Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 16 September, 2009

उसगावात दोन दुकाने मध्यरात्री आगीत खाक साडेसात लाखांची हानी

तिस्क-उसगाव, दि.१५ (प्रतिनिधी): तिस्क उसगाव येथे काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एका इमारतीतील दोन दुकानांना आग लागून आतील सामान व फर्निचर जळून खाक झाले.यामुळे आगीच्या दुर्घटनेत दोन्ही दुकानांचे मिळून सुमारे साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. या दुकानांना लागलेल्या आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. आगीत भस्मसात झालेले "श्रीनाथ स्वीट मार्ट' हे दुकान किशोर वैष्णव यांच्या मालकीचे आहे. तसेच "रामदेव इलेट्रीकल' हे दुकान भगतराम पुरोहित यांच्या मालकीचे आहे. या दोन्ही दुकानांतील आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला दोन पाण्याचे बंब पाणी लागले,अशी माहीती देण्यात आली.
तिस्क - उसगाव येथे काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास उच्च दाबाचा वीजप्रवाह सुरू झाल्याने अनेक रहिवाशांच्या घरातील फ्रिज, फॅन, टी.व्ही. फॅन इत्यादी उपकरणे जळून गेली. त्याच वेळी या दोन्ही दुकानांना आग लागली असावी, असा कयास येथील रहिवाशांकडून वर्तवण्यात आला.
सविस्तर माहितीनुसार, सदर इमारतीत पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या अँथनी डिसोझा यांच्या कुंटुंबीयांना आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास जळक्या धुराच्या वासाने जाग आली. त्यांनी इमारतीच्या गच्चीत येऊन पाहिले असता त्यांना इमारतीच्या तळमजल्यावरील दोन दुकानांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित फोंडा पोलिस स्थानकाला फोन करून या घटनेची माहिती दिली. फोंडा पोलिस स्थानकावरून पहाटे ३.१५ वाजता या घटनेची माहिती तिस्क उसगाव पोलिस चौकीच्या पोलिसांना कळविण्यात आली. याच वेळी पहाटे ३.१५ वाजता पणजी पोलिस स्थानकावरून या घटनेची माहिती फोंडा अग्निशमन दलाला देण्यात आली. पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचले त्यावेळी लोकांनी त्यांना विलंब झाल्याच्या कारणावरून धारेवर धरले. स्थानिक लोकांनी "श्रीनाथ स्वीट मार्ट' व "रामदेव इलेक्ट्रॉनिक' या दोन दुकानांना लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास फोंडा अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही दुकानांचे शटर काढून आगीवर नियंत्रण मिळविले व दोन्ही दुकानांना लागलेली आग पूर्ण विझविली. यामुळे दोन्ही दुकानांतील काही सामान आगीपासून बचावले. यावेळी येथे फोंडा पोलीस स्थानकाचे व तिस्क उसगाव पोलीस चौकीचे पोलीस व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
या आगीत "श्रीनाथ स्वीट मार्ट ' या मिठाईच्या दुकानातील फर्निचर, २ फ्रीज व इतर वस्तू पूर्णपणे जळल्या. "रामदेव इलेट्रीकल' या दुकानातील फक्त विजेवर चालणारे व इलेट्रॉनिक सामान आगीत जळून भस्म झाले.
दरम्यान, या दोन्ही दुकानांना दोन वर्षापूर्वी अशीच आग लागली होती. त्यावेळी आग दुपारच्या वेळी लागली होती. दुकानांना आग नेमकी कशामुळे लागली यांचे कारण मात्र समजू शकले नाही. या संदर्भात येथील लोकांत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
दरम्यान, उच्च दाबाचा वीज प्रवाह सुरू झाल्याने रात्रपाळीला असलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी त्वरित या भागातील वीजपुरवठा खंडित केला. या भागात आज दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नव्हता. वीज खात्यातर्फे येथील वीज फीडरवरील दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे.

No comments: