Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 16 September, 2009

बायंगिणीला कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा निर्णय स्थगित

ज्योकीम आलेमाव यांचे घूमजाव
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): कालपरवापर्यंत बायंगिणी येथील नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत ठाम असलेले नगर विकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी अचानकपणे आपल्या भूमिकेत परिवर्तन करून अखेर बायंगिणी कचरा प्रकल्पाचे नियोजित काम स्थगित ठेवण्यात आल्याची घोषणा आज केली. दरम्यान, महापालिकेच्या कचऱ्यासाठी उत्तर गोव्यात सभागृह समितीने एक जागा पाहिली आहे व लवकरच त्याबाबत शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार कोलवाळ अथवा वझरी ही नावे सरकारच्या विचारार्थ असल्याचे समजते. बायंगिणी प्रकल्पामुळे चर्च परिसराला धोका संभवतो या मुद्याने जोर धरल्याने ती जागा रद्द करण्यात आली, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
आज पर्वरी येथे राज्यातील सर्व पालिका अध्यक्ष तथा मुख्याधिकारी यांची संयुक्त बैठक त्यांनी बोलावली होती. या बैठकीत त्यांनी प्रत्येक पालिकेला येत्या सहा महिन्यांच्या आत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले व याप्रकरणी सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळेल, असेही आश्वासनही दिले. यानिमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बायंगिणी कचरा प्रकल्पाबाबत काय स्थिती आहे, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता हा नियोजित प्रकल्प स्थगित ठेवण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यामागील कारणे काय, असे विचारले असता बायंगिणीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानेच हा निर्णय घेणे भाग पडले, असा खुलासा त्यांनी केला.
दरम्यान, बायंगिणी येथील कचरा प्रकल्पाविरोधात चर्चकडून पुढाकार घेण्यात आला होता. यानिमित्ताने काही प्रमुख धर्मगुरूंनी सर्व मंत्री तथा आमदारांची भेट घेऊन बायंगिणीला विरोधही दर्शवला होता. बायंगिणीचे जोरदारपणे समर्थन करणारे ज्योकीम आलेमाव यांचीही भेट या चर्च धर्मगुरूंनी घेतली व त्यामुळेच ज्योकीम यांना आपली भूमिका बदलणे भाग पडले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
दरम्यान, यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ज्योकीम यांनी १४ पैकी १२ पालिकांनी कचरा प्रक्रियेसाठी जागा निश्चित केल्याची माहिती दिली. म्हापसा व कुडचडे पालिकेबाबतची प्रक्रिया सुरू आहे. काणकोण, सांगे, साखळी व कुंकळ्ळी येथे जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात एकमेव डिचोली पालिकेतर्फे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे व हा प्रकल्प यशस्वीपणे कार्यरत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित पालिकाध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी डिचोली प्रकल्पाला भेट देऊन त्याची पाहणी करण्याचे आवाहनही केले. डिचोली येथील हा प्रकल्प उभारलेल्या कंपनीला केवळ ५० टक्के खर्च देण्यात आला आहे व एक वर्ष हा प्रकल्प यशस्वीपणे चालला व त्याची विश्वासार्हता सिद्ध झाली की उर्वरित रक्कम देण्याचा करारही या कंपनीकडून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आपण हे खाते स्वीकारण्यापूर्वी केवळ वास्को व मडगाव या दोनच पालिकांकडे कचरा प्रकल्पासाठी जागा होती पण आता एकूण १२ पालिकांनी जागा ताब्यात घेतली आहे, असा दावाही ज्योकीम यांनी केला.

No comments: