Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 11 September, 2009

"लालाबाब' - चालती-बोलती संस्था

माणिक थळी
"लालाबाब' उर्फ मोहन राव म्हणजे "साधी राहणी अन्‌ उच्च विचारसरणी'. इंद्रधनुष्यात जशी सप्तरंगांची बेमालूम मिसळण आणि उधळण झालेली असते तसेच त्यांचे व्यक्तिमत्व. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ते स्वर्गवासी झाल्याची दुःखद वार्ता येऊन थडकली आणि मी कमालीचा अस्वस्थ झालो. मन भूतकाळात हरवले. डोळ्यांसमोर तरळले ते मंतरलेले दिवस. लालाबाब आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होईना. आजकाल "समाजसेवक' ही उपाधी कोणीही लावून स्वतःभोवती दिवे ओवाळून घेतो. लाला याला नक्कीच अपवाद होते. ते अखेरपर्यंत समाजासाठीच चंदनासारखे झिजले. शेवटचा श्वास घेतल्यानंतरही त्यांनी समाजसेवेचा वसा सोडला नाही. मरणोत्तर नेत्रदान करून त्यांनी साऱ्या समाजापुढे आगळा आदर्श घालून दिला. मृत्युपूर्वीच त्यांनी तशी तजवीज करून ठेवली होती. त्यामुळे आता दोघा अंधांना दृष्टी लाभणार आहे. समाजसेवेचे जणू त्यांना बाळकडूच मिळाले होते. त्यामुळे तरुण वयातच ते चालतीबोलती संस्था बनले होते. पणजीतील रोटरी आणि सम्राट क्लब या समाजपयोगी संस्थांच्या उभारणीत त्यांनी अनन्यसाधारण योगदान दिले. त्यांचे व्यक्तिमत्व कमालीचे पारदर्शी होते. "ओठात एक अन् पोटात भलतेच' असला व्यवहार त्यांना कधी जमलाच नाही. मधाळ वाणी, विनम्र स्वभाव आणि मनमिळाऊपणा या भांडवलाच्या बळावर त्यांनी अफाट लोकसंग्रह जमा केला होता. त्यामुळेच ते प्रत्येकाला आपले खूप जवळचे मित्र असल्यासारखे वाटायचे. रंजल्यागांजल्यांना मदत करताना त्यांनी कधीच आपला हात आखडता घेतला नाही. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी भरपूर आर्थिक मदत केली. त्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या या समाजकार्याचा कधीही दिंडोरा पिटला नाही. प्रसिद्धीपासून त्यांनी स्वतःला कायम चार हात दूर ठेवले. गोवेकरांच्या रंजनासाठी त्यांनी पणजीत "सिने नॅशनल' व म्हापशात "सिने अलंकार' ही चित्रपटगृहे उभारली. कला आणि नाट्यक्षेत्रात तर रसिकाग्रणी होते. एवढेच नव्हे तर त्यांनी विपुल काळ रंगशारदेची सेवा केली. नट आणि गायक म्हणून त्यांनी या क्षेत्रातही आपले आगळे स्थान निर्माण केले होते. त्यामुळेच की काय "संगीत कुलवधू' या नाटकात त्यांनी वठवलेली स्त्री भूमिका आजही अनेकांच्या स्मृतीपटलावर कायम आहे. या नाटकात त्यांच्या प्रवेशालाच रसिकांच्या टाळ्या पडायच्या. एकाच व्यक्तिमत्वाला किती लोभसवाणे कंगोरे असू शकतात याचे आदर्श उदाहरण म्हणजे लालाबाब. एक हाडाचे शिक्षकही होते. राज्यातील पहिल्या इंग्रजी शाळेत शिकवण्याचा मान त्यांनी संपादन केला होता. या विद्यार्जनाद्वारे त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. हाती घेतलेले कार्य तन-मन ओतून करायचे हा त्यांचा स्वभावधर्म. त्यामुळे ख्यातकीर्त शिक्षक असा लौकिक त्यांनी प्राप्त केला होता. व्यासंगी पत्रकार म्हणूनही त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता. भारतीय जनता पक्षाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. पक्षाचे एक ज्येष्ठ सल्लागार म्हणून त्यांना मोठा मान होता. अलीकडेच भाजपने आपल्या सदस्यता मोहिमेचा शुभारंभ त्यांचाच सदस्य अर्ज भरून केला होता. पणजीतील पीपल्स हायस्कूलमधून दहावी पास झालेल्या पहिल्या तुकडीचे ते विद्यार्थी होते. पणजी येथील श्री महालक्ष्मी देवस्थानच्या चैत्रपोर्णिमेकर समाजातर्फे आयोजिल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. जीवनातील "संपन्न' अनुभवांमुळे अनेकजण त्यांच्याकडे वडिलकीच्या नात्याने सल्ला मागण्यासाठी जात असत. यापैकी कोणालाही त्यांनी कधीच "वेळ नाही' अशी सबब सांगितली नाही. उलट मित्रत्वाच्या नात्याने त्यांनी समाजाच्या सर्व थरांतील मंडळी व संस्थांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने पोरकेपणाची भावना मनाला घायाळ करून गेली आहे. सामाजिक जाणिवेचा आणि नेणीवेचा दीपस्तंभ हरपला आहे. त्यांनी घालून दिलेला समाजसेवेचा वारसा जतन करणे हीच त्यांना आदरांजली ठरावी.
(शब्दांकन - सुनील डोळे)

No comments: