Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 14 September, 2009

हरित क्रांतीचे प्रणेते नॉर्मन बोरलॉग यांचे निधन

डल्लास, दि. १३ - हरित क्रांतीचे प्रणेते, कृषी शास्त्रज्ञ नॉर्मन बोरलॉग यांचे अमेरिकेतील डल्लास येथे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. जगभरात उपासमारीमुळे कोट्यवधी लोकांचे प्राण नॉर्मन बोरलॉग यांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांच्या निर्मितीमुळे वाचले. बोरलॉग यांच्या या योगदानाबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २० व्या शतकात जगासमोर दुष्काळाचे भयावह संकट घोंघावत असताना अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन कोट्यवधी लोकांना उपासमारीचा सामना करावा लागला असता. अशावेळी अधिक उत्पादन करणाऱ्या वाणांची निर्मिती करून बोरलॉग यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांच्या या संशोधनामुळे निर्माण झालेल्या वाणांमुळेच जागतिक अन्न उत्पादनात १९६० ते १९९० या कालावधीत दुपटीने वाढ झाली.
भारत व पाकिस्तान या दोन देशांना नॉर्मन बोरलॉग यांच्या संशोधनाचा सर्वाधिक फायदा झाला. ३० वर्षांच्या कालावधीत या दोन देशांतील अन्नधान्याच्या उत्पादनात चौपट वाढ झाली आहे. रोगाचा परिणामकारतेने प्रतिकार करणाऱ्या, तसेच गव्हाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची निर्मिती बोरलॉग यांनी केली. सहाव्या दशकाच्या सुरुवातीसच त्यांनी आपल्या लिखाणातून जगासमोर उपासमारीचे संकट उभे ठाकेल याचा इशारा दिला होता. भारताने त्यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले होते.

No comments: