Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 15 September, 2009

गुजरातेत भाजपने पाच जागा जिंकल्या

नरेंद्र मोदींचा करिष्मा कायम
उत्तराखंडामध्ये स्पष्ट बहुमत

अहमदाबाद, दि. १४ - गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दमदार नेतृत्वाखाली सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पाच जागा जिंकून आपले वर्चस्व कायम राखले आहे. दोन जागांवर विरोधी कॉंग्रेस पक्षाचे आमदार विजयी झाले.
जसदान , चोटीला , देहगाम , दंता , सामी हारीज या मतदारसंघात गेल्यावेळी कॉंग्रेसला विजय मिळाला होता. यावेळी भाजपने या जागा जिंकून कॉंग्रेसला जोरदार तडाखा दिला. गेल्यावेळी भाजपने जिंकलेली कोडिनारची जागा यावेळी मात्र कॉंग्रेसने जिंकली. त्याशिवाय धोराजी मतदारसंघात विजय मिळवून कॉंग्रेसने एकूण दोन जागा जिंकल्या.
गेल्या लोकसभा निवडणुकीतील भाजपची कामगिरी व जुनागढ महापालिकेतील कॉंग्रेसच्या विजयानंतर या पोटनिवडणुकीतील यशाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मोठाच दिलासा मिळाला आहे. त्यातूनच त्यांची लोकप्रियता कायम असल्याचे दिसून येते. पोटनिवडणुकांतील हा विजय गुजरातेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला.
उत्तराखंडमध्ये स्पष्ट बहुमत
भाजपसाठी आणखी एक समाधानाची बाब म्हणजे उत्तराखंडमधील यश. तेथे विधानसभेच्या विकासनगर मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकल्याने उत्तराखंडमधील सत्ताधारी भाजप सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पोटनिवडणुकीत भाजपने विकासनगरमध्ये ५९६ मतांनी निसटता विजय संपादून ७० आमदारांच्या विधानसभेत ३६ जागा मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. उत्तराखंड भाजपमध्ये त्यामुळे चैतन्य संचारले आहे.
विकासनगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपच्या कुलदीप कुमार यांनी कॉंग्रेसच्या नवप्रभात यांना केवळ ५९६ मतांनी चीतपट केले. या अत्यंत चुरशीच्या लढतीत कुमार यांना २४ , ९३४ आणि प्रभात यांना २४ , ३३८ मते पडली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाचही जागा गमावल्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री बी. सी. खंडुरी यांना राजीनामा द्यावा लागला होता. तथापि, पोटनिवडणुकीतील आजच्या विजयामुळे विद्यमान मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल निशांक यांच्या फेट्यात मानाचा तुरा खोवला गेला आहे. भाजप सरकारला उत्तराखंड क्रांती दलाच्या आमदारांचाही पाठिंबा आहे.

No comments: