Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 27 June, 2009

छेडछाड प्रकरणाची वर्षपूर्ती; गुन्हेगार अजूनही मोकळेच!

मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी): गेल्यावर्षी रुमडामळ दवर्ली येथे एका मुलीच्या छेडछाड प्रकरणातून मडगावात उसळलेल्या जातीय दंगलीला उद्या २७ जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे, त्यानंतर जरी शहरात तशा प्रकारचा तणाव पुन्हा भडकलेला नसला तरी त्यामागील कारणे वेगवेगळी आहेत. मात्र या दंगलीतून उघडकीस आलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा संबंधित यंत्रणांकडून झालेला नसून सरकारही त्याबाबत विशेष उत्सुक असल्याचे गेल्या वर्षभरात दिसलेले नाही..
गेल्या वर्षीं दंगलीचा भडका उडाल्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिस्थिती चिघळून हिंसाचार भडकला. स्थिती हाताबाहेर जाऊ लागली. त्यामुळे १४४ कलम लागू करण्यात आले. संपूर्ण दक्षिण गोव्यातील पोलिस यंत्रणा मडगावात तैनात करण्यात आली होती. या प्रकरणी २९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते .
या छेडछाडप्रकरणातून त्या सायंकाळी "मडगाव बाजार बंद'ची हाक देण्यात आली होती. तेव्हा पोलिसांनी पत्रकारांसह नागरिकांनाही झोडपून काढले होते. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी मडगावात तळ ठोकून होते. मात्र स्थिती तणावपूर्ण होती. या प्रकरणातून मोतीडोंगर येथे बेकायदा तलवारींचे प्रकरण आठवडाभरात म्हणजे ३ जुलै रोजी उघडकीस आले. त्या तलवारी कोठून आल्या, कुठे दडवून ठेवल्या होत्या याचा सुगावा लागला. त्यातून आके येथील नागरिक एकत्र आले व त्यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या एका फर्निचरवाल्याला तेथून हाकलून लावले. त्यापूर्वी त्याच्या दुकानाला कोणीतरी आग लावली.
तलवार प्रकरणात हात असलेल्यांना पोलिसांनी अटक केली खरी; पण ते राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते असल्याचे उघडकीस आल्यावर तपासावर निर्बंध आले. त्यामुळे असेल, या प्रकरणी न्यायालयात खटला गुदरण्यासाठी अजून सरकारी मंजुरी मिळालेली नाही पोलिस सूत्रांशी संपर्क साधला असता हे प्रकरण तलम १५३ अ नुसार नोंद झाले असल्याने आरोपपत्र दाखल करण्यासाठी प्रॉसिक्युशन विभागाची मंजुरी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. दवर्लीत याच प्रकरणी घरावर हल्ला व दुकानांची नासधूस तसेच दंगल माजवणे प्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे; पण अजून सुनावणी सुरू झालेली नाही.
याच प्रकरणाशी संबंधित असे बेकायदा वाहनविक्रीचे प्रकरणही उघडकीस आले व नंतर याच वाहनांचा उपयोग बेकायदा तलवारी वाहून नेण्यासाठी केल्याचे उघडकीस आल्यावर ही वाहने जप्त करण्यात आली होती. त्यातून आणखी एक टोळी उघडकीस आली व मडगावात चालणाऱ्या नानाविध धंद्यांवर प्रकाश पडला. जप्त केलेल्या या गाड्या नंतर कोर्टाने हमीवर मुक्त केल्या होत्या. पण नंतर सुनावणीवेळी संबंधित कोर्टात हजर न झाल्याने तपास केला असता संबंधितांनी वास्तव्याबाबत दिलेले पत्तेही खोटे असल्याचे व ते बेपत्ता असल्याचे आढळून आल्याने त्यांचे पितळ उघडे पडले.
दवर्ली -रुमडामळ परिसर आज शांत आहे. त्याचे कारण गेल्या वर्षी तेथे उपद्रव माजविणाऱ्यांना तेथील स्थानिकांनी आपल्या गावी पाठवून दिले. त्यानंतर ईद व दुर्गाप्रतिष्ठापना एकाच दिवशी येऊनही विनाअडथळा पार पडले. धार्मिक सलोख्याला बाधा आली तर आपलेच हितसंबंध धोक्यात येतील हे कळून आल्यानेच स्थिती आता निवळल्याचे चित्र दिसते. तथापि, गुन्हेगार अजूनही राजकीय छत्राखाली मोकळे असल्याचे शल्य अजूनही प्रत्येकाला जाणवत आहे.

No comments: