Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 4 July, 2008

शिवोली डोंगरफोड प्रकरण मॅथ्यू यांनी मागितली उच्च न्यायालयाची माफी

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) : डोंगरफोड प्रकरणी आपण न्यायालयाला हेतूपूर्वक चुकीची माहिती पुरवली नव्हती, असे प्रतिज्ञापत्र सादर करून आज नगर नियोजन खात्याचे वरिष्ठ अधिकारी जेम्स मॅथ्यू यांनी खंडपीठाची माफी मागितली. त्याचप्रमाणे ज्या अधिकाऱ्याने तक्रार पोहोचली नाही, असे सांगून प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी हमीही त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. आपल्याकडे दोन पदे आहेत. त्यामुळे रोज अनेक तक्रारी हाताळाव्या लागतात, अनेकांना पत्रे पाठवावी लागतात. परिणामी एखादी फाईल नजरेआड झाल्यामुळे ही चूक झाल्याचेही त्याने म्हटले आहे.
शिवोली येथे डोंगरफोड होत असल्याची तक्रार करूनही नगर नियोजन खात्याकडे तशी तक्रार पोहोचलीच नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्यामुळे खंडपीठाने याची गंभीर दखल घेऊन अशी खोटी माहिती का पुरवण्यात आली, याविषयी येत्या शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.
नगर नियोजन खात्याची व अन्य तत्सम खात्याची परवानगी घेता कोणीही डोंगरफोड केल्यास तेथे कोणा व्यक्तीला किंवा कंपनीला कसलेच बांधकाम करण्याची परवानगी कधीच देऊ नये, अशी जोरदार मागणी यावेळी ऍड. नॉर्मा आल्वारीस यांनी न्यायालयाकडे केली. आधी डोंगरफोड करायची, त्यानंतर तक्रार झाल्यास काही प्रमाणात दंड भरून पुन्हा तेथे डोंगर पोखरून बांधकामास सुरुवात केली जाते. त्यामुळे हा केवळ शिवोली येथे झालेल्या डोंगरफोडीचा विषय नसून अशा प्रकारे गोव्यात अन्य ठिकाणी झालेल्या डोंगरफोडीचीही गंभीर दखल न्यायालयाने घेऊन आदेश द्यावा, अशी विनंती ऍड. नॉर्मा यांनी खंडपीठाकडे केली. यावेळी न्यायालयाने ती विनंती मान्य केली.
शिवोली येथे डोंगर फोडून वसाहतीचे बांधकाम केल्याची तक्रार सतीश बाणावलीकर यांनी पूर्वी नगर नियोजन खात्यात केली होती. खात्यात तक्रार दाखल झाल्याचा पुरावा म्हणून आज याचिकादाराच्या वकील नॉर्मा आल्वारीस यांनी तक्रारीच्या एका प्रतीवर खात्याची मोहर असलेली प्रत न्यायालयात सादर करून सरकारला दणका दिला होता. याविषयी पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवण्यात आली आहे.

No comments: