Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 1 February, 2009

आता युवक कॉंग्रेसचा दक्षिण गोव्यावर दावा!

प्रतिमा कुतिन्हो,जनार्दन भांडारींची शिफारस
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यात लोकसभेची निवडणूक कोण लढवणार यावरून कॉंग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू झालेली असतानाच आता युवक कॉंग्रेसने या शर्यतीत आपले घोडे पुढे दामटताना ऍड. प्रतिमा कुतिन्हो व जनार्दन भांडारी या दोन नावांची शिफारस केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याची पात्रता व प्रत्यक्ष राजकारणात उतरण्याची क्षमता असलेल्या युवकांनी पुढे यावे,कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी अशा लोकांना उमेदवारी देण्यास इच्छुक आहेत,असे आवाहन राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा गोव्याचे प्रभारी चामला किरण रेड्डी यांनी केले.
आज पणजी येथील कॉंग्रेस भवनात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर व उपाध्यक्ष दिलीप धारगळकर हजर होते.राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्यांत किमान ३० टक्के जागा युवकांना देण्याचे आवाहन केले आहे, त्यामुळे त्यांनी दिलेल्या प्रेरणेनुसार दक्षिण गोव्यासाठी युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो व जनार्दन भांडारी या दोन नावांची शिफारस केली जाणार असल्याची माहिती यावेळी संकल्प आमोणकर यांनी दिली. वालंका आलेमाव या युवक कॉंग्रेसच्या सदस्य नाहीत; परंतु त्यांना जर श्रेष्ठींकडून उमेदवारी देण्यात आली तर आपली तक्रार नसेल, असे सांगून विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या उमेदवारीसही युवक कॉंग्रेसचा अजिबात विरोध नाही,अशी संभ्रम निर्माण करणारी भूमिका आमोणकर यांनी घेतली.
दरम्यान,राज्यातील युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आपली ताकद दाखवण्यासाठी तसेच आपल्यामागे असलेल्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तीन रॅलींचे आयोजन केले जाणार आहे. यापुढे युवक कॉंग्रेस समितीची निवड प्रत्यक्ष निवडणुकीतून होणार आहे. गट अध्यक्षांची निवड निवडणूकीव्दारे केली जाणार आहे. त्यानंतर सदर गट अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांची निवड करतील व हे पदाधिकारी प्रदेश अध्यक्षांची निवड करतील,असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसला लवकरच संकेतस्थळ तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याचे रेड्डी यांनी सांगितले. येत्या ९ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यावेळी प्रदेश युवक कॉंग्रेस कार्यकारिणीने निवडलेली नावे दिल्लीत सादर केली जातील,असेही यावेळी सांगण्यात आले.

No comments: