Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 22 June, 2009

कुडचडे व सत्तरीत आगीचा भडका

.. कुडचड्यात दीड कोटींची हानी
.. पोर्तुगीजकालीन सर्व दुकाने खाक



कुडचडे, दि. २१ (प्रतिनिधी) : कुडचडे रेल्वे स्टेशन व जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या सुमारे ६ दुकानांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आज पहाटे ४ च्या दरम्यान मोठी आग लागल्याने भडकलेल्या आगीत पोर्तुगीजकालीन सर्व दुकाने खाक होऊन सुमारे दीड कोटीचे नुकसान झाले तर सुमारे २ कोटीहून अधिक संपत्ती वाचविण्यात अग्निशामक दलाला यश प्राप्त झाले. मात्र तातडीने अग्निशामक दलाकडून कारवाई करण्यास दिरंगाई झाल्याने आग जास्त भडकल्याचे दुकानमालक सचिन भांगी यांनी सांगितले. आज दुपारपर्यंत कुडचडे, मडगाव, वेर्णा, फोंड्याच्या अग्निशामक दलाकडून सुमारे ७ तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.
कुडचडे बाजारातील मध्यभागी असलेल्या सदर दुकानांमध्ये आग लागताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहींनी कुडचडे अग्निशामक दलाच्या कार्यालयात संपर्क साधला असता कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने कुडचडे पोलिस स्थानकात संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यावेळीही कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने डोळ्यांसमोरच दुकानात लाकडी बांधकाम असल्याने आग वाढली. यावेळी बाजारातील एकाने धावत जाऊन अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या गाडीतून फवारण्यात आलेले पाणी अवघ्या १५ मिनिटांत संपून पुन्हा पाणी भरण्यासाठी गेलेली गाडी सुमारे अर्ध्या तासाने घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आग आणखीनच भडकली. दलाच्या गाडीची पाण्याची टाकी लहान असल्याने काही प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येत होता. यामुळे आगीचा भडका जास्त झाल्याने, आग नियंत्रणाखाली न आल्याने अवघ्या तीन तासांच्या आत आग्नेलो सौद डिगामा यांच्या मालकीच्या जमिनीत रांगेत उभी असलेली दुकाने आगीत भस्मसात झाली. यामध्ये दोन भुसारी दुकाने, पिठाची गिरण, लॉंड्री व इतर दुकानांचा समावेश आहे. सचिन मनोहर भांगी यांचे ५० लाख, रवी बाबुराव किर्लपालकर २३ लाख, सावळाराम परब-२० लाख, प्रकाश श्रीरंग पाटील २० लाख, सदानंद काकोडकर -२० लाख, शेख इस्माईल १३ लाख रुपयांची हानी झाल्याचे सांगण्यात आले.
रेशन धारकाचे हाल
पोर्तुगीज काळापासून व्यापारामध्ये अग्रेसर असलेल्या सदर दुकानामध्ये जोरात व्यवसाय चालत होता. सचिन भांगी यांच्या मालकीच्या दुकानामध्ये रेशन कार्डावरील सामान विकले जात होते. बीपीएल कार्डधारकांसाठी रेशन कार्डचा कोटा दोन दिवसांपूर्वीच आणला होता. परंतु अकस्मात लागलेल्या आगीत कोट्यासाठी राखीव असलेले सर्व धान्य जाळून खाक झाल्याने आता घरात महिनाभराची चूल कशी पेटणार याची चिंता गरीब जनतेला लागली आहे.तर या दुकानाच्या उत्पादनामधून कुटुंबीयांचे दिवस चालत असल्यामुळे काही क्षणातच संपूर्ण जीवनाची कमाई आगीत खाक झाल्याने यापुढे काय होणार,असा विचार दुकानमालकांपुढे उपस्थित झाला आहे.
कुडचडेत खास अग्निशामक स्थानकांची गरज
बाजाराच्या मध्यभागी दुकानाला अकस्मात आग लागल्याने काही मिनिटांतच आगीचा भडका जास्त वाढल्यामुळे चारही बाजूने विस्तारलेल्या इमारती व दुकानांमध्ये पेट घेण्याची परिस्थिती निर्माण झाली. यादरम्यान, कुडचडे अग्निशामक दलाकडे असलेली एकमेव गाडी इतर दलाकडे असलेल्या गाडीपेक्षा लहान असल्याने गाडीस असलेली पाण्याची टाकी लहान असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. तसेच बाजारात आपत्कालीन सेवेदरम्यान वापरण्यासाठी जमिनीत लावण्यात आलेल्या पंपची व्यवस्थित निगा न राखल्याने सर्व पंप नादुरुस्त पडले आहेत. कुडचडेत अनेक वर्षापासून स्वतंत्र अग्निशामक दलाची इमारत उभारण्याची मागणी होत असून याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे, तसेच दलाची स्वतंत्र इमारत असल्यास त्यांच्याकडे असणारी अतिरिक्त गाडीची आज कुडचडेत कमतरता भासून आली.
यासंबंधी कुडचड्यातील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत वस्त यांनी अग्निशामक दलाकडे अपुरी सुविधा असून त्यांची गाडी सुद्धा लहान असल्याने आग जास्त भडकल्याचे सांगितले. बाजारातील जुन्या इमारतीच्या दुरुस्तीची गरज असून सदर व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आमदाराकडे मागणी केल्याचे सांगितले.
शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी घटनास्थळाची पाहणी करत सरकारचा विकास शून्य असल्याने सरकारी अधिकाऱ्यांना कोणतीच भीती राहिलेली नसून व्यापाऱ्यांना सरकारतर्फे अधिकतम नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली.
कुडचडेचे आमदार शाम सातार्डेकर यांनी व्यापाऱ्यांना सरकारमार्फत जास्त भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देत कुडचडे भागात सुसज्ज अग्निशामक दल लवकरच उभारण्यात येणार असून यानंतर जनतेसाठी विविध सोयी मिळणार असल्याचे सांगितले.
सुभाष शिरोडकर यांनी दुपारी घटनास्थळाची पाहणी करत कॉंग्रेस पक्षातर्फे प्रत्येक दुकानदारास ५१ हजार नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री गोव्याबाहेर असल्याने लवकरच घटनास्थळी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून सरकारतर्फे नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यासंबंधी कुडचडे अग्निशामक दलाचे अधिकारी फ्रान्सिस्को मेंडीस यांची भेट घेतली असता आगीत खाक झालेल्या कोणत्याच दुकानदाराने विमा उतरविला नसून त्यांच्याजवळ अग्निशामक दलाचा ना हरकत दाखलासुद्धा नसल्याने त्यांना नुकसानभरपाई मिळविण्यास अडथळा निर्माण होणार असल्याचे सांगितले.
आगीत एवढ्या मोठ्या प्रमाणात दुकाने भस्मसात होण्याची ही कुडचडेतील प्रथमच घटना असून यापुढे पोलिस, अग्निशामक सेवा कुडचडेत वाढविण्याची मागणी होत आहे. तसेच रात्री गस्तीवेळी पोलिस कोणतीच काळजी घेत नसल्याचे लोकांनी सांगितले.

1 comment:

Unknown said...

Eight days past, but till date neither the political party nor CM relief fund, nor the government has granted any relief to the shopkeepers whose entire business has gutted in the fire at curchorem.

The shops are gutted in fire mainly due to the neglience of Govt.