Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 24 June, 2009

भाजपची सूत्रे तरुणाईकडे द्या

"इंडिया टूडे'च्या लेखात प्रभू चावला यांचा सूर
नवी दिल्ली, दि. २३ - सर्वश्री नरेंद्र मोदी, शिवराजसिंग चौहान, मनोहर पर्रीकर, रमणसिंग, गोपीनाथ मुंडे, बी. एस. येडियुराप्पा, राजीव प्रताप रुडी, रविशंकर प्रसाद, प्रेमकुमार धुमल आणि नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नव्या दमाच्या तगड्या नेत्यांकडे आता भारतीय जनता पक्षाची धुरा सोपवावी, असा सूर "इंडिया टूडे'च्या ताज्या अंकात ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी मुखपृष्ठ लेखात व्यक्त केला आहे. हे सर्व नेते अतिशय प्रभावी तर आहेतच; परंतु सध्याच्या परिस्थितीतून पक्षाला बाहेर काढण्याची धमक या धडाडीच्या नेत्यांमध्ये आहे, अशा शब्दात प्रभू यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, जसवंतसिंग, पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग, माजी अध्यक्ष व्यंकय्या नायडू, श्रीमती सुषमा स्वराज, अरुण जेटली, यशवंत सिन्हा, अरुण शौरी, अनंतकुमार यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांनी यापुढे मार्गदर्शकाची भूमिका बजावून दुसऱ्या फळीतील नेत्यांना पुरेशी संधी द्यावी, असा या लेखाचा एकूण मतितार्थ आहे. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत केंद्रातील सत्ता भाजपला मिळेल, असे एकूण वातावरण होते. तथापि, प्रत्यक्षात तसे घडले नाही. कारण कॉंग्रेसच्या कारभाराला लोक वैतागले आहेत, असे वरकरणी चित्र दिसत होते. त्यामुळेच भाजपच्या गोटात चैतन्य दिसून येत होते. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष निकाल जाहीर झाले तेव्हा भाजपला ११६ जागांवर समाधान मानावे लागले. याच्या उलट २००४ मध्ये भाजपला १३८ जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यावेळी दिवंगत प्रमोद महाजन यांच्यासारख्या नेत्यांनी लगेच या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यावेळी नेमके तेच सूत्र समोर ठेवून जसवंतसिंग यांनी नुकत्याच झालेल्या पराभवाची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा सवाल पत्राद्वारे केला व त्यामुळे विविध वाहिन्यांना आयतेच "खाद्य' मिळाले. त्यानंतर बाकीच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची तळी उचलून धरली. अखेर पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत आहोत, अशी घोषणाच राजनाथसिंग यांनी केली व या चर्चेला लगाम दिला. मात्र हे करताना त्यांनी पक्षात अजिबात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशाराही दिला. १९८० साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर १९८४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला दोन जागांवर समाधान मानावे लागले. मात्र नंतरच्या निवडणुकांत भाजपचा वारू सुसाट वेगाने सुटला. १९८९ मध्ये ८५, मग १२०, १६१, १८२, १८२, १३८ व ११६ अशा पद्धतीने भाजपचा प्रवास होत गेला. चावला यांच्या मते यंदाच्या निवडणुकीत भाजपने पक्षाच्या मूळ तत्त्वांकडे जास्त लक्ष न देता श्री. अडवाणी यांच्या व्यक्तिमत्वावरच जास्त भर दिला. त्याचबरोबर आपण हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहोत, असे लोकांच्या मनावर बिंबवण्यात भाजप कमी पडला. या तळ्यात-मळ्यात भूमिकेमुळे लोक या पक्षापासून दुरावले. याच्या उलट विधानसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी, शिवराजसिंग चौहान यांच्यासारख्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर उत्तम कारभार केला, कार्यक्षम प्रशासन दिले. त्यामुळे तेथे पक्षाला यश मिळण्यात अडचण आली नाही. कर्नाटकातही येडियुराप्पा यांनी विकासकामांचा सपाटा लावला. त्यामुळे तेथे भाजपला जोरदार यश मिळाले. या पार्श्वभूमीवर ज्या मतदारांनी अटलबिहारी वाजपेयी यांना स्वीकारले त्यांनीच श्री. अडवाणी यांना यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत का नाकारले, याचा भाजपने गंभीरपणे विचार केला पाहिजे. वास्तविक देशातील अन्य कोणत्याही पक्षापेक्षा भाजपकडे सध्या दूरदृष्टी व विकासाची तळमळ असलेल्या युवा नेत्यांची वानवा नाही. उद्याचा समर्थ भारत घडवण्याची क्षमता या नेत्यांमध्ये नक्कीच आहे. शिवाय हे नेते अभ्यासूही आहेत. ज्येष्ठ नेत्यांनी टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडे पक्ष कारभाराची सूत्रे सोपवली तर ते निश्चितच राष्ट्रीय पातळीवर मर्दुमकी गाजवू शकतील. त्यातूनच भाजपला पुन्हा त्याचे पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. कारण शेवटी राजकारण हा पाठशिवणीचा खेळ असून सत्ता म्हणजे अळवावरचे पाणी आहे. क्रिकेटमध्ये जसा प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत बॅडपॅच येतो, त्याच अवस्थेतून सध्या भाजपची वाटचाल सुरू आहे. मात्र त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांनी भांबावून न जाता व परस्परांवर टीकास्त्र न सोडता एकोपा टिकवून पक्षाच्या ध्येयधोरणांवरील आपली निष्ठा विचलीत होऊ देता कामा नये.

No comments: