Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 19 September, 2010

पंचवाडीवासीय मागणार दिल्लीत दाद

सोनिया व राहुल गांधी यांना देणार निवेदन
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी या गावात एका बड्या खाण कंपनीला जेटी तसेच खनिज वाहतुकीसाठी खास रस्ता उभारण्यासाठी गरीब शेतकऱ्यांची जमीन राज्य सरकारकडून सार्वजनिक वापरासाठी म्हणून बळकावण्याचा जो प्रकार घडला आहे, त्याबाबत आता दिल्लीत दाद मागण्याचा निर्णय पंचवाडी बचाव समितीने घेतला आहे. राहुल गांधी यांनी ओरिसातील आदिवासींच्या खाण विरोधी लढ्याला दिलेला पाठिंबा व सोनिया गांधी यांनी गरीब शेतकऱ्यांच्या जमीन संपादनाबाबत व्यक्त केलेली नाराजी लक्षात घेऊन या नेत्यांकडे मदतीची याचना करण्याचे समितीने ठरवले आहे.
पंचवाडी बचाव समितीचे निमंत्रक क्रिस्टो डिकॉस्ता यांनी ही माहिती दिली. पंचवाडी गावात बहुतांश अनुसूचित जमातीचे लोक वास्तव्य करतात. शेती, बागायती हेच या लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने या गावात खाण प्रकल्प आणून राज्य सरकारने पंचवाडीचा सत्यानाश करण्याचाच घाट घातला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. खारफुटी वनस्पतीला पर्यावरण जतनाचे खास संरक्षण दिले गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडूनही खारफुटी संरक्षणाबाबत वेळोवेळी निर्देश देण्यात येत आहेत. इथे मात्र दिवसाढवळ्या खारफुटीचा विध्वंस सुरू आहे. पंचवाडीवासीयांनी ही गोष्ट वन खात्याच्या नजरेला आणून दिली खरी परंतु संबंधितांवर कोणतीच कारवाई होत नसल्याचे आढळून आले आहे. पंचवाडी बचाव समितीकडून मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, वनमंत्री आदींची भेट घेऊन या प्रकाराची त्यांना जाणीव करून देण्यात आली परंतु त्याचा काहीही परिणाम झालेला नाही, असेही यावेळी श्री. डिकॉस्ता यांनी सांगितले. या खाण कंपनीने काही लोकांना व्यवसायाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले आहे व अशा पद्धतीने गावात फूट घालण्याचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या गावचे फादरही पंचवाडी बचाव समितीच्या पाठीशी ठाम असून कोणत्याही परिस्थितीत पंचवाडी गावचे रक्षण करणे हेच प्राधान्य असेल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, पंचवाडी गावावर ओढवलेल्या या संकटाची माहिती राहुल गांधी व सोनिया गांधी यांना निवेदनाद्वारे पोचवण्यात येईल. गोव्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारकडून कशा पद्धतीने जनतेची फसवणूक सुरू आहे व कशा पद्धतीने खाण कंपनीवर मेहरनजर ठेवून त्यांच्या फायद्यासाठी सार्वजनिक कारण पुढे करून जमीन संपादन करण्याचा प्रकार घडला आहे, याचीही माहिती या निवेदनातून देण्याचेही समितीने ठरवले आहे.
शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनीही पंचवाडी बचाव समितीच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. पंचवाडीचा हा विषय विधानसभेत उपस्थित करून महादेव नाईक यांनी सरकारचे लक्ष याकडे वेधले होते. सार्वजनिक कामासाठी भूसंपादन करून खाजगी खाण कंपनीला जागा देण्याची या सरकारची हिंमतच कशी होते, असा खडा सवालही आमदार महादेव नाईक यांनी उपस्थित केला आहे.
"शेतकऱ्यांचो एकवट' ची आज मडगावात बैठक
"शेतकऱ्यांचो एकवट' या संघटनेची महत्त्वाची बैठक उद्या १९ रोजी मडगावात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी विविध गावांतील पिडीत शेतकरी तसेच विविध ठिकाणचे खाण आपद्ग्रस्त शेतकरी हजर राहणार आहेत. राज्यात शेतकऱ्यांची ताकद अजूनही सरकारसमोर फिकी पडत असल्याने राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एकजुटीने लढा उभारण्याचा विचार सुरू आहे व त्यामुळे उद्याच्या बैठकीत याविषयी सखोल चर्चा केली जाणार आहे.

No comments: