Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 9 October, 2009

राज्यभरात १३१ कोटी अधिकृत नुकसानी

पणजी, दि.८ (प्रतिनिधी)- राज्यात व प्रामुख्याने काणकोण भागात पावसाच्या तडाख्यामुळे झालेल्या हानीचा सरकारी अधिकृत आकडा १३१ कोटी रुपये झाल्याची घोषणा आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, पूरग्रस्त भागातील केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असलेली कमकुवत घरे, शेतीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात होत असलेली चालढकल तसेच या तडाख्याचे भविष्यात स्पष्ट होणारे परिणाम लक्षात घेता हा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज पर्वरी मंत्रालयातील परिषदगृहात विशेष मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्री कामत यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना राज्यातील पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती करून दिली. परतीच्या पावसाने संपूर्ण राज्याला झोडपून काढलेच पण काणकोणात मात्र कहरच ओढवला. प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी भरवस्तीत लोटून आले व त्यामुळे अनेकांची घरे जमीनदोस्त झाली तर काहींचे संसारच वाहून गेले. या आपत्तीत दोन व्यक्तींना आपला जीवही गमवावा लागला. अलीकडच्या काळातील हा भीषण प्रसंग होता. काणकोणवासीयांना आधाराची गरज आहे व त्यासाठी निश्चित कार्यक्रम आखून या लोकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री कामत म्हणाले.
दरम्यान, या नुकसानीचा खातेनिहाय तपशीलवार अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात घरे व इतर जीवनावश्यक वस्तू-१९.८० कोटी, उद्योग-३.३० कोटी, कृषी-१७.८५ कोटी, रस्ते-३० कोटी, पाणी पुरवठा-२ कोटी, वन-१.८५ कोटी, जलसंसाधन खाते-४८ कोटी, आरोग्य-२.३५ कोटी, वीज-५ कोटी व इतर जीवनावश्यक वस्तू-४०.३४ लाख अशी अधिकृत आकडेवारी नोंद करण्यात आली आहे. काणकोणवासीयांसाठी मंत्रिमंडळातील प्रत्येक सदस्याने आपले दोन महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री मदतनिधीसाठी देण्याचे मान्य केले आहे. याबरोबर राज्यातील उद्योजक, समाजसुधारक, कॉर्पोरेट्स व इतरांना सढळहस्ते मदत करण्याचे आवाहन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स, "सीआयआय', खनिज निर्यातदार संघटना व कंत्राटदार संघटनेकडे चर्चा करून पुनर्वसनाच्या कामात त्यांची मदत घेण्याबाबतही विचारविनिमय केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
या हानीचा संपूर्ण तपशील केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना उद्या ९ रोजी सादर करण्यात येईल. पंतप्रधान व कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनाही या नुकसानीचा तपशील सादर करू, अशी माहिती मुख्यमंत्री कामत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सरकारने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ९३ घरे पूर्णपणे कोसळली आहेत तर सुमारे शंभर घरांची मोडतोड झाली आहे. घर कोसळलेल्या प्रत्येक कुटुंबाकडे जाऊन त्यांच्या घराचे क्षेत्रफळ व घर कसे हवे याची माहिती मिळवून त्याप्रमाणे पुढील नियोजन केले जाईल, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री कामत यांनी दिली . आंध्रप्रदेश व कर्नाटकात भीषण पूरस्थिती उद्भवली आहे. या राज्यांना पत्र पाठवून त्यांना धीर देण्यात आला असून कोणतीही मदत पाहिजे असल्यास तात्काळ पुरवण्याची तयारीही गोव्याने दर्शवली आहे.
चौकशी समितीची स्थापना
काणकोणात उद्भवलेल्या भीषण जलप्रलयाची नेमकी कारणे शोधून काढण्यासाठी राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सतीश शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीवर प्रा. सुलोचना गाडगीळ,डॉ. डी. शंकर, हवामान खात्याचे संचालक के. व्ही. सिंग,जलसंसाधन खात्याचे संचालक संदीप नाडकर्णी, अग्निशमन दलाचे संचालक अशोक मेनन यांची नियुक्ती करण्यात आली असून विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण खात्याचे संचालक मायकल डिसोझा हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

No comments: