Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 14 September, 2009

केरी सत्तरी वाघ अवशेषप्रकरणी हेराफेरीचा पर्यावरणप्रेमींचा आरोप

"त्या' अहवालाच्या सत्यतेबाबत संशय
पणजी,दि. १३ (प्रतिनिधी) - केरी सत्तरी येथील मृत जनावराचे मिळालेले अवशेष हे कथित वाघाचे नाहीत,अशी माहिती देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने पाठवलेल्या प्राथमिक अहवालात देण्यात आल्याने या प्रकरणांत वन खाते राजकीय दबावाखाली वावरत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या अहवालातील सत्यतेकडे जाणीवपूर्वक हेराफेरी केली जाण्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मिळवलेले अवशेष आपण स्वतः पाहिले होते व ते वाघाचेच होते यात अजिबात दुमत नाही,अशी प्रतिक्रिया प्रा.राजेंद्र केरकर व सर्पमित्र अमृतसिंग यांनी व्यक्त केली आहे. प्रा.राजेंद्र केरकर यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते तर अमृतसिंग हे या अवशेषाच्या पंचनाम्यावेळी पंच म्हणून हजर होते. याप्रकरणी वन खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबतच त्यांनी संशय उपस्थित केला असून हे अधिकारी राजकीय दबावाखाली हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात केरी सत्तरी येथे पट्टेरी वाघाची हत्या झाल्याच्या संशयावरून वन खात्याने तपास चालवला होता. यावेळी त्यांना मृत जनावराचे अवशेष रानात सापडले होते. या अवशेषांत पंजा,हाडे, दात व सांडलेले रक्तही आढळलेले होते. वन खात्याने हे अवशेष देहरादून येथे भारतीय वन्यजीव संस्थेकडे फोरेन्सीक अहवालासाठी पाठवले होते. हे अवशेष हे वाघाचेच आहेत याची पूर्ण जाणीव वन खात्यातील अधिकाऱ्यांना झाल्याने त्यांनीही वाघाची हत्याप्रकरणी चौकशीला चालना दिली व अनेक संशयितांना अटक करून त्यांची जबानीही नोंदवली. ही चौकशी अंतिम टप्प्यात पोहचली असतानाच देहरादून येथून हे अवशेष वाघाचे नाहीतच असा प्राथमिक अहवाल मिळाल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबतच संशयाचे वातावरण पसरले आहे. मुळातच हा अहवाल उशिरा आला व त्यात तो प्राथमिक यामुळे हा नक्की काय प्रकार आहे,असा सवाल पर्यावरणप्रेमींना पडला आहे.
वन्यजीव गुन्हा नियंत्रण विभागाला पाचारण करा
राज्य वनखाते गेले सात महिने केरी सत्तरी येथील वाघाच्या हत्येचा उलगडा लावत असले तरी खात्याने याप्रकरणी वन्यजीव गुन्हा नियंत्रण विभागाची मदत घेतली नसल्याचे उघडकीस आले आहे.देशात विविध ठिकाणी वाघांची शिकार होण्याचे प्रकार घडतात व त्यामुळेच वाघ्र कृती दलाने गेल्यावर्षी या विभागाची स्थापना केली होती. या प्रकरणी एका वृत्तसंस्थेने या विभागाच्या उपसंचालक तेजस्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तिने गोवा सरकारने या प्रकरणी अधिकृत कोणतीही माहिती विभागाला दिली नसल्याचे सांगितले. हा विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो त्यामुळे या विभागामार्फत चौकशी करण्याची राज्य सरकारची इच्छा असेल तर तसे अधिकृत पत्र विभागाला करावे लागेल, असेही त्या म्हणाल्या. वनक्षेत्रात होणाऱ्या जनावरांच्या शिकारीबाबत तपास करण्यासाठी खास हा विभाग स्थापन करण्यात आला आहे.
दरम्यान, वाघ हत्या प्रकरणी वन खात्यावर राजकीय दबाव वाढत असल्याचीही चर्चा आहे.याप्रकरणी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी संशयित म्हणून चौकशीसाठी पाचारण केलेल्या लोकांनी छळवणूकीची तक्रार पोलिसांकडे केली आहे.या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर तीन वन अधिकाऱ्यांविरोधात तक्रार नोंदही करून घेतली आहे,अशीही माहिती मिळाली आहे.

No comments: