Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 4 October, 2009

...आता सामना महासंकटाशी

पूर ओसरला, आपद्ग्रस्त सैरभैर; सरकारी यंत्रणा कोलमडली
आगोंद, काणकोण व मडगाव, दि. ३ (प्रतिनिधी): अनेकांचे संसार डोळ्यादेखत बुडालेले, खायची भ्रांत, प्यायला पाणी नाही, घालायला कपडे नाहीत, झोपायचे कोठे हा यक्षप्रश्न आ वासून उभा, सारे भवितव्य अंधकारमय, सुस्त सरकारी यंत्रणा अशी दारुण वेळ काणकोण भागातील आपद्ग्रस्तांवर ओढवली आहे. या महासंकटाशी कसा सामना करायचा हेच त्यांना समजेनासे झाले आहे. सरकारी पातळीवर मदतकार्य जोरात सुरू असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात लोकांपर्यंत फारशी मदत पोहोचलेली नाही, हेच विदारक चित्र आज अनेक ठिकाणी दिसून आले.
काणकोण तालुक्यात हाहाकार माजवणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतली असली तरी शुक्रवारी पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसामुळे सुमारे १०० हून अधिक घरे कोसळली तर ३०० हून अधिक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, काल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले पैंगीण येथील बाबुली महाले यांचा मृतदेह सापडला असून संदीप पैंगीणकर यांचा शोध सुरू आहे. भाटपाल येथून बेपत्ता झालेला सुनील पागी आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाला.
दक्षिण गोव्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी आज नुकसान भरपाईचा अंदाज घेण्याच्या कार्यात मग्न होते. सर्व तलाठ्यांनी गावागावात जाऊन नुकसानीचा अंदाज घेतला. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक यांनी आज काणकोण मामलेदार कार्यालयात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पावसाचे पाणी घरात घुसल्याने त्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याचे प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केले. किंदळे भागात ७००, श्रीस्थळ भागात १००, पैंगीण, इतर आदी भागात मिळून एकूण २००० बेघर लोकांची खाण्यापिण्याची व राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. नाईक यांनी दिली. काणकोणवासीय जोपर्यंत मानसिक धक्क्यातून सावरत नाहीत व परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत सरकारची व्यवस्था सुरूच राहील, अशी माहिती त्यांनी दिली. नुकसानीचा आकडा सध्या १५ कोटीच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. निश्चित आकडा उद्या स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी शासकीय लवाजम्यासह आज पूरग्रस्त भागांना भेट दिली आणि आपद्ग्रस्तांना मदतीचेही आश्वासन दिले. तसेच लोकांना ताबडतोब मदत करा, असे आदेशही त्यांनी शासकीय यंत्रणेला दिले. मात्र, या परिस्थितीत आश्वासनापेक्षा प्रत्यक्ष मदतीचीच लोकांना खरी गरज असल्याचे या भागाला भेट दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. ही वेळ राजकारण करण्याची नसून सर्वस्व गमावलेल्या आपद्ग्रस्तांना धीर व मदत देण्याची आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कृती करण्यावर सरकारने भर दिल्यास ते अधिक उपकारक ठरेल, असेही त्यांनी बोलून दाखवले.
दरम्यान, पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी याच मुद्यावर भर दिला.
तळपण व गालजीबाग नदीने आजही रुद्रावतार धारण केला, जवळजवळ दीड कोटीच्या घरात हानी झाल्याचे मामलेदार कार्यालयातून सांगण्यात आले. गावडोंगरी व खोतीगावातील अनेक वाड्यांवरील संपर्क तुटला आहे. मणे खोतीगाव येथे सर्व घरांत पावसाचे पाणी शिरले तर तामणमळ, खोतीगाव येथील काही घरांत पाणी शिरले. बाबरे लोलये येथील दोन्ही पुलांचे कठडे कोसळले असून दाभले पुलाचा कठडा कोसळला आहे. बाबरे येथील नागरिकांना सावधगिरीचा उपाय म्हणून इतरत्र हालवण्यात आले आहे. तालुक्यातील दूरध्वनी आणि वीजपुरवठा अनेक ठिकाणी खंडित झालेला आहे.
पैंगीण येथील सावट, वाळशी, अर्धफोंड, महालवाडा, पर्तगाळ येथील २५ हून अधिक घरे कोसळली असून घरातील भांडी कुंडी, सिलिंडर आदी वस्तू वाहून गेल्या आहेत. मोर्खड येथील चार घरांत पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काणकोण पालिका क्षेत्रातील पाणयेफोंड येथील अनंत पागी, पंता पागी, मंजुळा मोर्खडकर, उल्हास पागी, प्रेमानंद पागी, हरिश्चंद्र पागी, मुड्डो पागी, धनंजय पागी यांची घरे जमीनदोस्त झाली.
देळे काणकोण येथे एकूण सात घरांत रेतीमिश्रीत पाणी घुसल्याने घरातील सामान नष्ट झाले. या सातही घरांतील नागरिकांनी जवळचे नातेवाईक तसेच निराकार देवालयाच्या सभागृहात आश्रय घेतला आहे. पाण्याच्या प्रवाहात त्यांचे सर्व सामान वाहून गेले असून भरण्यासाठी ठेवण्यात आलेले गॅस सिलिंडर वाहून गेले आहेत, अशी माहिती कृष्णा गावकर यांनी "गोवादूत'ला दिली.
याठिकाणी शेखर गावकर, श्रीकांत गावकर, नारायण गावकर, पंढरी गावकर, बाळकृष्ण गावकर यांचे बरेच नुकसान झाले. भाटपाल येथे दिनेश देसाई यांचे घर पाण्याखाली गेले असून अजूनही पाण्याचा प्रवाह जोरदार आहे. माशे येथे निराकार देवालयाच्या चाळीवर मोठा दगड कोसळल्याने बरेच नुकसान झाले आहे. सादोळशे येथे पंच विपिन यांच्या घरात पाणी शिरल्याने पलंग पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले.
बोकडेमळ येथील वीज ट्रान्सफॉर्मर पाण्याच्या प्रवाहामुळे कोसळला असून वीजखात्याचे बरेच नुकसान झाल्याची माहिती वीज अभियंता विनायक माशेलकर यांनी दिली. वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांनी अन्य अधिकाऱ्यांसोबत येथे येऊन पाहणी केली.
अर्धफोंड येथे अवर लेडी ऑफ फातिमा कपेलातील सर्व विद्युत उपकरणे तसेच बसण्याचे लाकडी बाग जळीस्थळी पडल्याचे आढळून आले. जवळच असलेल्या क्रीडा संकुलातील साहित्य तसेच सुमारे १०० खुर्च्या वाहून गेल्याची माहिती पेरीशचे सदस्य श्री. फर्नांडिस यांनी सांगितले.
दाबेल येथे चंद्रकांत वेळीप यांचे घर जमीनदोस्त झाले असून इतर ३-४ घरांत पाणी घुसल्याने नुकसान झाले. अर्धफोंड येथे जयवंत नाईक, चंद्रकांत नाईक, विनोद नाईक यांच्या घरांसह एकूण ४ घरे वाहून गेली. पाण्याचा प्रवाह एवढा जबरदस्त होता की पत्नी आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी घराच्या मागील दारातून ढकलून देऊन येथून पळ काढला, अशी माहिती जयवंत नाईक यांनी दिली. आगोंद देसाईवाडा येथील जुवाझीन फर्नांडिस यांचे घर जमीनदोस्त झाले तर अन्य तीन घरांत रेतीमिश्रीत पाणी गेल्याने नुकसान झाले. येथील सहा कुटुंबांना बॅरेलवर बांबू बसवून पाण्याबाहेर काढण्यात आले.
पैंगीण राष्ट्रीय महामार्गावर मोठे भगदाड पडल्याने मडगाव - कारवार मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आज संध्याकाळी पाइप घालून भगदाड बुजवण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. संध्याकाळपर्यंत मोठ्या गाड्यांची वर्दळ सुरू झाली. भाटपाल येथे राष्ट्रीय महामार्गावर लांबलचक रांगा लागून राहिल्या होत्या. काल याच ठिकाणी एक कार व एक व्हॅन पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेली होती, नंतर दोरीच्या साह्याने बांधून ठेवून वाहने वाचवण्यात आली होती. या ठिकाणी असलेले बार पूर्णपणे वाहून गेले.
भाटपाल येथील डॉ. संजय कुराडे यांची अळंबी पैदास करण्याची फॅक्टरी पूर्णपणे वाहून गेल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. खोतीगाव भागातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
दरम्यान, काल २ ऑक्टोबर रोजी तालुक्यात एकूण १४ इंच पावसाची नोंद झाल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता गोपीनाथ देसाई यांनी दिली.
परीक्षा रद्द, बाजारपेठेत सामसूम
काल काणकोण तालुक्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याने आज सहामाहीच्या सुरू असलेल्या परीक्षा बहुतेक शाळांनी रद्द करून सुट्टी जाहीर करण्यात आली. कालच्या पावसाचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला. आठवड्याचा बाजार असूनही आज सर्वत्र सामसूम दिसून आली.
मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, खासदार फ्रान्सिस सार्दिन, साबांमंत्री चर्चिल आलेमाव, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, माजी आमदार इजिदोर फर्नांडिस आदींनी पावसाचा तडाखा बसलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. गृहमंत्र्यांनी गालजीबाग, तळपण, खोतीगाव आदी भागांना भेट दिली. शासनातर्फे योग्य मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पूरस्थिती नियंत्रण कक्षांची स्थापना
राज्यात विविध भागांत निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे सरकारने उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय व सचिवालय पर्वरी येथे नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. कुणालाही या कार्यालयांशी संपर्क साधायचा असल्यास उत्तर गोवा - २४२६१४८, दक्षिण गोवा - २७१४८९८ तर सचिवालय कार्यालय - २४१९५५ ० - २४१९७६७ (सुरक्षा रक्षक) फॅक्स - २४१९४७७ असा आहे.
------------------------------------------------------------------
मदतकार्याचा वेग वाढवण्याची गरज : पर्रीकर
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज संध्याकाळी आपद्ग्रस्त भागाला भेट दिली. विविध भागांतील पूरपरिस्थितीची पाहणी करून त्यांनी लोकांना धीर देताना सरकारी पातळीवर सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. येथील परिस्थिती लक्षात घेता सरकारी यंत्रणेने आपले कार्य अधिक जोरात सुरू करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. मदत कार्य धीम्या गतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार विजय पै खोत, आमदार दामोदर नाईक उपस्थित होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी उशिरा संध्याकाळी याठिकाणी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले. यावेळी आमदार रमेश तवडकर, भाजयुमोचे अध्यक्ष आशिष शिरोडकर, रुपेश महात्मे आदी हजर होते. काणकोण येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन मदतकार्य सुरू असून काही ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
------------------------------------------------------------------
काणकोणच्या पुनर्वसनासाठी आमदार
विजय पै खोत यांच्याकडून १०० कोटींची मागणी

काणकोण परिसरात पावसाने रुद्रावतार धारण केल्याने शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. अनेक घरे जमीनदोस्त झालेली असून संततधार पावसामुळे भिजलेली घरे येत्या काही दिवसांत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरातील वस्तू, टीव्ही, फ्रीज आदी उपकरणे, लाकडी सामान, भांडी कुंडी तसेच वह्यापुस्तके व कागदपत्रे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. या परिसरातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. खोतीगाव - गुळे भागातील बागायती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता असून काणकोणवासीयांना त्वरित मदत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी काणकोणच्या पुनर्वसनासाठी राज्यसरकारने केंद्राकडे किमान १०० कोटी रुपयांची मागणी केली पाहिजे, असे काणकोणचे आमदार विजय पै खोत यांनी " गोवादूत' शी बोलताना सांगितले. सरकारने वेळ न दवडता त्वरित मदत उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.

No comments: