Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 4 October, 2009

अस्नोड्यात ४० घरांना पुराचा तडाखा

म्हापसा, (प्रतिनिधी) व हरमल (वार्ताहर) दि. ३ : सततच्या पावसामुळे अस्नोडा येथील पार नदीला काल रात्री पूर आल्यामुळे सुमारे चाळीस घरांना पुराचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच अस्नोडा पुलावर पाणी आले. त्यामुळे पार नदीच्या पाण्याची पातळी वाढत गेली. आरंभी लोकांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र रात्री दीडच्या सुमारास काठ ओलांडून नदीचे पाणी ग्रामस्थांच्या घरात घुसले. त्यामुळे त्यांची विलक्षण तारांबळ उडाली. यामुळे घाबरलेल्या लोकांना काय करावे हे सुचेनासे झाले. मग वेळीच सावध होऊन त्यांनी याची माहिती म्हापसा पोलिस व अग्निशामक दलाला दिली. पोलिस व दलाचे जवान तेथे ताबडतोब दाखल झाले. त्यांनी गावातील युवाशक्तीच्या मदतीने या ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी नेण्याचे कार्य सुरू केले.
रात्रभर धडाधडा कोसळणाऱ्या पावसाचा धडका सकाळी आठच्या सुमारास थोडा कमी झाला. त्यावेळी मयते येथील ग्रामस्थांनी आपल्या घरांची पाहणी केली. त्यात श्रीमती वैशाली मेस्त्री यांच्या घराची भिंत कोसळल्याचे दिसून आले. नरसिंह नागवेकर यांच्या घरासभोवतालचे ५० मीटर कुंपण मोडले होते. वनदेवी मंडपातील साऊंड सिस्टम व अन्य वस्तू सैरभैर झाल्या. अनेक घरांतील संसारोपयोगी वस्तू, घरांचे वऱ्हांडे, शेती, बागायती यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. गणेशनगर अस्नोडा येथील सरस्वती अस्नोडकर यांचे जुने घर प्रभावती शिरोडकर यांच्या भिंतीवर कोसळून सरस्वती अस्नोडकर व प्रेमावती शिरोडकर यांचे पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. दरम्यान, मोखराय वाडा कोलवाळ येथे नामदेव गोपाळ मयेकर यांच्या घरावर पाठीमागील दरड कोसळून भिंत कोसळली व त्यामुळे त्यांचे सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान झाले; तर नादोडा येथे मारिया डिसोझा यांच्या घरावर दरड कोसळून त्यांचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
सकाळी अकराच्या सुमारास खासदार श्रीपाद नाईक, उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर, मामलेदार गौरेश शंखवाळकर, माजी आमदार सदानंद शेट तानावडे, गावचे सरपंच उल्हास मापारी, प्रदीप चोडणकर, विद्याधर चोडणकर, पंच प्रदीप पेडणेकर, माजी पंच आलेक्स त्रिनिदाद आदींनी या भागाला भेट दिली. उपजिल्हाधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केल्यानंतर हानीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक संदीप केसरकर, विजय राणे, चंद्रकांत गावस, सुशांत चोपडेकर हे रात्री एक वाजता तेथे पोहोचलेले पोलिस पथक व अग्निशामक दलाचे जवान दुपारपर्यंत गावातच तळ ठोकून होते. सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे श्री. तानावडे यांनी पूरग्रस्तांना सांगितले.

No comments: