Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 25 September, 2010

विश्वजितमुळे सत्तरीचा विनाश अटळ!

विश्वेश प्रभू परोब सोमवारी उमेदवारी दाखल करणार

वाळपई, दि. २४ (प्रतिनिधी)- वाळपईच्या जनतेने विश्वजित राणे यांना अपक्ष म्हणून पाच वर्षांकरता निवडून दिले होते. परंतु, असे असताना वाळपईच्या जनतेचा विश्वासघात करून त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कॉंग्रेस प्रवेश केला व येथील जनतेवर निवडणूक लादली. वाळपईच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांना त्यांनी हरताळ फासला असून केवळ पैशांच्या बळावर जनतेला लाचार बनवून निवडणूक जिंकू पाहणारे विश्वजित निवडून आल्यास सत्तरीचा विनाश अटळ आहे, अशी घणाघाती टीका विश्वजित राणे यांचे डमी म्हणून उमेदवारी अर्ज भरलेले माजी आमदार अशोक परोब यांचेच पुत्र विश्वेश प्रभू परब यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन केला.
या परिषदेत त्यांनी विश्वजित राणे यांच्यावर तुफान हल्ला चढवला. आपले घराणे पूर्वापार कॉंग्रेस समर्थक आहे. परंतु, आज माझ्या वडलांचा स्वतःच्या स्वार्थासाठी केवळ वापर करून घेतला जात आहे. काही वर्षांपूर्वी प्रतापसिंह राणे यांनी असाच मगो पक्षातून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आता त्यांच्या पुत्रानेही तोच कित्ता गिरवला आहे, असा टोला त्यांनी हाणला. आपल्याला वाळपईत मोठा पाठिंबा आहे. विश्वजित राणे यांच्या विरोधात आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास सिद्ध असून सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
केवळ सोनिया गांधी सांगतात म्हणून कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सोनिया गांधी या राष्ट्रीय स्तरावरील नेत्या असतील परंतु, सत्तरीवासीयांना त्यांचे काहीही देणेघेणे नाही. सत्तरीतील काही नेते केवळ पैशांसाठी लाळघोटेपणा करण्यास तयार होतात हे दुर्दैवी आहे. अपक्ष असूनही आरोग्य खाते मिळालेले असल्याने विश्वजित राणे वाळपईचा विकास करू शकले असते. परंतु, त्यांनी कॉंग्रेस प्रवेश करून वाळपईकरांवर पोटनिवडणूक लादली व जनतेच्या पैशांचा चुराडा केला, असा आरोप करताना उद्या ते कॉंग्रेसमधून अन्य पक्षातही जातील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. सत्तरीच्या जनतेला त्यांनी मागील वेळी अनेक आश्वासने दिली होती. परंतु, ती हवेतच विरल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. महिलांना पैसे वाटणे म्हणजे महिला सशक्तीकरण करणे असे विश्वजित यांना वाटते. वाळपई इस्पितळाचे परदेशीकरण करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. आरोग्यमंत्री असतानाही या इस्पितळातील समस्या त्यांना सोडवता आलेल्या नाहीत. केवळ खाणींसाठी पूल व रस्ते बांधण्याचे काम त्यांनी केले. सावर्डेची खाण सुरू करणार अशी धमकी ते देत आहेत. त्यांनी येथील तरुणांना कंत्राटी पद्धतीवरील नोकऱ्या दिल्या असून त्यांना लाचार बनवून ते आपल्या बंगल्यावर खेपा मारायला लावत आहेत. आणि असे असूनही ते स्वतःला गरिबांचा कैवारी म्हणवून घेताहेत हे हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले.
आपण पणजीत बसून ही निवडणूक जिंकू शकतो अशा वल्गना करणारे विश्वजित आज रात्रंदिवस वाळपईतल्या गावागावांत का फिरत आहेत? पैशांचा वापर करून निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्यात धमक असेल तर एकही पैसा खर्च न करता त्यांनी ही निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान विश्वेश प्रभू यांनी दिले.
आपल्याला कुठल्याही पक्षाने पाठिंबा दिलेला नसून आपण स्वतंत्रपणे हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला सूचक म्हणून ऍड. शिवाजी देसाई यांनी पाठिंबा दिला असून अनेकजण आपल्या पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला. केवळ तात्पुरत्या फायद्यासाठी लोकांनी घराणेशाही राबवू पाहणाऱ्या या नेत्याच्या चरणी लाचार होऊ नये. तसे केल्यास सत्तरीचा विनाश अटळ असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

No comments: