Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 30 March, 2009

लाहोरमध्ये अतिरेकी हल्ल्यात ३० जवान ठार, १५० जखमी


चार अतिरेकी ठार ; एकास अटक
नऊ तास चालली चकमक
मुंबई हल्ल्यासारखाच प्रयत्न : मलिक
भारताकडून हल्ल्याची निंदा
तोयबा किंवा जैशवर संशय

इस्लामाबाद, दि. ३० - पाकिस्तानातील लाहोरनजीकच्या एका पोलिस प्रशिक्षण केंद्रावर आज अतिरेक्यांनी ग्रेनेड आणि रायफल्सच्या मदतीने हल्ला करीत ३० जवानांना ठार मारले तर अतिरेक्यांच्या गोळीबारात सुमारे दीडशे जवान जखमी झाले आहेत. सुमारे नऊ तासपर्यंत चाललेल्या या चकमकीत चार अतिरेकी ठार झाले असून एकाला पकडण्यात यश आले आहे. या हल्ल्यामागे जैश-ए- मोहम्मद किंवा लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाकने हा हल्ला मुंबई हल्ल्याचीच पुनरावृत्ती असल्याचे सांगून भारतासह जगभरातील सर्व देशांनी या घटनेची निंदा केली आहे.
पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर आणि पोलिसांमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत चकमक सुरूच होती. जवळपास १० हल्लेखोरांनी आज सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास लाहोरनजीकच्या मनवान येथील पोलिस प्रशिक्षण छावणीवर हल्ला चढविला. हा परिसर भारताला लागून असलेल्या वाघा सीमेपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे. अचानक झालेल्या या हल्ल्याने केंद्रात एकच गोंधळ उडाला. काही कळण्याच्या आतच अनेक पोलिस जवान अतिरेक्यांच्या हल्ल्याचे बळी ठरले. या ठिकाणी अतिरेक्यांनी सलग पाच स्फोट घडवून आणले. या स्फोटांचे आवाज आजुबाजूच्या परिसरातही ऐकू आले. त्यानंतर सलग नऊ तासपर्यंत पोलिस आणि अतिरेकी यांच्यादरम्यान चकमक सुरू होती.
हल्ल्याच्या वेळी पोलिस प्रशिक्षण केंद्रात किमान ८५० प्रशिक्षणार्थी हजर होते. बहुतांश पोलिस जवान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच मारले गेले. अतिरेकी हे पोलिसांच्या गणवेशात असल्याने कुणालाही संशय आला नाही. केंद्रात शिरताच त्यांनी अनेक ग्रेनेड फेकले आणि अंदाधुंद गोळीबार केला. सर्वप्रथम एका अतिरेक्याला पकडण्यात कमांडोंना यश आले होते. तो हल्लेखोरांना मदत करीत असल्याचे समजते. पण, आणखी काही अतिरेकी प्रशिक्षण केंद्राच्या आत लपून बसले होते. त्यांनी शेकडो लोकांना ओलिस धरले होते. घटनेचे गांभीर्य कळताच तातडीने लष्कराला आणि कमांडो पथकांना पाचारण करण्यात आले. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही चकमक दुपारी चार वाजेपर्यंत सुरूच होती. दोन अतिरेक्यांनी मात्र स्वत:ला जागेवरच संपवून घेतले. ३ मार्च रोजी लाहोरमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंवर झालेल्या हल्ल्यानंतरची ही पाकमधील अतिरेकी हल्ल्याची सर्वात भीषण घटना असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती : गृहमंत्री
लाहोरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रावर झालेला हल्ला हा मुंबई हल्ल्याचीच पुनरावृत्ती असून त्याच धर्तीवर अतिरेक्यांनी डाव साधला असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, नवाज शरीफ आणि वकिलांच्या लॉंग मार्चदरम्यान देशाच्या विविध भागात अतिरेकी हल्ल्याची शक्यता असल्याची सूचना आम्हाला १५ मार्च रोजी मिळाली होती. या हल्ल्याचे स्वरूप पाहता त्यामागे लष्कर-ए-तोयबा किंवा जैश- ए-मोहम्मदचा हात असल्याचा संशयही मलिक यांनी व्यक्त केला आहे.
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसीफ अली झरदारी यांनीही या हल्ल्याची कठोर शब्दात निंदा केली असून घटनेच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत.
भारताकडून निंदा
पाकमधील या मोठ्या अतिरेकी हल्ल्याची भारताने कठोर शब्दात निंदा केली असून पाकने आपल्या भूमीतील दहशतवादाचा निपटारा लवकरात लवकर केला पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आनंद शर्मा यांनी म्हटले आहे की, लाहोरच्या हल्ल्याने पाकमधील अतिरेकी संघटनांची ताकद किती वाढते आहे, याचा नव्याने प्रत्यय दिला आहे. पाकने आता तरी याकडे डोळसपणे पाहात अतिरेकी ढाचा नष्ट केला पाहिजे. केवळ पाकिस्तानच नव्हे तर अन्य अनेक देशांसाठी या विघातक शक्ती धोक्याच्या आहेत. भारत या हल्ल्याची कठोर शब्दात निंदा करीत असल्याचेही शर्मा यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री पी.चिदम्बरम यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.
याशिवाय अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांनी या हल्ल्याची निंदा करीत पाकमधील स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.

No comments: