Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 24 September, 2010

राघवीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांना त्वरित अटक करा


केरे ग्रामस्थांची जोरदार मागणी


चोडण, दि. २३ (वार्ताहर) - केरे - चोडण येथील राघवी रघुनाथ वाडयेकर या महिलेने आपल्या मुलासह केलेल्या आत्महत्येस तिचे पती रघुनाथ, नणंद गीता व सासू लीला याच कारणीभूत असून पोलिसांनी त्यांना ताबडतोब अटक करून तिच्या संशयास्पद मृत्यूची निःपक्षपातीपणे चौकशी करावी, अशी जोरदार मागणी केरे ग्रामस्थांनी केली आहे.
या संदर्भात केरे ग्रामस्थांनी गोपाळकृष्ण मंदिरात चोडणचे काळजीवाहू सरपंच तथा स्थानिक पंच पांडुरंग बांदोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एका सभेचे आयोजन केले होते. या सभेत केरे वाड्यावरील महिला, पुरुष तसेच तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
राघवीने आपले पती, नणंद व सासू यांच्या छळाला कंटाळूनच आपल्या मंजुनाथ या मुलासह जाळून घेऊन आत्महत्या केली. आज या घटनेला आठ दिवस झाले तरी या प्रकरणातील संशयितांना अजूनही अटक झालेली नाही. याचा तीव्र निषेध या सभेत करण्यात आला. सदर सभेत राघवीने स्वतःहून आत्महत्या केली नसून तिची बाळासह हत्या करूनच पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मुलासह जाळण्यात आले असावे, असा संशयही व्यक्त करण्यात आला.
राघवीची मानसिक स्थिती ठीक होती.
एका वृत्तपत्रात राघवीच्या मनःस्थितीविषयी तिच्या पतीने केलेली खोडसाळ वृत्ते प्रसिद्ध झाली होती. त्याचाही निषेध करण्यात आला. राघवीची मनःस्थिती ठीक होती. तिचे शेजाऱ्यांची कोणतेच वैर नव्हते, ती समाजात मिळून मिसळून राहणारी होती असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला. आपल्या घरात संतोषी मातेचे मंदिर वसवण्यास तिने विरोध केल्यानेच तिची तिच्या पतीकडून, नणंद व सासूकडून छळवणूक होत होती. या छळाला कंटाळूनच तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा, असा आरोप यावेळी करण्यात आला व तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.
दरम्यान, सरपंच पांडुरंग बांदोडकर यांच्या अध्यक्षतेखाली "राघवी - मंजुनाथ हत्या चौकशी कृती समिती' गठीत करण्यात येऊन या समितीत आरती बांदोडकर, दीक्षा केरेकर, शालिनी केरकर, भावना शिरोडकर, लीलावती केरेकर, तन्वी केरेकर कल्याणी कुस्मणकर, निरूपा केरेकर, प्रकाश म्हार्दोळकर, कमलाकांत वाडयेकर आदींचा समावेश आहे सदर प्रकरणी पुढील कार्यवाहीचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. या प्रकरणी स्थानिक आमदार, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना चौकशीची मागणी करणारे निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. राघवीच्या मारेकऱ्यांना आठ दिवसांच्या आत अटक न केल्यास चोडण भागातील सर्व महिला संस्थांनी एकत्रित येऊन धडक मोर्चा काढण्याचीही तयारी चालवली आहे.

No comments: