Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 22 September, 2010

दरोडेखोराला सोडवण्यासाठी पोलिसांवर हल्लाप्रकरणी

आरोपींना साडेचार वर्षे कैद
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): पोलिसांवर प्राणघातक हल्ला चढवून अनिल जेकब या दरोडेखोराला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला दोषी धरून आज जलदगती न्यायालयाने सर्व आरोपींना साडेचार वर्षाची कैद व प्रत्येकी ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला. शामरीन कुट्टे, विनोद पिल्ले, विजयकुमार पिल्ले, राजेशकुमार पिल्ले, फक्रुद्दिन कंजू व अनिल जेकब यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भा.दं.सं १४३, १४७, १४८, २२४, २२५, ३३३ व ३०७ कलमाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
दरम्यान, या सहा जणांच्या टोळीला मदत करणाऱ्या फिदा मूसा व सेजा जोसेफ या दोघा महिलांनाही न्यायालयाने दोषी धरले असून त्यांना प्रत्येकी १ वर्षाचा तुरुंगवास व पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, या टोळीला सुमो जीप भाड्याने उपलब्ध करून देणाऱ्या कर्नाटक येथील उमेश नाईक याला दोषमुक्त करण्यात आले आहे. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार उत्तर प्रदेश येथील सुनील सिंग हा अद्याप फरार असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
दि. ६ जानेवारी २००७ रोजी ही घटना घडली होती. या हल्ल्यात दोन पोलिस शिपाई जखमी झाले होते. अनिल जेकब याला पळवून नेत असताना सुमो जीप अपघातग्रस्त झाल्याने त्यांचा हा बेत फसला होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल जेकब याला उपचारासाठी दंत महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले होते. उपचारानंतर दुपारी १२.३० वाजता कैद्याला घेऊन परतताना ते इस्पितळाच्या गेटसमोर थांबले असताना, जीए ०१ टी ०२१० ही टाटा सुमो अचानक त्यांच्या समोर येऊन धडकली. आत असलेल्या सहा सशस्त्र हल्लेखोरांनी शिपाई भालचंद्र गुरव व सूरज खांडेकर या दोघांच्या डोळ्यांत मिरचीची पूड फेकून तलवारीने हल्ला चढवला. यावेळी जेकब याला आपल्या सुमो जीपमध्ये घेऊन भरधाव वेगाने पळून जात असताना जीप बांबोळी येथे उलटून अपघातग्रस्त झाल्याने त्यांचा हा बेत फसला होता. यानंतर पोलिसांनी त्यांना सांताक्रूझ पणजी बांबोळी येथून अटक केली होती.
भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ खाली पोलिसांवर प्राणघातक हल्ला, २२४ खाली कैद्याचे पलायन, १४८ खाली शस्त्राद्वारे हल्ला व १४३ खाली बेकायदेशीर जमाव या आरोपांवरून आगशी पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
हल्ल्याच्या चार दिवसापूर्वी सर्व हल्लेखोर व त्यांना मदत करणाऱ्या दोन महिला केरळ येथून येऊन पणजी येथील "सपना हॉटेल'मध्ये थांबल्या होत्या. तसेच हल्ल्याच्या आदल्या दिवशी सदर दोन्ही महिलांनी चोरीच्या गुन्ह्यात सडा वास्को येथे न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल जेकब याची भेट घेतली होती, अशी जबानी तुरुंग निरीक्षकांना न्यायालयात दिली. या प्रकरणात न्यायालयाने ३७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून घेतल्या आहेत.

No comments: