Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 12 September, 2009

...तर बेमुदत वाहतूक बंद



वाहतूकदार संघटनेचा इशारा

मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

मडगाव दि. ११ (प्रतिनिधी) : हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे प्रकरण सरकारला शेकण्याची चिन्हे दिसून लागल्याने तूर्त हा निर्णय स्थगित ठेवण्यात आला असला तरी ज्या दिवशी नंबरप्लेट सक्तीचा निर्णय लादला जाईल त्याच दिवसापासून बेमुदत संप पुकारला जाईल, असा इशारा आज येथील लोहिया मैदानावर घेण्यात आलेल्या वाहतूकदारांच्या सभेत देण्यात आला. नंबरप्लेट सक्तीच्या निर्णयाविरुद्ध सोमवारपासून बंद पुकारण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी आयोजित या सभेला वाहतूकदारांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. सभा संपत आलेली असताना सभास्थानी मुख्यमंत्र्यांनी फोन करून सरकारने घेतलेल्या स्थगितीच्या निर्णयाची माहिती दिल्याचे जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी उपस्थित वाहतूकदारांनी सोमवारपासून संपावर जाण्याचे निश्चित केले होते.
संध्याकाळी साडेचार वाजता बोलावलेल्या या सभेला राज्यातील तब्बल २८ वाहन संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नंबर प्लेटविरोधी आंदोलनाचे सर्वप्रथम रणशिंग फुंकणाऱ्या उत्तर गोवा बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी क्रांतिवीर डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला व त्यांना आदरांजली वाहिली. आंदोलनातील त्यांचे अन्य सहकारीही यावेळी त्यांच्यासमवेत होते.
व्यासपीठावर भाजपचे गोविंद पर्वतकर व रुपेश महात्मे, भाकपचे राजू मंगेशकर, शिवसेनेचे उपेंद्र गावकर, श्रीराम नायक, साल्वादोर परेरा, माधव बोरकर, मानुएल रॉड्रिगीस, अंकुश सतरकर, रुपेश सामंत, दुर्गानंद परब, नरेंद्र प्रभू, प्रकाश माणगावकर, फ्रान्सिस सिल्वा, सुभाष नायक, दिलीप नायक, संतोष गावकर, भिकू मुळगावकर, शेख शौकत अली, शैलेंद्र फळदेसाई, नगरसेवक राजेंद्र आजगावकर, श्रीपाद कांबळी, कॅनडी सिल्वा, शेख अब्दुल्ला सतार, महंमद गवस, फ्रॅंको परेरा, दत्ता सावर्डेकर व रामनाथ नायक उपस्थित होते.
रेमेडीयस डिसिल्वा, श्रीराम नायक, सुदेश कळंगुटकर, महेश नायक, गोविंद पर्वतकर, उपेंद्र गावकर, उल्हास देसाई, रुपेश नार्वेकर, अनिल होबळे, राजू मंगेशकर व रजनीकांत नाईक यांची भाषणे झाली.
वक्त्यांचा सारा रोख वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर दिसून आला. एकीकडे वाहतूकमंत्री या कंत्राटाची जबाबदारी माजी वाहतूक मंत्र्यांवर ढकलत असून दुसरीकडे या नंबरप्लेटच्या अंमलबजावणीचा अट्टहास धरीत आहेत. त्यासाठी सारे वाहतूक खातेच त्यांनी दावणीस जुंपले आहे, असा आरोप करून हा ७ ते ८ कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
राजधानी दिल्लीच नव्हे तर दहशतवादाचा सर्वाधिक धोका असलेल्या महाराष्ट्रात देखील अजून या नंबरप्लेटची सक्ती लादण्यात आली नाही. केवळ गोवा सरकारच या बाबतीच एवढे उत्साही का आहे? असा सवाल काहींनी केला. सुरक्षित नंबरप्लेट बसवूनही वाहन चोरी गेल्यास त्याची संपूर्ण भरपाई करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, असे आव्हान यावेळी देण्यात आले.
नंबरप्लेटबाबतचा सरकारचा निर्णय म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे, लोकशाहीत शेवटी जे लोकांना हवे तेच घडते, याची सरकारला जाणीव करून देताना मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या आश्वासनाला जो मंत्री पाने पुसू पाहतो त्याला त्वरित मंत्रिमंडळांतून हाकलून त्याची जागा दाखवून द्यायला हवी. असे करण्याचे धाडस नसेल तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी पायउतार व्हावे कारण शेवटी ही सारी जबाबदारी मुख्यमंत्र्याचीच आहे, असेही यावेळी ठणकावण्यात आले.
एका वक्त्याने तर वाहतूक खात्यांतील एकंदर कारभाराचा नावानिशी पाढा वाचला व सदर खाते व त्यातील अधिकारी यांना जाग्यावर आणण्याची हीच संधी असल्याचे सांगितले. सदर कंत्राट हा एक महाघोटाळा असल्याचा सूर व्यक्त करताना यासाठी वाहतूकमंत्रीच जबाबदार असल्याचे वक्त्यांनी सांगितले. वाहतूक व मासेमारी हे दोनच व्यवसाय गोमंतकीयांच्या हातात उरलेले असून सरकार अशा निर्णयांद्वारे तेही त्यांच्या हातातून काढू पाहत असल्याचा आरोप करण्यात आला.
येत्या सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला, उपस्थितांकडूनही त्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. तथापि, सभा आटोपती घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी फोन करून कोणताही आततायी निर्णय घेतला जाऊ नये अशी विनंती केल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या संदेशाची माहिती मिळताच सभेचा नूरच पालटला. सरकारला आणखी एक संधी देऊन पाहवी, तरीही नंबरप्लेट रद्द होत नसेल तर बेमुदत बंदचे हत्यार उगारावे असे यावेळी ठरले. मात्र काहींनी, सरकार जर हा निर्णय स्थगित अवस्थेत ठेवू शकते तर तो रद्द का करू शकत नाही, आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय कुठे गेला, असा सवाल उपस्थित केला.
वाहतूकदार संघटनेचे सरचिटणीस दिलीप ताम्हणकर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले व समारोप करताना सरकारने फेरविचारासाठी नियुक्त केलेल्या समितीत बसमालकांचे प्रतिनिधी, विरोधी पक्षनेते यांचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली.
सभा उधळून लावण्याची शक्यता गृहीत धरून आयोजकांनी सतर्क केल्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. उपजिल्हाधिकारी दीपक देसाई व पोलिस निरीक्षक संतोष देसाई जातीने उपस्थित होते.
मगोकडून राजीनामा मागणी
मगोचे पणजीतील एक नेते उल्हास देसाई यांनी तर ढवळीकरांवर चौफेर हल्ला करून सर्वांनाच धक्का दिला. भाऊसाहेबांच्या नावाने ढवळीकर सर्वांची दिशाभूल करून राजकारण खेळत आहेत व भाऊसाहेबांचा आत्मा त्यांना कधीच क्षमा करणार नाही असे त्यांनी ठणकावले. सभेत ढवळीकरांवर झालेले आरोप ही मगोसाठी शरमेची बाब आहे व त्याची काही चाड असेल तर त्यांनी आजच्या आज केवळ मंत्रिपदाचा नव्हे तर आमदारकीचाही राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

No comments: