Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 6 February, 2009

हे सरकार घोटाळ्यांचे!

विरोधकांचा घणाघाती आरोप; मामींचाही हल्लाबोल
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - विद्यमान सरकार हे घोटाळ्यांचे सरकार असल्याचा सनसनाटी आरोप करीत विरोधकांनी आज राज्य विधानसभेत सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले. त्याचबरोबर आमदार दामोदर नाईक यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचे एकेक कारनामे पुराव्यासह उपस्थित करून त्यांचे सभागृहात धिंडवडे काढले. विरोधकांकडून सरकारवर हल्ला सुरू असतानाच दुसऱ्या बाजूने सत्ताधारी गटाच्या सदस्य आमदार श्रीमती व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी कॅसिनोच्या मुद्यावर रान उठवत आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला.
राज्यपालांच्या अभिभाषणावर आज पुढे सुरू झालेल्या आभार प्रदर्शक ठरावावरील चर्चेत सहभागी झालेल्या विरोधी सदस्यांनी सरकारच्या विविध आघाड्यांवरील अपयशाची जंत्रीच सभागृहात सादर केली. त्यात प्रामुख्याने दामोदर नाईक यांनी सरकारवर तुफान हल्ला चढवला. कॅसिनो, ब्रॉडबॅंड, सेझ, खाण उद्योग, सोनसोडो, प्रादेशिक आराखडा हे सगळे या सरकारचे घोटाळे असून मडगावच्या विकासातही आपल्याला कधी विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप त्यांनी केला. कासवाच्या गतीने या सरकारची वाटचाल सुरू असून दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तर जमिनीची सनद देण्यासाठी देवाच्या नावावर पाच पाच हजारांची देणगी कुपन घ्यायला भाग पाडून पैसे उकळत असल्याचा घणाघाती आरोपही नाईक यांनी केला.
याच जिल्हाधिकाऱ्यांनी २ मे २००६ रोजी महादेव विष्णू सिनाय शिरोडकर यांच्या नावे सनद दिली आहे. ज्या व्यक्तीच्या नावे त्यांनी ही सनद दिली आहे ती व्यक्ती २६ ऑक्टोबर २००५ रोजी मृत झाल्याचे नाईक यांनी पुराव्यासह सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांना सेवेतून निलंबित करायला हवे अशी मागणीही त्यांनी केली. कोमुनिदादीतील अतिक्रमणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून वर्ष उलटले तरी अद्याप कारवाई होत नाही असे सांगून सदर अधिकारी जिल्हाधिकारी पदासाठी पात्र नसल्याचा दावा त्यांनी केला.
"इफ्फी'च्या कार्यक्रमांवर सरकारने अफाट खर्च केला. एकीकडे आमदारांनी सांगितलेली कामे करण्यास सरकारजवळ निधी नसल्याचे कारण देता तर कर्ज काढून सण कशाला साजरे करता, असा सवालही त्यांनी सरकारला केला.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती पूर्णतः ढेपाळली आहे. गृहमंत्री मात्र प्रत्येक गोष्ट चेष्टेवारी नेत असल्याचा आरोप करून स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरचे परवाने मागणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सभापतींचे नावही अर्जदारांच्या या यादीत असून मागेपुढे, घरी पोलिसांचे सुरक्षा कवच असताना त्यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्राची गरज भासावी यावरून कायदा व सुव्यवस्थेचे कसे तीन तेरा वाजलेत हे स्पष्ट होते,अशी टिप्पणी त्यांनी केली. पर्यटन क्षेत्रात तर कोट्यवधी रुपये खर्चूनही गोव्यात पर्यटक नाहीत, क्रीडा पुरस्कारांचे अद्याप वितरण नाही, नदी परिवहन खात्यात फेरीबोटीवर घेतलेल्या नव्या मुलांना पोहता येत नाही, डोंगर कापणीच्या तक्रारीत सातत्याने वाढ होत असल्याचे सांगत हे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
केवळ पैशांसाठी कॅसिनो? ः व्हिक्टोरिया
गोवा हे देशातील क्रमांक एकचे राज्य करण्याचे मुख्यमंत्र्याचे स्वप्न आहे. जनतेच्या भावनांची कदर करणार नसाल तर त्यात यश येणे अशक्य आहे असे सांगून आमदार श्रीमती व्हिक्टोरिया फर्नांडिस म्हणाल्या, या सरकारने राज्य वित्त आयोगाच्या अहवालाची कार्यवाही करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. पंचायत सचिवांच्या जागा अजूनही रिक्त असल्याने जनतेची कामे रखडली आहेत. पोलिस स्थानके व चौक्यांची संख्या वाढविण्याची गरज असून त्यांचा दर्जाही उंचावणे गरजेचे आहे. मात्र सरकारचे त्याकडे अजूनही दुर्लक्षच झाल्याचा आरोप त्यांनी केला.
कॅसिनोच्या मुद्यावरून तर सरकारविरोधात त्या चांगल्याच कडाडल्या. कॅसिनो हे लोकवस्तीपासून दूर असावेत अशी मागणी झाली तरी त्याविषयी आवाज उठवूनही अगदी राजधानीजवळच त्यांना परवाने देण्यात आले आहेत. या कॅसिनोंमुळे भावी पिढी बरबाद होत असून ते गोव्याच्या हिताचे नाहीत अशी कळकळीची सूचना त्यांनी केली. केवळ पैशांसाठी हे सारे सुरू आहे का, असा आरोपवजा सवाल करण्यातही त्या मागे राहिल्या नाहीत. आरोग्य खात्याच्या १०८ रुग्णवाहिका सेवेत काही बदलांची सूचना त्यांनी मांडताना आभार प्रदर्शक ठरावाचे समर्थन केले.
हप्ते बहाद्दर पोलिस ः दिलीप परूळेकर
साळगावात एका क्लबमध्ये खुलेआम अमली पदार्थांची विक्री चालते. मात्र सरकार त्याविरुद्ध कोणतीच कारवाई का करत नाही, असा सवाल आमदार दिलीप परूळेकर यांनी केला. ज्यांनी अशा कारवायांवर नियंत्रण ठेवायला हवे ते पोलिस मात्र येथे येऊन आपले हप्ते वसूल करतात असा आरोपही त्यांनी केला. साळगावात बेकायदा एक युरोपियन शाळा सुरू आहे. त्याविरुद्ध कारवाई का केली जात नाही असा प्रश्न करून त्यांनी या सरकारने कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना आधारभूत किंमत दिली नसल्याचे सांगितले. बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात कधीही गेल्यास दोन व्यक्ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत कायम ठाण मांडून असतात असे सांगून त्या तेथे कशासाठी असतात ते कळायला मार्ग नसल्याचे नमूद करत आभार प्रदर्शक ठरावाला विरोध केला.
कंत्राटदारांना धाक दाखवाः हळर्णकर
कंत्राटे दिल्यानंतर अत्यंत धिम्या गतीने कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर वचक ठेवण्याची सूचना आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी मांडली. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने ठराविक अंतरावर सुलभ शौचालये उपलब्ध करा असे सुचवून हळर्णकर यांनी क्रीडा क्षेत्रात युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षकांची गरज असल्याचे ते म्हणाले. कोमुनिदादीची ठराविक जमीन विकासकामे करण्यासाठी सरकारने संपादित करायला हवी असे सुचविताना त्यांनी आमदार चंद्रकांत कवळेकर यांनी मांडलेल्या राज्यपालांवरील आभार ठरावाला पाठिंबा दिला.
बेकायदा खाणीवर कारवाई कराः गावकर
सांगेत अनेक खाणी आहेत. खाण व्यवसायातून सरकारला अमाप निधी मिळतो. सांगेच्या विकासासाठी त्यापैकी थोडातरी निधी खर्च करा अशी सूचनावजा विनंती वासुदेव गावकर यांनी सरकारला करतानाच बेकायदा खाणीवर कारवाई करण्याची मागणी केली. सांगेसारख्या दुर्गम भागाला रुग्णवाहिका सेवा आवश्यक असताना सरकारने या भागाल १०८ आपत्कालीन सेवेपासून उपेक्षित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. येथे अॆनक कलाकार आहेत. त्या कलाकारांना आपल्या कला सादरीकरणासाठी व्यासपीठ हवे असून त्यासाठी रवींद्र भवन उभारण्याची मागणी त्यांनी केली. अनुसूचित जमातीला जमात दर्जा मिळून वर्षे लोटली तरी त्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण होत नसल्याचे सांगत त्यांनी आभार प्रदर्शक ठरावावर विरोधकांनी मांडलेल्या दुरुस्ती प्रस्तावाचे समर्थन केले.
शेतीच्या रक्षणार्थ योजना आखाः दीपक ढवळीकर
आभार प्रदर्शक ठरावाला पाठिंबा देताना आमदार दीपक ढवळीकर यांनी राज्यातील शेत जमिनीच्या रक्षणासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या स्वयंसेवा गटांनाही प्रशिक्षण द्यायला हवे असे ते म्हणाले. प्रत्येक प्राथमिक शाळेसाठी स्वतंत्र इंग्रजी शिक्षक नेमण्याची गरज व्यक्त करून विविध मतदारसंघातील मैदानांचा विकास करण्याची मागणी त्यांनी केली व धारगळची क्रीडा नगरी भावी पिढीसाठी स्फूर्तिदायक ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

No comments: