Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 10 September, 2009

...आम्ही "महानंद' व्हायचे?

पेंटर संघटनेचा सरकारला सवाल
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)ः "हाय सिक्युरिटी नंबरप्लेट' सक्तीचा निर्णय घेताना राज्य सरकारने नंबरप्लेट पेंटिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या शेकडो स्थानिक व्यावसायिकांचा विश्वासघात केला आहे. आपल्या पेंटिंग कलेच्या बळावर आत्तापर्यंत आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या या छोट्या व्यावसायिकांना अचानक रस्त्यावर फेकून सरकार त्यांना "महानंद नाईक'सारख्या नराधमाची परंपरा चालवण्यास भाग पाडत आहे काय, असा खडा सवाल करून हा निर्णय तात्काळ रद्द करा, असा इशारा अखिल गोवा नंबरप्लेट पेंटर संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
आज पणजी येथील टी. बी. कुन्हा सभागृहात संघटनेची बैठक झाली असता ही माहिती संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पडते यांनी दिली. या बैठकीत सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला. यावेळी उत्तर गोवा बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर, सरचिटणीस सुदीप ताम्हणकर आदी हजर होते. "हाय सिक्युरिटी नंबरप्लेट' हा निव्वळ मंत्र्यांनी आपल्या सात पिढ्यांची तरतूद करण्यासाठीच केलेला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आहे. हा निर्णय रद्द होईपर्यंत "ब्रश' बंद आंदोलन छेडले जाईल, अशीही घोषणा यावेळी श्री. पडते यांनी केली.
नवीन नोंदणी होणाऱ्या वाहनांसाठी "हाय सिक्युरिटी नंबरप्लेट' सक्तीची करण्यात आली आहे; पण वाहतूक कायद्याअंतर्गत इतर उर्वरित कामासाठी मात्र या वाहनांना पेंटरचीच गरज लागते. जोपर्यंत सरकार ही सक्ती मागे घेत नाही तोपर्यंत पेंटर हे काम हाती घेणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. सर्व सामान्य लोकांना जेव्हा या अन्यायकारक निर्णयाची प्रचिती येईल तेव्हाच सरकारला जाग येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
सरकारने हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लागू केला आहे व तो रद्द केल्यास न्यायालयाचा अवमान ठरेल, असे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर म्हणतात. बड्या धेंडांना संरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून स्वतंत्र अधिसूचना जारी केली जाते. मग "आम आदमी' च्या पोटाआड येणारा निर्णय रद्द करण्यासाठी अशी सतावणूक का, असा सवाल करून दिगंबर कामत यांचा "आम आदमी'चा पुळका हा केवळ फार्स आहे, अशी टीकाही यावेळी करण्यात आली. या निर्णयातून महसूलप्राप्तीच करावयाची होती तर पेंटरांबरोबर चर्चा करून तशी यंत्रणाही तयार करता आली असती, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
ढवळीकरांना आव्हान
"हाय सिक्युरिटी नंबरप्लेट'बाबत करण्यात आलेले दावे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पेंटरांसमोर जाहीरपणे मांडावे, त्यांचा प्रत्येक दावा फेटाळून लावून ते खोटे ठरवू,असे आव्हान यावेळी संघटनेकडून देण्यात आले. जनतेचे हित जपण्याचे सोडून केवळ आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी व तुंबडी भरण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात व प्रामाणिकपणे व कष्टाने आपले पोट भरणाऱ्या सामान्य लोकांना भिकेला लावले जाते, हे कसले निर्णय,असा खडा सवाल यावेळी करण्यात आला.
११ रोजी मडगावात जाहीर सभा
अखिल गोवा वाहतूकदार संघटनेतर्फे येत्या शुक्रवार ११ रोजी मडगाव येथील लोहिया मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीवेळी सरकारला दिलेली मुदत संपेल व त्याचदिवशी पुढील निर्णयाची घोषणा केली जाईल, अशी माहिती सुदीप ताम्हणकर यांनी दिली.

No comments: