Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 11 July, 2010

तिकीट दरवाढीचा घोळ कायम

बस मालक संघटनेची आज बैठक

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - वाहतूक खात्याने खाजगी बस व्यावसायिकांना देऊ केलेल्या १० पैसे तिकीट दरवाढीचा ७, ९ आणि ११ किलोमीटरच्या प्रवासी मार्गांवर धावणाऱ्या बसगाड्यांना अजिबात लाभ होत नाही. वाहतूक संचालक अरुण देसाई यांच्याशी चर्चा करून त्यांना या गोष्टीची कल्पना देण्यात आली आहे. संघटनेतर्फे २० पैसे वाढ देण्याच्याबाबतीत सरकारकडून सुरू असलेल्या चालढकलपणाबाबत चिंता व्यक्त करून उद्या ११ रोजी संघटनेची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी दिली.
वाहतूक खात्याने तिकीटदरवाढीबाबत घोळ निर्माण केल्याचा आरोप श्री.ताम्हणकर यांनी केला. बस मालक संघटनेतर्फे २० पैशांची मागणी ही पूर्ण विचारांतीच करण्यात आली होती. सरकारने देऊ केलेल्या १० पैसे वाढीचा फायदा ७, ९ व ११ किलोमीटरपर्यंतच्या मार्गांवर धावणाऱ्या बसगाड्यांना होत नसल्याचे संचालकांच्या नजरेस आणून देण्यात आले आहे.
दरम्यान,२० पैसे वाढ दिल्यास लांब पल्ल्याच्या मार्गांवरील तिकीट मोठ्या प्रमाणात वाढते, असे वाहतूक संचालकांकडून सांगण्यात आले. तसे झाल्यास ३० किलोमीटरपुढील तिकीटदरांत कमी करून वाढीचा समतोल राखणे शक्य आहे, असेही संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.
खाजगी बस मालकांना तिकीट दरवाढ देताना, सरकार प्रवाशांवर भुर्दंड पडणार असल्याची भाषा करते; पण कदंब शटल सर्व्हिसच्या तिकीटदरांत मोठी वाढ झाली आहे त्याचे काय, असा सवालही ताम्हणकर यांनी केला. नव्या वाढीव तिकीटदरांप्रमाणे पणजी- मडगाव मार्गावर २२ रुपयांवरून २७ रुपये, पणजी- वास्को मार्गावर २१ - २५, वास्को- मडगाव मार्गावर २०-२४ रुपये अशी वाढ झाली आहे. या सर्व मार्गांवर फक्त कदंबची शटल सेवा सुरू आहे.शटल ही खास सेवा आहे व तिथे प्रवाशांना चांगली व तात्काळ सेवा देणे गरजेचे आहे.शटल बसेसची काय परिस्थिती झाली आहे व अनेकवेळा मोठ्या बसगाड्या घालून प्रवाशांची कशी लुबाडणूक केली जाते, याचा चांगला अनुभव प्रवाशांना मिळत आहे. असे असताना या वाढीबाबत सरकारला अजिबात फिकीर नाही, असा टोलाही यावेळी श्री.ताम्हणकर यांनी हाणला.आता दर पंधरवड्यात पेट्रोल व डिझेलचे दर बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवेळी बस मालक संघटनेला सरकारशी दोन करणे भाग पडणार आहे काय, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. याप्रकरणी कायमस्वरूपी तोडगा काढावा. शेजारील राज्यांप्रमाणे डिझेल दरांप्रमाणे तिकीटदर निश्चित करून हा प्रश्न सोडवता येणे शक्य आहे. तिकीटदरांत किमान १५ पैसे वाढ मिळायलाच हवी व त्यासंदर्भातच उद्याच्या बैठकीत चर्चा होईल, असेही ताम्हणकर म्हणाले.

No comments: