Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 23 September, 2010

रॉय नाईकला संपवण्यासाठी तीन कोटी रुपयांची 'सुपारी'

गृहमंत्र्यांच्या कुटुंबीयांना धोका
पोलिस महासंचालकांचा दावा

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): गृहमंत्री रवी नाईक यांचा मुलगा रॉय नाईक याला संपवण्यासाठी तीन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती व ती मायकल फर्नांडिस याला न्यायालयीन कोठडीतून मिळाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. दरम्यान, आज पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी गृहमंत्र्यांच्या कुटुंबीयांना धोका असल्याचा दावा करून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तथापि, ही सुरक्षा तात्पुरती असून पुन्हा याचा आढावा घेऊन त्याची गरज नसल्यास ती काढून घेतली जाईल, असेही श्री. बस्सी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अमली पदार्थ व्यवसायातून ही सुपारी दिली असल्याचे धागेदोरे पोलिसांना मिळायला लागले आहे. परंतु, सुपारी देणारा मुख्य व्यक्ती अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसल्याने पोलिसांनी यावर अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला आहे. नाव उघड न करण्याच्या अटीवर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मायकल फर्नांडिस हाच हे काम "फत्ते' करणार होता. लकी फार्महाऊस हिने "अटाला'या ड्रग माफियाचे केलेल्या चित्रीकरणानंतर रॉय नाईक याचे नाव चर्चेत आले होते. विरोधी पक्षानेही त्याबद्दल चौकशी करण्याची मागणी करून पोलिस ड्रग माफिया प्रकरण "सीबीआय'कडे सोपवण्याची मागणी केली होती.
तीन कोटी रुपयांची सुपारी..
काम फत्ते केल्यास तीन कोटी रुपये दिले जातील, अशी हमी मायकल याला देण्यात आली होती. हे काम कुठे करायचे आणि कधी करायचे याची सर्व माहिती मायकल याला दिली गेली होती. रॉय केव्हा कुठे जातो, याची खडान्खडा माहिती या टोळीने मिळवली होती. काही दिवसांत त्यांना "सुपारी'ची "टोकन अमाऊंट'ही मिळणार होती. सुपारी ही न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका व्यक्तीकडून मिळाल्याने सदर रक्कम त्यांना बाहेर कोण देणार होता, याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही.
कोठडी बनते गुंडांची 'कंट्रोल रुम'
गेल्या अनेक प्रकरणातून न्यायालयीन कोठडीत असलेल्या गुंडांकडूनच "सुपारी' किंवा दरोडे घालण्याचे कंत्राट दिल्याचे उघडीस आले आहे. रॉय नाईक याची सुपारीही न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका गुंडाने दिली होती. यापूर्वी राज्याचे माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांनी चक्क न्यायालयीन कोठडीतून मोबाईलवर संपर्क साधून सुपारी घेतल्या जात असल्याचा गौप्यस्फोट विधानसभेत केला होता. मायकलचा एक "गॉडफादर' न्यायालयीन कोठडीत असून त्याने आदेश दिल्यानंतर दरोडे आणि चोऱ्या केल्या जात होत्या. त्यातून हाती लागणाऱ्या रकमेचा काही भाग त्या व्यक्तीला दिला जात होता, असे स्पष्ट झाले आहे.

No comments: