Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 25 June, 2009

रमेश पोखरियाल उत्तराखंडचे मुख्यमंत्री

नवी दिल्ली, दि. २४ - उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून रमेश पोखरियाल "निशंक' यांची गुप्त मतदान घेऊन निवड करण्यात आली आहे.
आज नवी दिल्ली येथे उत्तराखंडमधील भाजपा आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पोखरियाल यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या पदासाठी प्रकाश पंत हेदेखील प्रबळ दावेदार मानले जात होते. "निशंक' या नावाने प्रसिद्ध असणारे पोखरियाल हे खंडुरी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यांच्या निवडीला खंडुरी यांनीही पूर्ण समर्थन दिले आहे. राज्यातील आणखी एक वरिष्ठ नेते भगत सिंग कोशियारी हेदेखील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते. पण, पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी आपले राज्यसभा सदस्यत्व कायम ठेवले. खंडुरी यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कोशियारी यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. नंतर तो त्यांनी मागे घेतला.त्याचवेळी ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर झाल्याचे स्पष्ट झाले होते. नंतर प्रकाश पंत आणि रमेश पोखरियाल यांची नावे सर्वाधिक चर्चेत होती. हे दोघेही खंडुरी यांच्या मंत्रिमंडळात सदस्य आहेत. पत्रकारितेतून राजकारणात आलेले पोखरियाल हे लोकप्रिय नेते मानले जातात.
उत्तराखंडमध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या भाजपाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारीत खंडुरी यांनी नुकताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या निवडीसाठी आमदारांची एक बैठक राजधानी दिल्लीत बोलाविण्यात आली. या बैठकीत केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून वरिष्ठ भाजपा नेते व्यंकय्या नायडू आणि थावरचंद गहलोत यांनी भाग घेतला. नवा नेता आमदारांच्या संमतीने त्यांच्यातूनच निवडला जावा, असा खंडुरी यांचाही आग्रह होता. पक्षानेही हीच भूमिका घेत आमदारांवर निर्णय सोपविला होता. त्यानुसार आज आमदारांचे गुप्त मतदान घेण्यात आले. त्यातून नव्या नेत्याची निवड झाल्याचे समजते.

No comments: