Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 17 September, 2009

प्रा. राजेंद्र केरकर यांच्याकडून पुरस्कारांसाठी गावची बदनामी

केरी येथील बैठकीत ग्रामस्थांचा आरोप

केरी सत्तरी, दि. १६ (वार्ताहर) - राजेंद्र केरकर यांनी केवळ पुरस्कारांसाठी गावाला बदनाम केले आहे. न घडलेल्या घटनांची माहिती पुरवून प्रसिद्धी मिळविली आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आज केरी सत्तरी येथील सातेरी केळबाय आजोबा देवस्थानच्या महाजन आणि प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आली.
केरकर व विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेच्या सदस्यांनी महाराष्ट्र व कर्नाटकात दोन महिने फिरून वाघाचे अवशेष गोळा केले व केरी सत्तरी येथे आणून टाकले व स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हे नाटक रचले असा आरोप प्रभाकर माजिक यांनी केला. माजिक समाजाची जगभरात बदनामी करणे, वाघाची हत्या झाल्याची खोटी तक्रार देणे, गावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर वाईट प्रसिद्धी देणे, त्याचप्रमाणे गावातील पुरोहिताला वाईट वागणूक देणे अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी केरीच्या आजोबा देवस्थानात बैठक बोलावण्यात आली होती.
प्रभाकर माजिक पुढे म्हणाले की, राजेंद्र केरकर हा गावाचे पर्यावरण सांभाळण्यासाठी काहीच करत नाही. ग्रामस्थ व आमदारांनी पर्यावरण सांभाळले आहे. पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, राजेंद्र केरकर यांनी आम्हाला भरपूर वापरले व स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी आता आम्हाला फेकून देण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, राजेंद्र केरकर यांना मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा खोटेच आहेत. संपूर्ण भारतभर व देशाबाहेरही पर्यावरणवाद्यांची परिचित संघटना असून स्वतःच्या हव्यासासाठी ते सगळे नाटके करत आहेत.

नामदेव केरकर म्हणाले की, राजेंद्र केरकर यांनी फक्त पुरस्कार मिळवण्यासाठीच कारस्थान केलेले आहे. ती फक्त पुरस्कारांसाठी एक हपापलेली व्यक्ती आहे. राजेंद्र केरकर यांची बातमी कोणत्याही वृत्तपत्र कार्यालयात आल्यास त्याची अगोदर शहानिशा करावी आणि मगच ती प्रसिद्धीस द्यावी, त्यांच्या बऱ्याचशा बातम्या खोट्या असतात. गावामध्ये जी मराठी किंवा कोकणी वर्तमानपत्रे उपलब्ध असतात त्या वर्तमानपत्रांमध्ये ते काहीच प्रसिद्ध करत नाहीत. ते इंग्रजी वर्तमानपत्रात जी गावात वाचली जात नाहीत अशांमध्ये ते प्रसिद्धी देत असतात.
आजोबा देवस्थानचे अध्यक्ष गणेश ऊर्फ गणपत गावस यांनी सांगितले की, आज जी बैठक आहे त्या बैठकीबद्दल मला कोणतीच कल्पना नाही. आज सकाळी वर्तमानपत्रात बातमी वाचल्यानंतरच मला बैठक असल्याचे समजले. जर त्यांनी आम्हाला अगोदर सांगितले असते तर बैठकीची सर्व तयारी समितीतर्फे करण्यात आली असती. वापरण्यात आलेले लेटरहेड हे देवस्थान समितीचे नसून देवस्थान समितीचा पत्रव्यवहार लेटरहेडने होत नाही, जे वापरण्यात आलेले लेटरहेड त्या लेटरहेडवर रजिस्टर नंबरही नव्हता व शिक्काही नव्हता.
संदीप माजिक यांनी सांगितले की, वर्तमानपत्रांनीं राजेंद्र केरकर यांच्या बातम्या पुष्कळ देऊन त्यांची प्रसिद्धी केली आहे. पण ज्यावेळी माझ्या भावाला सूर्यकांत माजिकला मारहाण करण्यात आली त्याची बातमी मात्र एकदाच प्रसिद्ध झाली. रघुनाथ माजिक म्हणाले की, गावामध्ये वाघ मारलेलाच नाही. यासंबंधी असंख्य बातम्या राजेंद्र केरकरने प्रसिद्ध करून गावाचे नाव बदनाम केलेेले आहे. यावेळी अंकुश गावस व आपा पांडू माजिक या ज्येष्ठ महाजनांनीही गावाचे नाव बदनाम केल्याचे सांगितले. राजेंद्र केरकर यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही त्याला बहिष्कृत केले नाही. व त्यांच्या कुटुंबीयांना देवळात येण्यास मनाई केलेली नाही. ज्यावेळी त्यांचा चुलत भावाला याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मी ज्यावेळी नारळ घेऊन देवळात गेलो तेव्हा तेथील अंकुश गावस यांनी नारळ राजेंद्र केरकरचा तर नाही ना, असा प्रश्न केला. त्यांचा नारळ असल्यास आपल्याला महाजनांना विचारावे लागेल, असे म्हणण्यात आले. पण तो नारळ सुहास पारोडकर हे स्वतः घेऊन गेले होते.यावेळी हळीत, माजिक आणि गावकर मंडळी उपस्थित होती. अंदाजे ५० - ६० लोक उपस्थित होती.
दरम्यान, लोकशाहीत आरोप प्रत्यारोप होतच असतात, पण सत्य काय हे जनतेसमोर लवकरच येईल, अशी प्रतिक्रिया राजेंद्र केरकर यांनी "गोवादूत'शी बोलताना व्यक्त केली.

No comments: