Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 23 June, 2009

कचराप्रश्नी राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही - संजीत रॉड्रिक्स

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - पणजी शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवणे हाच आपला मुख्य उद्देश असून हे करताना कोणत्याही राजकीय व्यक्तीचा किंवा नगरसेवकांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे पणजी महापालिकेचे नवीन आयुक्त संजीत रॉड्रिक्स यांनी सांगितले. पणजी पालिका आयुक्तपदाचा ताबा स्वीकारल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोणाचाही हस्तक्षेप न झाल्यास येत्या ३ ते ४ महिन्यांत कचऱ्याची समस्या पूर्णपणे मिटणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. पणजी पालिकेत आणि पालिकेच्या बाहेरही कचऱ्याची समस्या आहे. परंतु, सध्या बाहेरच्याच कचऱ्याकडे लक्ष दिले जाणार आहे, असे ते म्हणाले. बायगीणी येथे कचरा विल्हेवाट प्रकल्पाला विरोध होत असतानाही याच ठिकाणी हा प्रकल्प उभारला जाणार असल्याचे सांगून पालिकेने ती जागाही ताब्यात घेतली असल्याचे यावेळी श्री. रॉड्रिक्स यांनी सांगितले. कचऱ्याचा प्रश्न सोडवताना आम्ही कोणाचीही तमा बाळगणार नाही आणि कोणाचाच विरोधही खपवून घेतला जाणार नाही, असे ते म्हणाले.
पालिकेच्या कामकाजावर टीका करताना ते म्हणाले की, घनकचऱ्याची मोठी समस्या सध्या पालिकेसमोर आहे. इथे दिवसाला ४० ते ५० टन कचऱ्याची निर्मिती होते. परंतु, त्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही योजना पालिकेकडे नाही. "मिशन चका चक'च्या वेळी शहराची १२ क्षेत्रांनुसार विभागणी केली होती. हे विभाग पुन्हा सक्रिय केले जाणार असून त्या त्या क्षेत्रातच कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. हे करण्यासाठी शहरातील ग्रामस्थांना विश्वासात घेतले जाणार आहे. आणि त्यानंतर त्याचा आराखडा तयार केला जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र आराखडा असणार आहे, अशी माहिती देण्यात आली. हे करण्यासाठी ग्रामस्थांच्या योगदानाची अत्यंत गरज असून त्यांनी आपल्या घरातील ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून द्यावा, अशी विनंती श्री. रॉड्रिक्स यांनी केली आहे. विभागणी न करता दिला जाणारा कचरा उचलला जाणार नसल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. पूर्वी ही पद्धत राबवली जात होती. त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाल्याने पणजीत पुन्हा कचऱ्याची समस्या निर्माण झाली असल्याचे श्री. रॉड्रिक्स यांनी सांगितले.
यापुढे एकट्याचाच आदेश...
यापूर्वी पालिकेतील अधिकारी ३२ नगरसेवकांचे आदेश घेत होते. हा प्रकार पूर्णपणे बंद करण्यात आला असून कोणत्याही समस्येला मी जबाबदार असल्याने यापुढे कचऱ्याचा प्रश्न सोडवताना केवळ माझ्याच आदेशाचे पालन करण्यात येईल; तसे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती रॉड्रिक्स यांनी दिली.
पालिकेतील विभागांची अत्यंत बिकट परिस्थिती झाली असून निधीचा कसा गैरवापर करण्यात आला आहे याचा अजून आपण अभ्यास केलेला नाही, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. परंतु, पालिकेतील प्रत्येक विभागाची स्वतंत्ररीत्या चौकशी करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

No comments: