Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 17 September, 2009

मिकी-चर्चिल घेणार विश्वजित राणेंची मदत?

मडगाव, दि.१६ (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव व आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्याविरुद्धची अपात्रता याचिका बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मागे घेण्यात उद्भवलेला तांत्रिक अडसर दूर करण्यासाठी आता संबंधितांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यामार्फत प्रयत्न करण्याच्या हालचाली सुरू केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आत्तापर्यंत केवळ उत्तर गोव्यात राजकीय अस्तित्व असलेल्या आरोग्यमंत्र्यांचे प्रस्थ आता या निमित्ताने दक्षिण गोव्यातही वाढण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
पर्यटनमंत्री मिकी पाशेको व आलेमांवबंधु यांच्यातील दिलजमाईचाच एक भाग म्हणून मिकी यांनी चर्चिल-रेजिनाल्ड विरुद्धची अपात्रता याचिका मागे घेण्याचे स्पष्ट संकेत दिले होते पण ही याचिका सहजासहजी मागे घेता येणार नाही असे आढळून आल्यावर व सभापतींकडूनही तशी भूमिका घेतल्याने नवे संकट उभे राहिले आहे. जोपर्यंत ही याचिका सभापतींकडे राहील तोपर्यंत चर्चिल व रेजिनाल्ड यांच्यावर टांगती तलवार लटकत राहणार असल्याने सरकारातीलच काही नेत्यांनी ही याचिका राहिलेली हवी आहे, अशीही माहिती मिळाली आहे. दरम्यान, काल रात्री वार्का येथे झालेल्या बैठकीत या याचिकेबाबतच्या सर्व कायदेशीर बाबी पडताळण्यात आल्या व पुढील व्यूहरचनाही निश्चित करण्यात आल्याची खात्रीलायक खबर मिळाली आहे.
मिकी यांनी याप्रकरणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची मदत घेण्याचे ठरवले आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. विश्वजित राणे यांच्या महत्त्वाकांक्षेला पूरक असाच हा प्रस्ताव ठरणार असे राजकीय गोटात बोलले जात आहे. अपात्रता याचिका मागे घेण्यास मुभा देणे किंवा ती सुनावणीस न घेता ढवळीकर बंधूंवरील याचिकांप्रमाणे कुजवत ठेवणे अशी ही योजना आहे व त्यामार्फत चर्चिल व रेजिनाल्ड यांना दिलासा देण्याची तयारी सुरू आहे. सभापती प्रतापसिंग राणे यांनी कायद्यावर बोट ठेवून स्वीकारलेली भूमिका या गोटासाठी निराशाजनक ठरली आहे व त्यामुळे या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. या प्रस्तावाला आरोग्यमंत्र्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो यावरच या व्यूहरचनेचे भवितव्य ठरणार आहे.
दरम्यान, कालच्या वार्का येथील गुप्त बैठकीत मिकी यांनी अस्वस्थ चर्चिल व ज्योकीम यांना दिलासा देताना आता काही जरी झाले तरी परस्परांना अंतर न देण्याच्या आणाभाका झाल्याचे वृत्त आहे. काहीही करून विरोधकांना धडा शिकवायचाच असाही निर्धार या बैठकीत झाल्याचीही चर्चा आहे. या बैठकीस मिकी, चर्चिल, ज्योकीम यांच्या व्यतिरिक्त या तिघाही नेत्यांच्या मर्जीतील काही पदाधिकारी व नेते हजर होते. मिकी हे उद्या किंवा परवा अपात्रता याचिका मागे घेण्याबाबतचा आपला अर्ज सभापतींकडे सादर करणार आहेत. या अर्जानंतरच खऱ्या अर्थाने राजकीय हालचालींना वेग प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या नव्या समीकरणामुळे सत्ताधारी गोटात कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे व सर्वांचे लक्ष या नव्या समीकरणावर खिळून आहे. मात्र या एकंदर घडामोडीत विश्वजित राणे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने ते नेमकी काय भूमिका घेतात त्यानुसारच पुढील शक्याशक्यतेला अर्थ राहणार आहे.

No comments: