Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 18 September, 2009

कळंगुटचा बालक डेंग्युचा पहिला बळी

ऑगस्टपर्यंत ६ हजार मलेरिया रुग्ण

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - स्वाईन फ्ल्यूच्या पाठोपाठ गोव्यात डेंग्यू ज्वराने डोके वर काढले असून गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार घेत असताना कळंगुट येथील गॉडफेरी फर्नांडिस या सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य ती चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे आरोग्य खात्याचे उपसंचालक डॉ.दीपक काबाडी यांनी सांगितले. गॉडफेरी हा या वर्षातील डेंग्यू ज्वराचा पहिला बळी ठरला असून आज सकाळी ७.२० वाजता त्याचे निधन झाले. काल सायंकाळी त्याच्या रक्ताचे नमुने "आयजीएम एलायझा' चाचणीसाठी पाठवण्यात आले असून अद्याप त्याचा अहवाल आलेले नाही. परंतु, प्राथमिक तपासणीवरून आणि लक्षणावर त्याला डेंग्यूची लागण झाली असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
काल सायंकाळी गॉडफेरी याला म्हापसा येथील एका खाजगी इस्पितळातून गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात हालवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन वॉर्ड क्रमांक १३४ मध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र उपचाराला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता, त्यातच आज सकाळी त्याचे निधन झाले, असे डॉक्टरांनी सांगितले.
अधिक माहितीनुसार गॉडफेर याला गेल्या पाच दिवसांपासून ताप येत होता. तसेच पोटात दुखत होते आणि उलटी येत होती. त्यामुळे दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी त्याला म्हापसा येथील एका खाजगी इस्पितळात त्याला दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांची प्रकृती अधिक गंभीर बनल्याने त्याला दि. १६ रोजी सायंकाळी त्याला गोमेकॉत हलवण्यात आले होते.
कळंगुट, तिसवाडी, लोटली या परिसरात डेंग्यू ज्वराने डोकेवर काढले असून अनेकांना या तापाची लागण झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर ०९ या नऊ महिन्यात ४९ जणांना डेंग्यू तापाची लागणी झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून यातील अनेकांनी प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. काबाडी यांनी दिली.
डेंग्यू नंतर मलेरिया तापानेही थैमान घातले असून एका ऑगस्ट महिन्यात ५०३ मलेरिया तापाची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर, गेल्या आठ महिन्यांत ३ हजार ४५४ जणांना या मलेरिया तापाची लागण झाली आहे. यातील ७६५ जणांना "फाल्सिफेरम' ची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या २००८ साली जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत ६ हजार ३६५ जणांना मलेरियाची लागण झाली होती तर, १ हजार ८२३ जणांना फाल्सिफेरमची लागण झाली होती. त्यामुळे यावर्षी हे प्रमाण खूपच कमी असल्याचा दावा डॉ. काबाडी यांनी केला. यातील ८० टक्के हे बिगरगोमंतकीय कामगार असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments: