Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 24 June, 2009

जुवारी पूल धोकादायकच

अहवाल दडपून सरकारचा जनतेच्या जिवाशी खेळ!
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)- केवळ आपली निष्क्रियता लपवण्यासाठी विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारकडून जनतेच्या जिवाशी खेळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.२८ ऑगस्ट २००६ रोजी जुवारी पुलाबाबत प्रा. के. एम. बजुरीया यांनी सादर केलेल्या एका गोपनीय अहवालात जुवारी पुलाची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे नमूद केले होते. जुवारी नदीवर नव्या पुलाच्या बांधकामाला तात्काळ चालना देण्याचे सुचवून सध्याच्या पुलावरून केवळ हलक्या वाहनांना परवानगी देण्याची शिफारसही तीन वर्षापूर्वी सादर झालेल्या या अहवालात करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे.
उत्तर व दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलाबाबत सरकारकडून बेपर्वाई सुरू असल्याची महत्त्वाची माहिती उघडकीस आली आहे.जुवारी पुल धोकादायक अवस्थेत असून त्याबाबत जोखीम पत्करणे महागात पडण्याची शक्यता भारतीय तंत्रज्ञान संस्था,मुंबई यांनी गेल्या तीन वर्षापूर्वी सरकारला सादर केलेल्या अहवालात वर्तवली होती. या संस्थेने केलेल्या शिफारशीनुसार नव्या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर हातात घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. आता तीन वर्षे उलटली तरीही नव्या पुलाच्या बांधकामाबाबत काहीही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याने सध्या या पुलावरून सुरू असलेला प्रवास हा केवळ दैवावर विसंबून केला जात असल्याचेच या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
सध्याच्या जुवारी पुलाची स्थिती एकदम बिकट बनली आहे. हा पुल दुरुस्ती करण्याच्याही पलीकडे गेल्याने काहीही केले तरी या पुलाला पूर्वस्थिती प्राप्त करून देेणे शक्य नसल्याने या संस्थेचे प्रा.के.एम.बजुरीया यांनी स्पष्टपणे आपल्या अहवालात म्हटले आहे. हा पुल अवजड वाहनांसाठी जेवढा वापरला जाईल तेवढी त्याची क्षमता कमी होत जाणार, त्यामुळे नव्या पुलाची तात्काळ सोय करणे अत्यावश्यक असल्याचेही प्रा.बजुरीया यांनी नेमकेपणाने अहवालात नमूद केले आहे. या पुलावरून केवळ हलकी वाहने सोडण्याची शिफारस करूनही राज्य सरकारने मात्र या अहवालाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
दरम्यान,या पुलाच्या बांधकामाबाबत या अहवालात दिलेल्या माहितीत या पुलासाठी वापरण्यात आलेले कॉंक्रिट कमी दर्जाचे होते,असे नमूद करण्यात आले आहे. कमी दर्जाचे कॉंक्रिट वापरलेल्या ठिकाणी पुलाला तडे जात आहेत. विशेष करून खांब क्रमांक ५ च्या आसपास अशा तडा स्पष्टपणे दिसत असल्याचेही त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.या पुलाचे बांधकाम करताना गंजप्रतिबंधक तंत्रज्ञानाचा तेवढा वापर होत नव्हता त्यामुळे पुलासाठी वापरण्यात आलेले लोखंड व स्टील पूर्णपणे गंजल्याने ते अधिक धोकादायक बनल्याचेही या अहवालात सांगितले आहे. २००२ साली पुलाची दुरुस्ती करण्यात आली खरी परतू त्याचा मोठा काहीही उपयोग झाला नाही वरून त्यामुळे पुलाला अधिक तडे जात असल्याचेही त्यांना आढळले. पुलावर आढळलेले तडे व एकूण परिस्थिती पाहता या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक करणे धोकादायक ठरणार असल्याने केवळ हलक्या वाहनांसाठीच पुलाचा वापर करणे सुरक्षित ठरणार असल्याचे या अहवालात म्हटले होते.
हा तर बेजबाबदारपणाचा कळसः भाजप
जुवारी पुलाबाबत "आयआयटी' संस्थेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालाची सत्यता लपवून ठेवून सरकारने जनतेच्या जिवाशी खेळ मांडल्याचा सनसनाटी आरोप भाजपचे आमदार दामोदर नाईक यांनी केला. गेल्या तीन वर्षांत राज्यात व केंद्रातही कॉंग्रेस सरकार असूनही या पुलाच्या बांधकामाला चालना मिळू शकली नाही, यावरून सरकार जनतेच्या जिवाची किती काळजी करते हे उघड होते,असेही श्री.नाईक म्हणाले. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी तर भर विधानसभेत तीन महिन्यात पुल उभारण्याची घोषणा करून उघडपणे जनतेची थट्टाच केली होती. भाजप युवा मोर्चातर्फे अभिनव पद्धतीने या कृतीचा निषेधही केला होता.दक्षिणेचे खासदार म्हणून दोन वेळा निवडून आलेले फ्रान्सिस सार्दिन हे देखील या पुलाच्या कामाला चालना देण्यास असमर्थ ठरले आहेत,अशी टीका श्री. नाईक यांनी केली. विद्यमान सरकारला या पुलाची चिंता नसून नव्या पुलाच्या बांधकामावर किती "पर्सेंटेज' मिळेल याची जादा चिंता असल्याचा टोलाही श्री.नाईक यांनी हाणला.

No comments: