Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 4 September, 2009

राज्यात मुसळधार वृष्टी

आजही दमदार पावसाची शक्यता
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - काही काळच्या विश्रांतीनंतर कालपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून येत्या चोवीस तासात गोव्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. गेल्या २४ तासांत ३.८ इंच पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत पावसाने २३१०.९ मिलिमीटर म्हणजे ९१ इंच एवढी मजल मारली आहे. ही माहिती पणजी वेधशाळेचे प्रमुख के व्ही. सिंग यांनी आज दिली.
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, ऑगस्टमध्ये दडी मारलेल्या पावसाने पुन्हा उग्र रूप धारण केले आहे. कालपासून सतत होत असलेल्या वृष्टीमुळे काही भागांत विशेषतः पणजी तसेच इतर शहरी भागात नागरिकांची तारांबळ उडाली. सप्टेंबर हा मोसमी पावसाचा शेवटचा महिना असला तरी पावसाचा बदलता प्रवाह पाहता ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडत राहण्याची शक्यता श्री. सिंग यांनी व्यक्त केली आहे.
पणजी वेधशाळेतून मिळालेल्या माहितीनुसार, काल सकाळी ८.३० ते आज सकाळी ८.३० पर्यंत काणकोण भागात २८.८ मिलिमीटर, दाबोळी ४५.४, म्हापसा ४७.८, मडगाव २४.०, मुरगाव ३७.८, पेडणे ५६.६, फोंडा ५०.०, वाळपई ४२.२, सांगे २३.४ व पणजीत ३१.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे
कालपासून पावसाची रिमझिम चालूच असल्याने शाळकरी तसेच कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पणजीतील जुने सचिवालय परिसरात तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले.
गोव्याच्या पावसाची वार्षिक सरासरी ११४ इंच आहे. तथापि, यंदा सुमारे १०० इंच पाऊस होण्याची शक्यता श्री. सिंग यांनी व्यक्त केली आहे. राज्यात १९६१ मध्ये विक्रमी पावसाची म्हणजेच १७२ इंचांची नोंद झाली होती. तसेच १२ जून १९९९ या दिवशी पावसाने केवळ २४ तासांत १४.२७ इंचांचा उच्चांक केला होता.

No comments: