Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 25 June, 2009

आक्रमक परिचारिकांपुढे आरोग्य मंत्र्यांची माघार

निलंबन आदेश निघालाच नाही!

पणजी,दि. २४ (प्रतिनिधी) - आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल गोवा वैद्यकीय महाविद्यालयात फिल्म स्टाईल धडक भेट देऊन एका वरिष्ठ परिचारिकेला निलंबित करण्याचे दिलेले आदेश आज त्यांच्यावरच उलटले. सदर परिचारिकेला निलंबित केल्यास त्या क्षणापासून सर्व परिचारिकांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिल्याने सरकारचे धाबेच दणाणले. अखेर परिचारिकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यापुढे सपशेल लोटांगण घातलेल्या आरोग्यमंत्र्यांनी परिचारिका संघटनेला चर्चेसाठी पाचारण केले व हा निलंबन आदेश मागे घेत असल्याचे आश्वासन दिल्याने या प्रकरणावर तूर्त पडदा पडला आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल अचानक धडक भेट देण्याच्या निमित्ताने गोमेकॉत प्रवेश केला. यावेळी त्यांनी गोमेकॉच्या सर्व प्रभागांत भेटी दिल्या व तेथील परिस्थितीची पाहणी केली. बालरोगचिकित्सा विभागात पोहोचल्यानंतर एका खाटेवर फाटकी चादर असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याबाबत संबंधित परिचारिकेला जाब विचारला. तिने चादरींचा तुटवडा असल्याचे सांगताच आरोग्यमंत्री तिच्यावर भडकले."" तुमी म्हातारी जाल्या, तुमका काम करपाक इंट्रस्ट ना, चला घरा बसा,तुका हांव सस्पेंड करता'' अशा अपमानास्पद भाषेत त्यांनी सदर वरिष्ठ परिचारिकेला वागणूक दिली. दरम्यान, आरोग्यमंत्र्यांच्या या वागणुकीबाबत परिचारिका संघटनेतर्फे जोरदार निषेध करण्यात आला. आरोग्यमंत्र्यांकडून सत्य पडताळून न पाहता उघडपणे सर्वांसमोर अशी भाषा वापरणे हे अजिबात मान्य नसल्याचे परिचारिका संघटनेचे म्हणणे आहे. त्यांनी आज थेट गोमेकॉचे अधीक्षक डॉ.राजन कुंकळ्ळीकर यांना घेराव घातला. गोमेकॉचे डीन डॉ.जिंदाल हे राज्याबाहेर गेल्याने ते आल्यानंतर निलंबनाबाबत निर्णय घेतील,असे डॉ.कुंकळ्ळीकर यांनी सांगताच जर का सदर परिचारिकेला निलंबनाचा आदेश दिला तर त्या क्षणापासून संपावर जाण्याचा इशारा यावेळी परिचारिका संघटनेने दिला. यावेळी अखिल भारतीय परिचारिका संघटनेच्या नेत्या श्रीमती अनिता याही हजर होत्या. दरम्यान,परिचारिकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेलाही आव्हान देण्याची भाषा आरोग्यमंत्री राणे यांनी केली. संपावर जाणाऱ्या परिचारिकांसाठी "एस्मा' लागू करणार, असा इशारा देत परिचारिका कशा संपावर जातात तेच पाहू अशीही भाषा त्यांनी केली.
आणि आरोग्यमंत्री नरमले...
दरम्यान, संध्याकाळी उशिरा गोमेकॉ परिचारिकांनी हा विषय एकदम गंभीरपणे घेऊन संपावर जाण्याचा ठाम निर्णय घेतल्याचा सुगावा लागताच आरोग्यमंत्री राणे यांनी संध्याकाळी परिचारिका संघटनेला चर्चेसाठी पाचारण केले. संघटनेच्यावतीने सत्य परिस्थिती आरोग्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ सदर परिचारिकेला निलंबित करण्यात येणार नाही,असे आश्वासन दिले. परिचारिका संघटनेतर्फे गोमेकॉतील प्रशासनाचा कसा बोजवारा उडाला आहे,याची सखोल माहितीच आरोग्यमंत्र्यांसमोर ठेवली. केवळ कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही तर गोमेकॉचा कारभार पहिल्यांदा व्यवस्थित जाग्यावर पडायला हवा,असेही परिचारिकांनी त्यांना सांगितले.यावेळी गोमेकॉच्या कारभारांचा पाढाच परिचारिकांनी त्यांच्यासमोर ठेवला.आरोग्यमंत्र्यांनी या माहितीची गंभीर दखल घेत आता पुढील तीन ते चार दिवस केवळ गोमेकॉवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले.गोमेकॉत एवढ्या समस्या असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही, याचा अर्थ त्यांची कातडी दाट झालेली आहे,अशा भाषेत त्यांनी नाराजी व्यक्त केली. गोमेकॉच्या बळावर कोण किती गब्बर झाले आहे तेही पाहायचे आहे,असेही आरोग्यमंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

No comments: