Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 7 September, 2009

स्वाईन फ्लूचा पहिला गोमंतकीय बळी

मडगावातील खाजगी इस्पितळात खोलाच्या तरुणीचा मृत्यू
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - "स्वाईन फ्ल्यू'ची लागण झालेल्या २८ वर्षीय तरुणीचे मडगाव येथील एका खाजगी इस्पितळात उपचार घेताना निधन झाले. गेल्या १२ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिच्याकडून उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर आज सकाळी १० वाजता तिचा मृत्यू झाल्याची माहिती "स्वाईन फ्ल्यू'विषयक नोडल अधिकारी डॉ. जुझे डिसा यांनी दिली. त्यामुळे सदर तरुणी "स्वाईन फ्ल्यू'ची गोव्यातील पहिली बळी ठरली आहे.
यंदाच्या २५ ऑगस्ट रोजी मडगावातील एका खाजगी इस्पितळात या तरुणीला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्या लाळेचे नमुने चाचणीसाठी दिल्ली येथे पाठवण्यात आले होते. गेल्या आठवड्यात तिला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे चाचणी सिद्ध झाल्यानंतर तिला "टॅमीफ्ल्यू' या औषधांचा दुप्पट डोसही देण्यात आला होता. मात्र त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे डॉ. डिसा यांनी सांगितले.
मूळ खोला काणकोण येथील सदर तरुणी मडगावात आपल्या नातेवाइकांकडे राहात होती. विदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तिला या रोगाची लागण झाली असावी, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे मडगाव येथे ती ज्याठिकाणी राहत होती तेथील सर्वांच्या लाळेचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या पूर्वी गोव्यात उपचार घेत असलेल्या दोन व्यक्तीचा स्वाईन फ्ल्यूने निधन झाले होते. मात्र संबंधित व्यक्ती शेजारील कर्नाटक राज्यातील होत्या. त्यामुळे आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई यांनी केंद्रीय आरोग्य खात्याला पत्र पाठवून याची नोंद गोव्याच्या नावे करू नये, अशी विनंती केली आहे. कारण या दोन्ही व्यक्तींना या रोगाची लागण गोव्याबाहेर झाली होती. त्या केवळ उपचार घेण्यासाठीच गोव्यात आल्या होत्या.
गोव्यात स्वाईन फ्लूचे २३८ संशयित रुग्ण असून ३१ जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे चाचणीत सिद्ध झाले आहे. या सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यातील अनेकांची प्रकृतीही स्थिर असल्याचेही सांगण्यात आले.
खोला भागावर भीतीची छाया
आगोंद (वार्ताहर) ः खोला पंचायत क्षेत्रात राहणाऱ्या तरुणीचे स्वाईन फ्ल्युमूळे निधन झाल्याची वार्ता पसरताच स्थानिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून तिला या रोगाने ग्रासले होते. आज सकाळी तिचा दुर्दैवी अंत झाला. उद्या दि. ७ रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सदर तरुणीला या रोगाची लागण झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर आरोग्य खात्याने अद्याप याठिकाणी खबरदारी म्हणून कोणतेच उपाय केले नाहीत. तसेच औषधांचा साठाही प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरवण्यात आलेले नाही, असे सूत्रांनी सांगितले. खोला पंचायत क्षेत्रात स्वाईन फ्ल्यूविषयी कोणतीही जाहिरात सरकारने केलेली नाही. टीव्हीवरून थोडी फार माहिती मिळाली आहे, असे या भागातील एका व्यक्तीने सांगितले. सरकारच्या या निष्क्रीयतेबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

No comments: