Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 11 September, 2009

एका उमेदवाराच्या धमकीमुळेच "त्या' ५२ शिक्षकांची यादी रद्द ?

पणजी, दि. १० (प्रतिनिधी)- गोवा लोकसेवा आयोगाने सरकारी उच्च माध्यमिक व भागशिक्षणाधिकारीपदांसाठी निवड केलेल्या ५२ शिक्षकांची यादी नेमकी कोणत्या कारणांसाठी अडकली आहे याच्या एकापेक्षा एक सरस कथा सध्या बाहेर यायला लागल्या आहेत. या पदासाठी मुलाखत दिलेल्या एका "पीएचडी' उमेदवाराची निवड झाली नसल्याने तिने मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची भेट घेऊन आपल्यावर अन्याय झाल्याचे निवेदन सादर केले आहे व आपली निवड न झाल्यास आत्महत्या करू, अशीही धमकी दिल्याने सरकारसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. दरम्यान, यादी रद्द झाल्यास या पदांसाठी निवड झालेल्या काही शिक्षकांनी सरकारच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी चालवल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यातील सरकारी उच्च माध्यमिक व भागशिक्षणाधिकारीपदांसाठी गोवा लोकसेवा आयोगाने एकूण ५२ शिक्षकांची यादी गेल्या जून महिन्यातच सादर केली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आता तीन महिने झाले तरी आयोगाची ही यादी मान्य करून या शिक्षकांची नियुक्ती करण्यास सरकारकडून चालढकल केली जात आहे. त्यात आता सरकारातीलच काही नेते आपल्या उमेदवारांची निवड झाली नसल्याने ही यादी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत असल्याचीही खबर आहे. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना या यादीबाबत कोणताही आक्षेप नाही व त्यांनी यापूर्वी ही यादी मान्य केल्याचेही जाहीर केले होते; पण सरकारातील वाढत्या दबावामुळे अखेर ही यादी मंत्रिमंडळासमोर ठेवून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका त्यांनी स्वीकारली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मात्र या यादीबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने तेही यादी रद्द करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व उमेदवारांच्या फेरमुलाखती घेतल्या जातील, असे विधान करून त्यांनी आपले इरादे स्पष्टच केले होते. या यादीबाबत आक्षेप घेताना त्यांनी पत्रकारांसमोर केलेल्या एका विधानात एका "पीएचडी' पूर्ण केलेल्या उमेदवाराची निवड झाली नाही, असे कारण पुढे केले होते. यासंबंधी अधिक चौकशी केली असता या संपूर्ण निवड प्रक्रियेत "पीएचडी' पूर्ण केलेली व या पदासाठी अर्ज केलेली केवळ एक उमेदवार होती. ही उमेदवार एक शिक्षिका असून तिचे आडनावही "कामत' असेच आहे, अशीही खबर मिळाली आहे. आपण "पीएचडी' केल्याने आपली निवड झाली पाहिजे, अशी भूमिका घेऊन तिने मुख्यमंत्री व इतरांना वेठीस धरले आहे, अशी खबर आहे. या गोष्टीला आता इतर उमेदवारांनीही दुजोरा दिला आहे. दरम्यान, या यादीत अधिकतर भाजप समर्थक उमेदवार असल्याचा कांगावा युवा कॉंग्रेसकडून केला जात आहे. भाजपच्या विधानसभेतील एका उमेदवाराच्या पत्नीची निवड या पदासाठी झाली होती व ते निमित्त पुढे करूनच युवा कॉंग्रेसने हा कांगावा सुरू केला. आपल्यामुळे उर्वरित निवड झालेल्या उमेदवारांवर अन्याय होईल या विचारानेच त्या उमेदवाराने आपले नाव या निवड यादीतून मागे घेतले, अशीही खबर मिळाली आहे. एवढेच नव्हे तर एका युवा कॉंग्रेस पदाधिकाऱ्याच्या पत्नीची निवड झाली नसल्याने त्याने या यादीबाबत गैरसमज पसरवला, अशीही खबर आता समोर आली आहे.
निवड प्रक्रिया पूर्णपणे पात्रतेनुसारचः आयोग
गोवा लोकसेवा आयोगाने शिक्षकांची निवड ही पूर्णपणे पात्रतेनुसारच केली आहे, अशी भूमिका आयोगाने घेतली आहे. एखाद्या उमेदवाराचे उच्च शिक्षण असले म्हणून तो शिक्षकपदासाठी पात्र ठरतोच असे मुळीच नाही. मुलाखतीसाठी आलेल्या प्रत्येक उमेदवाराची चाचणी करूनच व या पदासाठी त्याची पात्रता पडताळूनच या शिक्षकांची निवड केली आहे, असा दावा आयोगाने केला आहे. आयोगाने शिफारस केलेली यादी स्वीकारावी किंवा नाही हा अधिकार मात्र सरकारला आहे. दरम्यान, या उमेदवारांच्या फेरमुलाखती घेतल्या जातील, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता फेरमुलाखती घेण्यासाठी आधी ही यादी रद्द करावी लागेल व संपूर्ण प्रक्रिया नव्याने सुरू करण्याची शिफारस आयोगाला करावी लागेल, किंवा ही निवड प्रक्रिया आयोगाकडून काढून सरकार आपल्यामार्फत नव्याने निवड प्रक्रिया करू शकेल, अशी माहितीही देण्यात आली.

No comments: