Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 19 September, 2009

पालिका भविष्यनिर्वाह निधी घोटाळ्याच्या शक्यतेने खळबळ

मुरगावचे निवृत्त कर्मचारी निधीपासून वंचित
वास्को, दि. १८ (प्रतिनिधी)- मुरगाव पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा एक कोटीहून जास्त भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) पालिकेच्या खात्यातून गायब झाल्याचे वृत्त पालिका कर्मचाऱ्यांमध्ये पसरल्याने खळबळ माजली आहे.
मुरगाव नगरपालिकेने कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीसाठी वेगळे खाते ठेवले नसल्याची माहिती मुरगावचे मुख्याधिकारी एस.व्ही नाईक यांनी देऊन पालिकेच्या तिजोरीमध्ये सध्या पैशांची कमतरता असल्याने निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचा निधी देण्यास दिरंगाई होत असल्याचे सांगितले.
गोव्यातील"अ'दर्जामध्ये असलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या पगारातून कापण्यात येत असलेला भविष्यनिर्वाह निधीचा पैसा कुठे जातो, असा सवाल सध्या विचारला जात आहे. मुरगाव नगरपालिकेच्या सेवेतून गेल्या काही महिन्यांत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप त्याच्या निधीची रक्कम देण्यात आलेली नसल्याने येथील कर्मचाऱ्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या मनमानीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी "गोवा नगरपालिका कर्मचारी संघटना' वास्कोमध्ये पालिकेसमोर मोर्चा काढणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यासंबंधीचे निवेदन पालिकेला २७ ऑगस्ट रोजी देण्यात आले आहे. मुरगाव पालिकेमध्ये सुमारे २४० च्या आसपास कामगार असून प्रत्येक महिन्याला त्यांच्या पगारातील काही पैसे भविष्यनिर्वाह निधी म्हणून वजा करण्यात येतो. चार महिन्यांपूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना हा निधी देण्यात न आल्याने ही कोट्यवधीची रक्कम गेली कुठे, असा सवाल निर्माण झाला आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी "गोवा म्युनिसिपल वर्कर्स युनियन'चे सरचिटणीस ऍंड. अजितसिंग राणे यांच्याशी "गोवादूत'च्या प्रतिनिधीने संपर्क केला असता मुरगाव नगरपालिकेच्या व्यवस्थापनाकडून येथील कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या हक्काचा निधी त्यांना आता निवृत्तीनंतर न मिळाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. अशा प्रकारच्या सुमारे ११ तक्रारी आपल्याशी पोचल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

No comments: