Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 8 October, 2009

चोरट्यांचा पोलिसांनाच हिसका

निरीक्षकाच्याच घरात चोरी

मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यात गेल्या दोन वर्षात चोऱ्या करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चोरट्यांनी आता चक्क पोलिस निरीक्षकाच्याच घरात चोरी करून राज्यातील तपास यंत्रणेला उघड आव्हान दिले आहे. काल रात्री नुवे येथे पोलिस निरीक्षक ऍडविन कुलासो यांच्या घरात घुसून चोरट्यांनी आत झोपलेल्या त्याच्या वडिलांच्या गळ्यातून सोनसाखळी खेचून पळ काढला.
काल भरदिवसा कोंबवाड्यावरील एका घरातून मोबाईल पळविण्याची घटना ताजी असताना चोवीस तासातील घडलेली ही दुसरी घटना आहे. चोरांना पोलिस निरीक्षकाच्याच घरात चोरी केल्याने मडगाव पोलिसांच्या तोंडाचे पाणीच पळाले आहे. या घटनेची आज पोलिस मुख्यालयातही जोरदार चर्चा सुरू होती.
कोलवा पोलिस स्टेशनवरील निरीक्षक ऍडविन कुलासो यांच्या नुवे येथील घरी हा प्रकार घडला असून ऍडविन हे जुने गोवे येथे राहतात तर त्यांचे आईवडील व बंधू नुवे येथील या घरात राहतात. काल रात्री नेहमीप्रमाणे ही मंडळी झोपलेली असताना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी मागील दार उघडून आत प्रवेश केला. इतकेच नव्हे तर त्यांनी निरीक्षकांच्या वडिलांच्या गळ्यांतील साखळी खेचून पोबारा केला. या प्रकरणी पोलिस तक्रार नोंदविली गेली आहे. पोलिसांनी आज श्र्वानपथक आणून तपास केला पण श्वान तेथेच घुटमळत असल्याचे दिसून आले.
गेल्या दोन वर्षात चोरट्यांनी दक्षिण गोव्यात खास करून मडगाव शहरात धुमाकूळ माजवला आहे. परंतु, चोरांच्या एकाही टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पोलिस दक्ष नसल्याने चोरट्यांचे फावते, अशी चर्चा सामान्यतः नागरिकांत सुरू असते, आता तर चक्क पोलिसांच्याच तोंडून घास पळवण्याचा प्रकार घडल्याने गृहखाते याचे खापर कोणावर फोडणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या घरात घुसून चोरांनी दिलेले आव्हान पोलिस खाते स्वीकारते की नाही, हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे.

No comments: