Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 11 July, 2010

मुंबई हल्ल्याप्रकरणी कसाब, अन्सारीविरोधात नव्याने वॉरंट

इस्लामाबाद, दि. १० - २६/११ च्या मुंबई हल्ल्याप्रकरणी सात संशयित आरोपींवर खटला सुरू असलेल्या पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने या हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल आमिर कसाब आणि फहीम अन्सारी या दोघांविरोधात नव्याने अटक वॉरंट जारी केला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव रावळपिंडी येथील अतिसुरक्षित अशा अदियाला कारागृहात न्या. मलिक मुहम्मद अक्रम अवान यांच्या न्यायालयात सध्या हा खटला सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान अवान यांनी सरकारी आणि बचाव पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे वॉरंट जारी केले आहेत. मुंंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला लष्करचा कमांडर झकीऊर रहमान लखवी याने जामीन मिळण्यासाठी आज न्यायालयात नव्याने अर्ज सादर केला.
कसाबला पाकिस्तानच्या हवाली करण्यात येणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे असे सरकारी वकीलांनी ३ जुलैला झालेल्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाला सांगितले होते. मुंबई हल्ल्याप्रकरणी भारतात खटला चालवल्यानंतर न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा ठोठावली होती, तर फहीम अन्सारी यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती.

No comments: