाभरासाठी ही बंदी राहणार आहे. यापूर्वीच ज्यांना या कालावधीसाठी सभा, संमेलनांकरिता परवानगी देण्यात आली असेल त्यांनी ती रद्द झाली असे समजावे.
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखली जावी, यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे पाठक यांनी सांगितले आहे.
देशवासीयांनो, शांतता राखा! -नरेंद्र मोदी
"अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या मालकीहक्काबाबतचा बहुप्रतीक्षित निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाचे लखनौ खंडपीठ २४ तारखेला सुनावणार आहे. या प्रकरणाचा निकाल काहीही लागो; देशवासीयांनो, तुम्ही संयम राखा. शांतता भंग होण्याची कोणतीही कृत्ये करू नका,''असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले.
""तब्बल ६० वर्षांची कायदेशीर लढाई लढली असल्याने लोकांमध्ये या प्रकरणाच्या निकालाची उत्सुकता साहजिकच शिगेला पोहोचलेली आहे. परंतु क्षणिक अस्वस्थता कोणासाठीही चांगली ठरणार नाही. तेव्हा संयम व शांतता अबाधित ठेवा,''असा संदेश मुख्यमंत्री मोदी यांनी दिला आहे.
""देशातील सामाजिक सलोखा, धार्मिक सौहार्द खराब करण्याच्या संधीच्या शोधात देशाचे शत्रू आहेत. आपण त्यांचा हा डाव हाणून पाडायलाच पाहिजे,''असेही मोदी यांनी म्हटले आहे.
अमिताभ बच्चन यांचेही आवाहन
"भारतीय चित्रपटसृष्टी हे राष्ट्रीय एकात्मतेचे सर्वात प्रबळ उदाहरण आहे. मला वाटते की, २४ सप्टेंबरचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल ऐकल्यानंतर शांततेला कोणताही धक्का लागणार नाही,' असे महानायक अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.
"विविध धर्मातील भूमिका आम्ही वठविलेल्या आहेत. वास्तविकतेत आमचा संबंध आलेला नसतानाही आम्ही त्या भूमिका वठविलेल्या आहे. आपल्या सर्वांमध्येच एका अलिखित कायद्याची बांधिलकी आहे व त्यानेच आपणा सर्वांना एकजुटीने, एकत्रितपणे, पारदर्शीपणे ठेवलेले आहे. मला वाटते की, २४ तारखेचा अयोध्येचा निकाल ऐकल्यानंतर ही एकजूट अशीच कायम राहील. आपण सर्वच जण शांतता राखण्याचा संकल्प करू या,'असे अमिताभ बच्चन यांनी "ब्लॉग'वरून दिलेल्या संदेशात म्हटले आहे.

No comments: