Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 23 September, 2010

पाकचे एक अणुसंयंत्र गायब झाल्याने खळबळ

आयएसआयला फुटला घाम
अतिरेक्यांच्या हाती अणुबॉम्ब लागल्याची शंका?

इस्लामाबाद, दि. २२ : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एक अणुसंयंत्र बेपत्ता झाल्याने आयएसआयसह सर्व गुप्तहेर संघटनांचे धाबे दणाणले आहे. या माध्यमातून अतिरेक्यांच्या हाती अणुबॉम्ब तर लागणार नाही ना या कल्पनेनेच पाकिस्तानी प्रशासन हादरले आहे.
एका वृत्त वाहिनीने या आशयाचे वृत्त प्रसारित केले आहे. त्यानुसार रेडिओऍक्टिव्ह गामा प्रोजेक्टाईल हे उपकरण यंदा जून महिन्यापासूनच सिंध प्रांतातून बेपत्ता झाले आहे. सुरुवातीला याची चौकशी स्थानिक सुरक्षा संघटनांना सोपविण्यात आली होती. पण, नंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याची तपासाची सर्व सूत्रे आयएसआयने आपल्या हाती घेतले आहे.
हे एक असे उपकरण आहे ज्याचा उपयोग डर्टी बॉम्ब किंवा अणुबॉम्बला सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. हे उपकरण गायब झाल्याने अतिरेक्यांच्या हाती तर लागले नाही ना, अशी शंका आयएसआयला सतावित आहे. सोबतच या उपकरणाची गरज पडली म्हणजेच अतिरेकी संघटनांकडे अणुबॉम्ब असावेत, या कल्पनेने पाकला कापरे भरले आहे.
सतत अतिरेकी हल्ल्याच्या सावटाखाली असणाऱ्या पाकिस्तानला आता अतिरेकी आपल्यावर अणुबॉम्ब तर टाकणार नाहीत ना, अशीही भीती वाटू लागली आहे. पाकमधील अण्वस्त्रांची सुरक्षा हा जगभरातील देशांसाठी चिंतेचा विषय राहिला आहे. आता अणु संयंत्र गायब झाल्याने हा विषय अधिकच चिंताजनक बनला आहे.

No comments: