Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 2 April, 2009

कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली

मिकी-ज्योकिम यांच्यात शाब्दिक चकमक
पणजी, दि.१ (प्रतिनिधी): कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या युतीची घोषणा दिल्लीत झाल्यानंतर आज येथे बोलावण्यात आलेल्या पहिल्याच संयुक्त बैठकीला फोडण्यात आलेला नारळ अखेर कुजका ठरला. लोकसभा निवडणुकीसंदर्भात व्यूहरचना आखण्यासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी बोलावलेल्या संयुक्त बैठकीत राष्ट्रवादीचे नेते पर्यटनमंत्री मिकी पाशेको व कॉंग्रेसचे नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांच्यात तीव्र शाब्दिक फैरी झडल्या. कॉंग्रेस भवनात बैठकीसाठी आमंत्रित करून अपमान केल्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी मिकी यांनी केली व बैठकीतून काढता पाय घेतला. राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याचा अपमान झाल्याने मिकी पाठोपाठ इतर नेते तथा पदाधिकाऱ्यांनीही या बैठकीवर बहिष्कार घातल्याने हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे.
महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आघाडी स्थापन करण्यात आली आहे. उत्तर गोव्यात राष्ट्रवादी तर दक्षिणेत कॉंग्रेस अशा प्रकारे जागावाटपही निश्चित झाले आहे. एकीकडे भाजपकडून प्रचाराचा धडाका सुरू असताना कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत वाद सुरूच असल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दोन्ही पक्षाचे आमदार तथा पदाधिकारी यांची संयुक्त बैठक कॉंग्रेस भवनात बोलावली होती. दरम्यान, ही बैठक कॉंग्रेस भवनात बोलावण्यात आल्याने सुरुवातीसच राष्ट्रवादीचे नेते नाखूष होते. श्रेष्ठींचा निर्णय शिरसांवध्य मानून त्यांनी या बैठकीस उपस्थित राहण्यास तयारी दर्शवली. राष्ट्रवादीतर्फे या बैठकीला पर्यटनमंत्री मिकी पाशेको, महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा, आमदार नीळकंठ हळर्णकर, प्रा.सुरेंद्र शिरसाट, डॉ.प्रफुल्ल हेदे, कार्मो पेगादो आदी हजर होते. कॉंग्रेसतर्फे ज्योकीम आलेमाव, पंचायतमंत्री बाबू आजगावकर, आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, श्याम सातार्डेकर, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, खासदार तथा दक्षिण गोव्याचे कॉंग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन व इतर पदाधिकारी हजर होते. सुरुवातीस दक्षिण गोव्याबाबत चर्चा सुरू झाली. या चर्चेला दक्षिण गोव्यातील राष्ट्रवादीचे नेते या नात्याने मिकी व जुझे फिलीप उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी नेत्यांनी कॉंग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री कामत यांनी केले. याप्रसंगी मिकी पाशेको यांनी उभे राहून दक्षिणेतील काही कॉंग्रेस नेतेच पक्षाविरोधात काम करीत असल्याचा आरोप केला. यावेळी चर्चिल आलेमाव यांनी तर चक्क विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची भेट घेतल्याचा आरोप करून याबाबत आपल्याकडे पुरावा असल्याचा दावा त्यांनी केला. या टीकेमुळे संतप्त बनलेल्या ज्योकीम आलेमाव यांनी मिकी यांना अपशब्द उच्चारला व त्यानंतर दोघांतही जोरदार शाब्दिक फैरी झाडल्या गेल्या. मुख्यमंत्री कामत व शिरोडकर यांनी समेट घडवून आणण्याचे केलेले प्रयत्नही यावेळी निष्फळ ठरले. या अपमानाबाबत संबंधित मंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी मिकी यांनी केली व बैठकीतून काढता पाय घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित पक्षाच्या इतर नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. कॉंग्रेस भवनात आमंत्रित करून पक्षाच्या नेत्याचा असा अपमान होत असेल व माफी मागितली जात नसेल तर या बैठकीला उपस्थित राहणे योग्य नाही, असे ठरवून अखेर राष्ट्रवादी गटाने या बैठकीवर बहिष्कार घातला. ज्योकीम आलेमाव हे देखील तात्काळ बैठक सोडून बाहेर पडले. मिकी व ज्योकीम यांच्यातील या वादामुळे या बैठकीवरच विरजण पडल्याने अखेर व्यूहरचना आखण्याचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. मिकी पाशेको यांनी या बैठकीबाबत पत्रकारांना सांगताना पक्षाचे अध्यक्ष डॉ.विल्फ्रेड डिसोझा बैठकीस गैरहजर होते त्यामुळे काहीही निर्णय घेण्यात आला नाही, असे कारण पुढे केले.
मी कॉंग्रेस पक्षाचाच : जितेंद्र देशप्रभू
मी निष्ठावंत कॉंग्रेसवासी आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीमुळे उत्तर गोव्याची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली. या पक्षाकडे भाजपशी टक्कर देणारा उमेदवार नसल्याने कॉंग्रेस श्रेष्ठींनी मला राष्ट्रवादीत प्रवेश करून ही जागा लढवण्याचे आदेश दिले. आपण केवळ पक्षाच्या आदेशांचे पालन करत असल्याची माहिती जितेंद्र देशप्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आज दुपारी दिल्लीहून गोव्यात परतल्यानंतर पत्रकारांनी त्यांची भेट घेतली असता कॉंग्रेसचा राजीनामा व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशाबाबत दोन्ही पक्षाच्या संयुक्त बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
भाजप हा जातीयवादी पक्ष आहे. दक्षिण गोव्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या मंदिर तोडफोड व मूर्तिभंजन प्रकरणात भाजपचा हात असल्याचा आरोप आपण यापूर्वी केला होता व तो आता लोकांना पटल्याचेही ते म्हणाले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही सर्व धर्म समभाव मानणारे पक्ष असल्याने आपल्याला ही उमेदवारी स्वीकारण्यास अजिबात गैर वाटले नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, देशप्रभू यांनी कॉंग्रेस भवनात भेट दिली मात्र राजीनामा अद्याप सादर केलेला नाही, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी दिली.

No comments: