Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 12 July, 2010

दुकानांचा मालकीहक्क बदलण्याचा नवा घाट!

पणजी बाजार दुकानवाटप घोटाळा
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) - पणजी पालिकेच्या नव्या बाजार संकुलात दुकानांचे वाटप करताना मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आला असून तो लपवण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. यावर विरोधी नगरसेवकांनी आवाज उठवला असून या घोटाळ्याचे बिंग फुटण्यापूर्वीच सर्व कागदपत्रांत फेरफार करण्याचा घाट पालिकेने घातला आहे. सध्या पालिकेच्या फायलींत दुकाने ज्या व्यक्तींच्या नावावर दाखवण्यात आली आहेत, ती बनावट असून दुकान मात्र भलत्याच व्यक्तीला देण्यात आल्याचा आरोप नगरसेवक रुपेश हळणकर यांनी केला आहे. रात्री बाराच्या दरम्यान एका दुकानाची भिंत पाडून त्याची दोन दुकाने करण्याचा प्रयत्न सुरू असताना त्याचा भांडाफोड केल्यानंतर हे नवे प्रकरण समोर आले आहे, असे श्री. हळणकर यांनी सांगितले.
काही नगरसेवकांनी लाखो रुपये आकारून परस्पर ही दुकाने विकली आहेत. बाजाराच्या पहिल्या मजल्यावर अनेक दुकाने बंद होती ती याच घोटाळ्यामुळे, असे त्यांनी सांगितले. लाखो रुपये देऊन ज्या व्यक्तींनी ही दुकाने विकत घेतली आहेत, ते आता दुकानांचा ताबा घेण्यासाठी पुढे आले असून त्यामुळे या नव्या घोटाळ्याची माहिती बाहेर फुटली असल्याची माहिती त्यांनी दिली. काही दिवसांपूर्वी बाजार संकुलाच्या पहिल्या मजल्यावरील दुकानाची भिंत फोडून त्याठिकाणी आणखी एक नवे शटर बसवून दोन दुकाने करण्यात आली आहेत. सदर ३३४ क्रमांकाचे दुकान हे प्रशांत राय या व्यक्तीच्या नावावर आहे, असे पालिकेच्या फायलीत नमूद केले आहे. मात्र प्रत्यक्षात हे दुकान भलत्याच व्यक्तीला देण्यात आले असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आता पालिकेने पोलिसांना पत्र पाठवून सदर दुकान हमानगुरी आय. गोस्वामी या व्यक्तीच्या नावावर असल्याचे म्हटले आहे.
लाखो रुपये देऊन वाटण्यात आलेली दुकाने आता त्यांच्या नावावर करण्याची तयारी पालिकेने चालवली असून त्यामुळे ज्या दुकानात जी व्यक्ती आहे त्याच्या नावावर हे दुकान करण्याचाही छुपा घाट पालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी घातला असल्याचा आरोप श्री. हळणकर यांनी केला आहे. येत्या पालिका बैठकीत या घोटाळ्यावर जोरदार आवाज उठवला जाणार असून पणजीतील लोकांपर्यंत हा विषय पोचवला जाणार असल्याचे ते म्हणाले. तसेच, पालिकेने कशा प्रकारे लूट चालवली आहे, याचाही भांडाफोड विरोधी गट करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments: